दिव्या दिव्या दिपत्कार ..
लहानपणी रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर आम्ही सगळेजण “शुभं करोति कल्याणम”, पाढे आणि “दिव्या दिव्या दिपत्कार” म्हणत असू. आजही दिवा लावताना त्याची आठवण येते. मुलींना शिकवताना आम्हीपण म्हणत असू. आता सगळेजण मोठे झाले पण दिव्याचे महत्व कमी झालेले नाही. देवाकडे, तुळशीकडे किंवा गावाकडील घरात दक्षिणेकडे संध्याकाळी दिवा लावतात तेव्हा एक वेगळेच मानसिक समाधान मिळते. खरंतर वेगवेगळी रोषणाई, आकर्षक दिव्यांची सजावट करत असतात. पण जी दिव्याची रोषणाई मनाला शांतवते त्याचे महत्व दिवाळीत किंवा अनेक शुभ प्रसंगी आपल्या संस्कृतीत महत्वाचे मानले जाते. दक्षिणेकडच्या देवळात गेलात तर गाभा-यात तुम्हाला फक्त समईचा प्रकाश दिसेल तिथे कृत्रिम लाईटस लावत नाहीत. अशा वेळी मंद प्रकाशात समईच्या उजेडात मुर्तीचे रुप विलोभनीय दिसते शिवाय दाग-दागिनेपण जास्तच खुलून दिसतात. मंगलप्रसंगी औक्षण करणे हे आपल्याकडे महत्वाचे मानले जाते.
अशा या दिव्याचे
महत्व जाणूनच आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी “दिव्याची अमावस्या” साजरी करत असावेत.
या दिवशी सर्व दिव्यांची पुजा करुन “मनातला आणि आजुबाजूचा अंधार नष्ट होऊ दे” ही
प्रार्थना आपण सर्वजण करीत असतो. तसेच दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. आणखीन
एक दिवा महत्वाचा पुर्वी मानत असत “वंशाचा दिवा” (मग त्यांने कितीही दिवे लावले
तरी चालतील). “वंश्याच्या दिव्यासाठी”
वाटेल ते दिव्य स्त्रिया करीत असत. दिवा
जास्त प्रकाश पाडतो की दिवटी (छोटी समई) हा एक संशोधनाचा विषय आहे कारण आताच्या
दिवट्या (मूली) मुलांपेक्षा जास्त दोन्ही घरे उजळवून टाकतात मग कोण बरे श्रेष्ठ, दिवा की दिवटी?
अमावस्येला
चंद्र आपले अस्तित्व नाकारतो म्हणून अंधार पडतो असे म्हणतात. वास्तविक संध्याकाळपर्यंत
सुर्य आणि रात्री चंद्र अशी प्रकाशाची विभागणी निसर्गाने आधीच करून ठेवलेली आहे. महिन्यातून
एकदा क्वचित प्रसंगी दोनदा चंद्राला आराम मिळतो पण सुर्याला का नाही? लहानपणी
सुर्य नसता तर? असा निबंधाला विषय असायचा. सुर्याला पण ग्रहण लागते ना? विज्ञान
त्याची कारणमिमासा सांगत असेल. पुर्वी लोक अमावस्येला कोणतेही चांगले काम, प्रवास
करीत नसत. जन्म किंवा मृत्यू अमावस्येच्या
दिवशी असेल तर शांती करावी लागते असा गैरसमज मोठ्या प्रमाणात होता. त्या दिवशी
जन्माला आलेले बालक भाग्यवान असतात असे पण म्हणायचे त्याला शास्त्रीय
आधार काही नाही.
असा हा दिवा आपण शिक्षण, आरोग्य, देशसेवा,
समाज सुधारणा आणि चांगल्या गोष्टींचा लावू शकतो. ज्यामूळे अज्ञान, अंधार दूर होऊन
प्रकाशाचा मार्ग दिसेल. त्यासाठी गुहेतून बाहेर येण्याची इच्छा हवी ना? आणखी एक
सांगता येईल, अमावास्येला चंद्र जरी नसला तरी छोट्या छोट्या तारका प्रकाशमान होतात
आणि आकाश जास्त खुलून दिसते. म्हणजेच त्या तारकांही कुठेतरी आपल्या परीने अंधार दूर
करायचा प्रयत्न करीत असतात. आज आपण एका बटणावर
वीज प्रकाशीत करू शकतो. त्यासाठी गेले कित्येक वर्षांची मेहनत, परिश्रम आणि
साधने यांचा प्रचंड वापर केला तेव्हा आजचे आयुष्य प्रकाशमान झाले.
“प्रकाशाचे तारे,
अंधारावर रुसा, हसा, मुलांनो हसा. ..” या गाण्यातून हाच संदेश दिलेला आहे. येणारी प्रत्येक पिढी मागच्या पिढीसाठी आदर्श ठरावी आणि
त्यांनी ज्ञानाचा उजेड पाडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करून स्वत:बरोबरच इतरांचा
उत्कर्ष करावा हीच अपेक्षा असते. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानामुळे, कौशल्यामूळे आपण
इतरांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो हा विश्वास निर्माण होणे हे गरजेचे आहे. मग पुढे
सर्व काही सोपे होवून जाते.
“ तमसो मा
ज्योतीर्गमय” हे ब-याच ठिकाणी बोधवाक्य असते. अध्यात्मात तर असे अनेक अज्ञानाचे
मार्ग उघडण्याच्या किल्या आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथातून, पुराणकालीन दस्ताऐवजातून
राखून ठेवलेले आहे. गरज आहे ते आपण प्राप्त करण्याची आणि त्याचा विनियोग इतरांसाठी
करण्याची. चला तर मग आपणही आपला खारीचा वाटा उचलूया आणि स्वता:चे आणि इतरांचे
आयुष्य उजळून टाकण्याचे प्रयत्न करूया.
!! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Comments
Post a Comment