भगिनीभाव जाणिला कुणी?

 

       आज मैत्रीचा दिवस. भाऊबीज, पाडवा, गुरुपोर्णिमा, राखीपोर्णिमा आणि इतर अनेक प्रसंगी सगळी नाती साजरी केली जातात. बहीणी-बहीणी मध्ये असलेले हे नाते मात्र विशेष कुणाच्या लक्षात येत नाही. तुम्ही म्हणाल, अहो, अप्रत्यक्षपणे त्यांचा सहवास/प्रेम लाभतेच की!  एकूणच बहिणीचे प्रेम,आस्था, आपूलकी, त्याग, मैत्री याबद्दल कमीच बोलले जाते. हेही नाते मला वाटते गृहितच धरले जात असावे. “आई-वडिलांनंतर मन मोकळे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे बहीण”असते.

          कधी मैत्रीण,कधी ताई, आई प्रसंगी कठोर बनून बहीण किंवा भावाच्या पाठीशी ठामपणे उभी राह्णारी, प्रसंगी त्यागाची मुर्ती बनून त्याचा मोठेपणा न मिरवणारी, आलेल्या भावाच्या बायकांशीदुध्दा प्रेमाने वागणारी अशा अनेक रुपात ती वावरत असते पण आपल्या कधी लक्षात येत नाही. लहानपणी भांडणारी, पण तेवढीच हक्काने खाऊ खाताना बहिणीला/भावाला बोलावणारी, लग्नानंतर सासरी जाताना भावा-बहीणीच्या गळ्यात पडून रडणारी अशी अनेकांना आपआपली बहीण नक्कीच आठवत असेल. म्हणुन नेहमी वाटते, की एक तरी बहीण असावी.  आताच्या एक आणि एकच्या जमान्यात हे नाते हळूहळू दुर्मिळ होत जाईल असे वाटते.

         मी भाग्यवान आहे की, मला एक सख्खी व 3 चुलत अशा एकूण 4 बहीणी आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात जवळपास 18-20 आणि 8-10 वर्षाचे अंतर आहे. आता आम्ही लग्नामूळे एकत्र रहात नाही तरी तोच जिव्हाळा, आपुलकी अजून कायम आहे. आम्ही एकमेंकाच्या जवळ रहात नाही. वयात पण खूप अंतर आहे.  प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, परिस्थिती वेगळी तरी एकत्र जमलो की हे सर्व गळून पडते. आम्ही एकमेकांचे होऊन जातो. आम्हा बहीणींचा हेवा ब-याच जणांना वाटतो कारण कोणत्याही प्रसंगी बहीणी मदतीला हक्काने धावून येतात. मी शेंडेफळ म्हणून मला त्यांचा सगळ्यात जास्त फायदा. आताच्या भाषेत छान ट्युनीग जमलेले आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असली तरी एकमेकासाठी अडथळा न ठरता उलट वेळप्रसंगी हक्काने सल्ला घेऊन एकमेकांशी कायम जोडलेले असतात. वयातील अंतरामूळे मनात कधी अंतर पडत नाही. आम्ही दोघी बहीणी नौकरीवाल्या त्यामूळे आमचे जास्तच कौतूक आणि आम्हाला सगळ्या मूभा मिळतात. मोठ्या बहीणी आताच्या तांत्रिकी युगात थोड्या बिचकत असल्यातरी नवीन नवीन शिकायला सदैव तयार असतात.  कधी विसराळूपणा, जुने रितीरिवाज आणि परंपरा माहित नसतात तेव्हा हक्काने आठवून सांगणा-या, धार्मिक प्रसंगी सगळे कसे शास्त्रशुध्द झाले पाहिजे यासाठी आग्रह धरणा-या बहीणींचे सासरच्या लोकांना खूप कौतूक वाटते. विशेषत: एकटी नणंद आणि मामी यांना खुप वाईट वाटते त्यांना बहीण नाही म्हणून पण तिथेही या त्यांच्या बहीणी बनतात. जावा जावासुध्दा बहीणीसारख्या रहातात. सख्या बहीणी व्यतिरिक्त कधी कधी मामे बहीण, मावस बहीण, मानलेली बहीण यासुध्दा सख्या बहीणीसारख्या प्रेमाने करतात.  बरोबरीच्या असल्या तर जास्तच मेतकूट बनते. लग्नानंतर थोड्या दुरावतात पण आपुलकी, प्रेम व जिव्हाळा कमी होत नाही. प्रसंगानुसार प्राथमिकता बदलतात पण ओढ कायम असते.

              अशा या बहीणी कधी कधी आपआपसात नाती जोडतात तेव्हा दोन्ही घरांच्या नाती निभवायला लागतात. दोन्ही घरामध्ये समतोल साधून माणसे बांधून ठेवायला लागतात. आता नौकरी, शिक्षण यामूळे तीची जबाबदारी माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी वाढलेली आहे. या नात्यावरूनच कदाचीत वैद्यकीय क्षेत्रात नर्सला सिस्टर म्हणत असावेत.  जी रुग्णांची बहीणीच्या नात्याने सेवा करत असते.

            अशा या निखळ भगिनीभावास आजच्या मैत्रीदिनानिमीत्त अनेक शुभेच्छा व अशाच भगिनी सर्वांना मिळोत.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव