माणूस घडविणारा शिल्पकार

 

           “तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” इति वामराव पै. हे जरी खरे असले तरी गुण, अवगूण ओळखणारा, मार्गदर्शक, हितचिंतक, प्रसंगी सवाई शिष्य तयार करणारा गुरू कायम वंदनीय असतो.   शैक्षणिक, आध्यात्मिक, तांत्रिक आणि आपआपल्या क्षेत्रातले तज्ञ गुरू लाभणे हे भाग्याचे लक्षण असते. परदेशात शिक्षक जास्त आदरणीय असतो मात्र आपल्याकडे शिक्षकच जास्त भरडला जातो. ज्या शिक्षकांच्या हातात मुलांचे भविष्य अवलंबून असते त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामूळे होणारे दुहेरी नुकसान हे कुणी लक्षात घेत नाही.  परिणामी देशाची शैक्षणिक प्रगती खुंटते.

          आमच्या घराण्यात आधीच्या पिढीत माझी आई वयाच्या 17 व्या वर्षी शिक्षिका झाली होती. (90 वर्षापुर्वी) लग्नानंतर नौकरी सोडली तरी आम्हा मुलांचे गणित व मराठी शिकवणे तिच्यात हातात होते. नंतर मामा व्हिजेटिआय (VJTI) या नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.  मावशी गावात मुख्याध्यापिका म्हणून प्रसिध्द  होती. आमच्या पिढीत एक बहीण मुख्याध्यापिका आणि भावाने तर सेवानिवृत्तीनंतर दुसरे करिअर म्हणून मुंबई विद्यापिठात प्राध्यापकी सुरू केली. आता तिस-या पिढीत एक भाचा आणि एक भाची तयार होत आहेत.  प्रत्येक पिढीत 2  तरी शिक्षक आहेत याचा मला नेहमी अभिमान वाटतो. आदर्श वर्तवणूक, अभ्यास, ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान यासाठी कुणीतरी गुरू भेटणे आवश्यक असते. शिकविण्याची हातोटी आणि मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत शिकवणे हे सोपे काम नाही.

           मी मुलींच्या शाळेत शिकत असल्यामूळे आम्हाला 2 शिक्षक आणि 6 शिक्षिका होत्या. त्यामूळे स्त्रिया जेवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने शिकवतात तेवढे पुरूष शिकवत नाही असा माझा गैरसमज होता.  मामांमूळे माझा गैरसमज दूर झाला. तेही तन्मयतेने शिकविणारे आणि अभ्यासूवृत्तीचे शिक्षक होते.

              आधुनिक युगात संगणक, सामाजिक माध्यमे व गुगलमूळे गुरूचा महिमा कमी होतो की काय असे वाटते पण प्रत्यक्ष जेवढा संवाद (Communication), विचारांचे आदान-प्रदान होते तेवढी गुगलगुरू कडून शिकण्यात मजा येत नाही. दुधाची तहान ताकावर आणि घर बसल्या ज्ञान मिळते एवढेच समाधान. गुरू-शिष्य परंपरा जी पारंपारिक पध्दतीनुसार, पिढयांनपिढ्या शिक्षक असणारे काही शिक्षक असतात. हल्ली ऑनलाईन किंवा आभासी स्वरूपात शिक्षणपध्दती रुजू होऊ लागली आहे. काही प्रमाणात आजच्या परिस्थितीत ती आवश्यकही आहे. विशेषत: जिथे शिक्षक पोहचू शकत नाही तिथे आधुनिक तंत्रज्ञान खेडोपाडी पोचविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

     देसले गुरूजींसारखा शिक्षक “युनेस्को” तर्फे पुरस्कृत अभ्यासक्रम तळागाळातल्या विद्यार्थांपर्यंत पोचविण्यासाठी धडपड करणारा देशाची मान उंचावतो. त्याच बरोबर इतर शिक्षक, विद्यार्थी, समाजासमोर आदर्श ठरतो. जुन्याकाळी गुरूजी म्हटले कि त्यांना खुप मान असायचा, अजुनही थोड्या प्रमाणात आहे. शिक्षण हे मुलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केल्यामूळे आता ते सर्वदूर पसरण्यास आणि सुधारणा करण्यास खूप वाव आहे.

          ज्ञानार्जनाची भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यासाठी कोणतेही दिव्य करायला तो मागेपुढे पहात नाही.  फक्त त्याची ही भूक योग्य वेळी,योग्य माणसाकडून भागविणे महत्वाचे. त्यासाठी देश,वय,   भाषा आणि पैसा यांचा अडसर येऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते. या क्षेत्रातल्या करीअरसाठी पालकांनीही आपल्या पाल्यास प्रोत्साहन दिल्यास अधिकाधिक शिक्षक तयार होतील अशी आशा आहे. ईतरही अनेक  अप्रत्यक्ष गुरु आपल्या मदतीला असतातच जसे कि,पुस्तके,निसर्ग,परिस्थिती आणि आई-वडिल व नातेवाईक. आपण त्यांच्याकडुन किती आणि काय काय शिकायचे हे आपल्यावर अवलंबुन असते. अशा या माणूस घडविणा-या शिल्पकारास प्रणाम!

 

Comments

  1. व्वा, माधवी. छान लेख. शिक्षकांबद्दल ज्यामुळे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव