अथांग सागर

          नुकतीच “नारळी पोर्णिमा” झाली आणि सगळ्यांचे समुद्राबद्दलचे प्रेम उफाळून आले. माझा एक नाजूक कोपरा समुद्रासाठी राखीव आहे असे म्हणावयास हरकत नाही. कोणतेही समुद्र किना-यास भेट देणे मी सहसा चुकवत नाही. कारवार (कर्नाटक)मध्ये गेल्यावर “कारवारचा समुद्र” हा भेट देण्यासाठी एक अविभाज्य घटक असतो. विविध समुद्र किनारे आपआपला परिचय वेगवेगळा देत असतात. मुंबई, कारवार, गोवा, गणपतीपुळे, रत्नागिरी, अलिबाग, मुरूड, जंजीरा, गोकर्ण, दमण, गुजरात अशा अनेक समुद्र किना-यांचे दर्शन बघतच रहावेसे वाटते. विशेषत: सुर्योदय आणि सुर्यास्त पहाण्यासारखा असतो. त्यावेळी सगळा आसमंत एकदम शांत असतो. फक्त समुद्राची लाटांची गाज तेवढी ऐकू येत असते. ध्यान लागणे किंवा समाधी अवस्था प्राप्त होणे यालाच म्हणत असावेत. समूद्र किनारी फिरणे, लाटा पहात संध्याकाळ घालविणे, शिंपले गोळा करणे, वाळूचे किल्ले बनविणे, कुर्ल्यांच्या मागे धावणे इत्यादी अनेक उद्योग अनेकांचे चालूच असतात.

        कोकणवासी आणि कोळी बांधव यांना समुद्र आपला सखा वाटतो. त्याची पुजा करून ते नारळी पोर्णिमेच्या दिवशी नौका पाण्यात सोडतात. समुद्र हे त्यांचे उपजिवीकेचे साधन म्हणून ते समुद्राला दैवत समजतात आणि नारळ अर्पण करतात. तसेच दर्यावर्दी, खलाशी आणि व्यापारी, नौसेना यांना देखील समूद्राचे महत्व खूप असते. वेगवेगळ्या रत्नांची, खनिज तेल आणि समुद्र जीवांची खाण असल्याने समुद्राला “रत्नाकर” असेही म्हणतात. जगातील ¾ भाग पाण्याने व्यापलेला आहे. जीवसृष्टीचा उदय पाण्यातून झाला असे समजतात. पहिला विष्णूचा अवतार “मत्स्य” होता.  तसेच समुद्र खाद्य (Sea Food) काहीजणांना अतिप्रिय असते.   

       देशात परदेशात व्यापारी आणि प्रवासी वहातूकसुध्दा समुद्रातून होत असते. आपण भारतवासी तसे भाग्यवान! आपल्या देशाच्या तीन बाजू समुद्राने वेढलेल्या असल्यामूळे नैसर्गीकरित्या आपण सुरक्षित आहोत. देशाला 7,516.6 Km लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या मोठया समुद्र किना-याचे रक्षण करणे तेवढेच महत्वाचे, अन्यथा सुरक्षा धोक्यात येऊ शकते. समुद्र मार्गावरून दहशतवादी हल्ले होऊ शकतात. तटरक्षकदल कायम तैनात असते. समुद्राचे उत्तम दान आपल्याला मिळालेले आहे.  मालदिव, सेशल्स यांच्या समुद्रकिना-याचा पर्यटनासाठी मोठा उपयोग होतो. त्याच प्रमाणे आपणही आपल्या समुद्रकिना-यांचा उपयोग करून घेतल्यास नक्कीच फायदा होईल. रस्ता, रेल्वे आणि आकाशमार्गे वहातूक जेथे शक्य नाही तेथे जलमार्ग उभारल्यास अत्यंत दिर्घकालीन फायदेशीर ठरू शकते. रहदारी, प्रदुषण आणि वेळेची बचत होऊन हा पर्यायी मार्ग किफायशीर ठरू शकतो. मुंबईला मिळालेले समुद्राचे वरदान आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या यांचा विचार केल्यास जलमार्गाशिवाय पर्याय नाही. समुद्रसेतू, सागरी किनारा मार्ग असे अनेक उपाय आपण योजत आहोत. तसेच अनेक जलपर्यटन केंद्रे उभारल्यास पर्यटनलाही चालना मिळू शकेल.

             सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, सगळ्यांना तो सामावून घेतो. त्याचे पाणी खारे असते असे म्हणतात.  समुद्राचे खारे पाणी प्रकियाद्वारे गोडे करून पिणारे देशसुद्धा आहेत.  “समुद्र कोपला तर” किंवा “समुद्राचे आत्मवृत्त” असे शाळेत निबंधाला विषय असायचे. सहसा समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. क्वचितच त्सुनामी सारखी संकट येऊन होत्याचे नव्हते होते. कोणताही कचरा समुद्र आपल्या पोटात ठेवत नाही.  कचरा, प्लॅस्टीक, विविध रसायनाचे विसर्जन, मुर्ती विसर्जन यामूळे आपण समूद्र प्रदुषित होत असतो. त्याचे दुष्परिणाम समुद्री जीवावर होतात, समुद्राची रया जाते.  मनाला अथांग समुद्राची उपमा देतात. आपले मन अथांग समुद्रासारखे असते. त्याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. विशाल मन इतरांचे गुण-दोष पोटात घालून त्यांना माफ करते. आपल्या डोळ्यातील अश्रूसुध्दा खारे असतात. कधी ते दु:खाचे असतात तर कधी पश्चातापाचे असतात. अशा या अथांग समुद्राचे वर्णन करावे तेवढे कमीच!


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव