भातुकलीचा खेळ

 

                 भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी ... हे गाणे मंगेश पाडगांवकर, अरूण दाते आणि यशवंत देव या त्रिकूटांची एक अजरामर कलाकृती म्हणता येईल.  या गाण्यात संसार स्वप्नभंगाचे संयमित उदात्तीकरण केलेले आहे. आता मात्र जे काही आसपास चालले आहे त्या संदर्भात या गाण्याची आठवण झाली.  याआधी “मिरांडा सध्या काय करते?” हा लेख लिहीला होता. ते परदेशातले, त्यांची संस्कृती, स्वातंत्र्याच्या कल्पना, समाजाचा दृष्टीकोन आणि बरेच काही आपल्या देशापेक्षा वेगळी आहे.  त्यामूळे त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही पण तेच लोण आपल्याकडेही पसरत आहे याची भीती वाटते.

         बॉलीवूडमधील कलाकरांचे घटस्फोट, लग्न, लिव इन रिलेशनशीप, त्यांची मुले अशा अनेक प्रकरणांचा चावून चोथा झालेल्या गोष्टी असतात.  याचा समाजमनावर वाईट परिणाम होतो हे कोण लक्षात घेतो?   समाजाने, सामाजिक माध्यमे, वर्तमानपत्रे, मासिके यांनी अशा प्रकरणांना अवाजवी महत्व देण्यात येऊ नये. कसे असते ना? “म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो”अशी म्हण आहे. आताची पिढी कोणतीही गोष्ट गांभिर्याने किंवा दिर्घकालीन विचार न करणारी, तात्पुरते सुख शोधणारी बनत चालली आहे, त्याला जबाबदारपण आपण आहोत. आपण संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतो किंवा आजुबाजूचे एवढे गढूळ वातावरण असल्यामूळे त्यांना त्यातून स्वता:ला वेगळे करणे कठीण जात असावे.

            माझ्या ऑफीसकडे जाताना वाटेत फॅमीली कोर्ट (बांद्रा) लागते. तिथे एक वकील असलेली मैत्रीण आहे.  ती नेहमी सांगत असते की घटस्फोटाची प्रकरणे, कारणे आणि सुटका यातून एक मोठा प्रबंध लिहण्याएवढी प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.  खरीखुरी कारणे आपण समजू शकतो पण काहीही फालतू कारणांसाठी नवरा- बायको (नुकतेच लग्न झालेले, लग्न होऊन 10-15 वर्ष झालेले आणि मोठ्या वयातले सुध्द्दा) समुदेशकाचा (Counsiler) सल्ला मनावर न घेता सरळ आपल्या मतावर ठाम असतात. त्यात मुले-बाळे असलेले तर आणखी धक्कादायक!  कधी कधी स्वातंत्र्याचा अतिरेक होतो की काय असे वाटायला लागते किंवा आमच्या पिढीने जे सहन केले ते चुकीचे होते का? असे वाटायला लागते.

         लग्न म्हणजे भातूकलीचा खेळ आहे का? पाहिजे तेव्हा मांडला व कंटाळा आला की मोडला. लग्न हा एक सामाजिक संस्कार असून त्यामागे खूप मोठी बांधिलकी आणि तडजोड अपेक्षित आहे.  ते या लोकांना कळत नाही का? जगातली 99% जोडपी विजोड असतात व हे 100% खरे आहे कारण जिथे सख्खे बहीण-भाऊ दिसायला, वागायला, बोलायला, त्यांचे एकमत नसते तिथे दोन ग्रहावर रहाणारे (मंगळ आणि शुक्र) परिस्थिती, संस्कार, राहणीमान, शिक्षण, वागणे, बोलणे हे वेगळे असणारच हे गृहीत धरून चालायचे असते.  फक्त त्याचा अतिरेक होऊ नये, एकमेकांचा आदर करावा, भिन्नतेचे कारण समजून घ्यावे आणि कोणतेही नाते तडजोडीवरच आधारलेले असते हे समजून वागावे. जन्म दिलेले मुले आणि आई-बाप सुध्दा आयुष्यभर एकमेकांशी तडजोड करूनच रहात असतात.

            दुरून डोंगर साजरे दाखविणारे अनेक नवरा-बायको असतात. संशय, दुस-यांना कमी लेखणे, माहेरच्यांचा उध्दार, पैसे किंवा संपत्ती, गर्व आणि अभिमान इत्यादी अनेक कारणांनी बेबनाव होऊन घटस्फोट होत असतात. पुर्वी सासू-सासरे किंवा इतर नातेवाईक त्यांना भडकवायला किंवा समजावयला आजूबाजूला असत पण आता तर राजा-राणी असतात. विवाहसुध्दा समजून, बघून आणि पारखून झालेले असतात तरी घटस्फोट का होतात? जबाबदार दोघेही असतात पण बाईला दोषी मानले जाते.

            खरे तर हल्ली मुले-मुली शाळा,  कॉलेज, कार्यालय आणि इतर ठिकाणी भेटून एकमेकांशी परिचीत होतात.  आई-वडीलपण विरोध करणारे नसतात. आई-वडीलांची संपत्ती दोघांना मिळाणार असते. मग पुढे जाऊन ठिणगी का उडते?  आणि काय कारणे असतात की त्यांना एवढ्या टोकाचा निर्णय घेणे भाग पाडता तीही अगदी 15-20 महिन्यात आणि कधी कधी 20-25 वर्षानंतर एकमेकांना ओळखू शकत नाही? की ओळखीचेही ओझे वाटते आणि ते पेलणे हळूहळू अशक्य होते की त्यांच्याकडे वेगळे होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही.  समूपदेशन, संयम आणि होणारे बदल झेलायची मानसिक व शारिरिक तयारी करून घेणे. तसे संस्कार लहान वयात योग्य त-हेने झाल्यास यावर मात करणे शक्य होईल अन्यथा नाही.  याशिवाय तुम्हाला काही पर्याय आढळतो का?  जरूर कळवा.

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव