स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव


                 स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? प्रत्येकाला हवी असलेली तरीही ती नेमकी काय आहे याची माहिती नसलेली संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळाले की मिळवले? हा आज 74 वर्षानंतरचाही अनुत्तरीत प्रश्न आहे. स्वतंत्र असणे याचा अर्थ स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे सामर्थ्य असणे, स्वत:चे रक्षण स्वत: करण्याची क्षमता असणे म्हणजे स्वातंत्र्य असा होवू शकतो. व्यक्तीस्वातंत्र्य हे तर संघर्षाचे मुलभूत कारण  आहे.  विचार, अस्मिता, पंथ,वर्ग, संस्कृती अशा अनेक अंगानी स्वातंत्र्याचा विचार केला तर संघर्ष निर्माण होण्यास कारण मिळते. समता, समानता, अधिकार आणि हक्क या गोष्टींशी स्वातंत्र्य जोडणे अपेक्षित होते.  

            आज आपण स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत.  आता हीच वेळ आहे की आपल्या स्वातंत्र्याबाबत सिंहावलोकन करण्याची! बरेच पाणी डोक्यावरून गेल्यावर कधीतरी आपण जागृत होतो, तसे आपण झालोत का? की अजूनही मतभेद आहेत? प्रमाण कमी अधिक आहे की तसा आभास निर्माण करीत आहोत? सुधारण्यास वाव आहे का? वैचारिक मतभेद आहेत, एकजूट आहे? देश वेगळा आणि व्यक्ती वेगळी असे वाटते का? देशाचे आणि स्त्रिस्वातंत्र्यालासुध्दा तेवढीच वर्ष झालीत. आज दोघांची काय स्थिती आहे? पुरूषही स्वतंत्र आहे का? कि त्याला स्वातंत्र्याची गरज नाही? एकेकाळी स्त्री स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेणारा पुरूष तो स्वत: तरी पुर्ण स्वतंत्र आहे का? आज 22 व्या शतकात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे पण या मुलभूत गोष्टींचा विचार आपण करतो का?

           नैसर्गिक असमानता,  रुढी, परंपरा, समज, गैरसमज, सामाजिक संकेत आणि शाररिक जडण-घडण या अनेक मुद्द्यांवर आपण आपल्याही नकळत पुरूष जातीवर अन्याय करत आहोत असे वाटत नाही का? जशी स्त्रि स्वातंत्र्यासाठी धडपडत असते तसा पुरूष स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित ठेऊ शकतो का? तो त्याच्या मर्जीने वागू शकतो का? तुम्ही म्हणाल, एवढे अन्याय अत्याचार होत आहेत, ते कोण करतोय पुरूषच ना? बरोबर आहे पण त्या मागेही त्यांच्या भावना दडपणे, उत्तेजित करणे, पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची कमी आणि त्यामूळे होणारी कुचंबणा, विवाहित पुरूषांच्या वेगळ्या तर अविवाहीत पुरषांच्या वेगळ्या समस्या, भावनिक असमतोल, दिवसेंदिवस वाढणारे स्त्रियांचे अधिकार आणि स्वातंत्र्य, अतिउत्साहापोटी होणारी गळचेपी, स्पर्धेत टिकण्यासाठी लागणारी सक्षमता, जबाबदारींचे ओझे इत्यादी अनेक अंगानी विचार केल्यास “गरीब बिचारे पुरूष” असे ही कधी कधी म्हणावेसे वाटते.

             मी कोणाची बाजू किंवा समर्थन करीत नाही पण विचार प्रवृत्त करीत आहे. स्त्री खरी स्वतंत्र झाली आहे का? देश ख-या अर्थाने स्वतंत्र झाला का? आज ही आपण दहशतीचा सामना करीतच आहोत.  अजूनही स्त्रियांचा बळी जातच आहे. पुरूषांच्या आत्महत्या थांबल्यात का?  देशाबद्दल अभिमान वाटावा असे आपण वागतो का?  आपल्याला स्वातंत्र्याचे फायदे हवेत, जबाबदारी नको, हक्क हवेत पण कर्तव्याचे पालन करायला नको. येणा-या प्रत्येक संकटातून धडा घेवून तसे उपाय योजतो का? सर्व काही विसरून पुन्हा “ये रे माझ्या मागल्या” प्रमाणे नेहमीचे आयुष्य चालू ठेवतो. स्वत: सुधारण्याचा कोणताही आग्रह न धरता दुस-याने करावे ही आपली कायम अपेक्षा असते का? स्वत:पासून सुरवात करण्याची कुणाची इच्छा नाही का? असली तरी अमंलात आणण्यास तयार आहोत का? सरकार, अनुदान आणि पैसा हेच समृध्दीसाठी जबाबदार आहेत का? व्यक्तीगत आणि सार्वजनिक स्वातंत्र्य सारखेच असते का? खरेच स्वातंत्र्य उपभोगण्यास आपण लायक आहोत का? असा विचार प्रत्येकाने केल्यास ख-या अर्थाने आपण स्वतंत्र होऊ आणि अभिमानाने जगू शकू असे वाटते.  आपणास  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव