वनसंवर्धन -एक काळाची गरज

        नुकताच ॲमेझॉन टिव्हीवर “शेरनी” चित्रपट पाहिला.  वन अधिकारी (विद्या बालन), वाघीण, स्थानिक राजकारण, शिकारी यांच्यातला संघर्ष मांडला आहे. त्यात शेवटी वाघीणीचा बळी जातो.  समाधान एवढेच की तिचे दोन बछडे वाचतात.  जेव्हा जेव्हा आम्ही पर्यटनाला जातो तेव्हा जंगल हा एक अनिवार्य बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामूळे आतापर्यंत बरीच जंगले बघून झाली.  पिलभित टायगर रिझर्व, ताडोबा चंद्रपूर, बांधवगड नॅशनल पार्क (मध्यप्रदेश), कुंभलगड वाईल्ड लाईफ (उदयपूर, राजस्थान) असे बाहेरचे आणि मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, राणीबाग, नित्याचे. पुर्वीचे वैभव आता दिसून येत नाही पण अजूनही मुंबई हिरवी दिसते ती यामूळेच. 

         आपण विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली. डोंगर फोडले, नद्या वळविल्या, त्यांच्यावर धरण बांधले, समूद्रावर सेतू बांधले म्हणजेच कोठेतरी निसर्गावर आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करतो. खरेच शक्य आहे का ते? निसर्गापेक्षा आपण बलवान होऊ शकतो का? साधे झाडाचे उदाहरण घ्या. एक झाड लावले तर त्याच्यापासून ऑक्सीजन, सावली, फळे, पानेसुध्दा (आयुर्वेदात) त्याचा उपयोग होतो. शिवाय पक्षांचे घरटे, प्राणी संवर्धन होते.  ज्यामूळे सृष्टीचे निसर्गचक्र चालू रहाते.  असे म्हणतात “जंगलचा कायदा कठोर” असतो पण माणूस जास्त कठोर आहे असे वाटते. आपल्या ज्या संस्कृतीत,”मुक्या जनवरांवर प्रेम करा,” “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” असे शिकवले जाते, तिथेच त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून त्यांची बेकायदा कत्तल करतो आणि स्वार्थासाठी त्यांचा बळी घेतो. वाघाचे उदाहरण घेतले तर त्याच्यासारखा राजबिंडा,देखणा प्राणी जंगलची शान ठरतो.  आपण त्यांच्या निवासस्थानावर नाना प्रकारे अतिक्रमण करून त्यांचे नैसर्गिक हक्क डावलतो. त्यामूळे ते मानव वस्तीत येऊन तेथील मनुष्य प्राण्यांवर हल्ला करतात.  आता त्याला जबाबदार कोण? निसर्गावर मूळ हक्क प्राण्याचा का मानवाचा कि दोघांचा हा एक गहन प्रश्न झाला आहे.

            “शेरनी” चित्रपटातील वाघीण एका जंगलातून (मध्ये असलेल्या गावामूळे) दुस-या जंगलामध्ये जाऊ शकत नाही. नाईलाजाने बाळांच्या सुरक्षितेसाठी आणि भक्ष्याच्या कमतरतेमूळे ती नरभक्षक बनते. शिकारी तेवढी संधी साधून तिची हत्या करतात. जंगलातले मुळचे रहिवासी मात्र पुर्णपणे याच्या विरोधात असतात कारण त्यांना त्यांच्या सोबत रहायची सवय असते.  वन अधिकारी पण वाघिणीला वाचवून दुस-या जंगलात सोडणार असतात. शेवटी त्यात अयशस्वी ठरतात. याचे सुंदर चित्रीकरण चित्रपटात करण्यात आलेले आहे. 

              आपण खरेच एवढे निर्दयी बनत चाललो आहोत का? “जियो और जिने दो” एवढी साधी नितीमत्ता आपण अंगीकारू शकत नाही का? विकासावर सुध्दा नियंत्रण व इतर पर्यायी उपाय शोधता येणार नाही का? विकासाच्या हव्यासापोटी निसर्ग तर भकास करत नाही ना? सर्व पशू-पक्षी, मनुष्य हे एका निसर्गचक्राचे भाग आहेत. त्यातील एखादा दुवा निखळला तर ते चक्र थांबून इतर सर्वांना हानीकारक ठरेल. त्यासाठी आतापासून वनसंवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. झाडांची नैसर्गिक वाढ होणे अपेक्षित आहे. त्यासाठी वनाची जोपासना करणे आवश्यक आहे.  जंगलामध्ये मनूष्य प्राण्याची दखल अंदाजी चुकीची आहे. जंगलात जंगलचा कायदा असू द्यावे. वन्य प्राण्यांना नैसर्गीकरीत्या जगण्याचे स्वातंत्र्य असावे. जर असे झाले नाही तर मनुष्य प्राण्याचा नाश अटळ आहे.  

                बाय द वे, महाराष्ट्राची शान असलेल्या वाघोबांची संख्या वाढत आहे हे वाचून आनंद झाला.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव