आहे मनोहर तरी …
30 वर्षापुर्वी हे पुस्तक जेव्हा प्रसिध्द झाले तेव्हा ब-याच क्रिया- प्रतिक्रिया उमटल्या असतील यात वादच नाही. एका प्रसिध्द लाडक्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू जगासमोर मांडण्याचे धैर्य खुद्द त्यांच्या पत्नीने मांडले म्हणजे मोठेच काम होय. विशेष म्हणजे पु.लं.देशपांडेचाही यात सहभाग होता. त्यांना कोणताही कमीपणा किंवा अपमान वाटला नाही हे विशेष. तेवढी प्रगल्भता दोघांमध्येही असणार म्हणूनच शक्य झाले ना! त्यांचे वेगळेपण नक्कीच कौतूकास्पद आहे. आज याचा संदर्भ लक्षात घेतला तर अनेक स्तरांवर स्त्री-पुरुष, नवरा-बायको यांचे सबंध अधिकच तणावाचे आणि संघर्षाचे दिसून येतात.
आज स्त्रिया स्वता:च्या पायावर उभ्या आहेत. त्यांना हवे ते स्वातंत्र्य दिले जाते अगदी माहेरहून आणि सासरहूनसुध्दा ! मग काय कमी आहे? काय कारणे असावीत? कुठेतरी शारिरीक, मानसिक, आर्थिक मर्यादा जाणवतात का? एखादे घर बाहेरून एकदम सजलेले असेल तरी आतून मजबूत असेलच असे नाही असे म्हणता येईल का? मिळालेले स्वातंत्र्य सांभाळण्याचे दडपण आहे का? शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानता जे अपेक्षित आहे. तेवढे मिळत नाही का? मग नक्की काय कमी पडते? आणखीन “हवे”च्या नादात आहे ते गमावून बसण्याची भिती वाटते का? सुखाच्या कल्पना बदलल्यात का? काही ठराविक स्त्रिया उत्तूंगता गाठतात बाकी सगळेजण नेहमीच्या रहाटगाडग्यात अडकतात का? त्यांना “ना जूने सोडवत ना नवीनच्या” मागे धावता येत, अशी कुचंबणा होते का? स्पर्धेचा दबाब जाणवतो का? पुरुष आणि त्यांची बांधिलकी जाचक वाटते का? स्व-अस्तित्व तयार करण्यामागे इतरांचे अस्तित्व नाकारले जाण्याची भिती वाटते का? येणारे अनेक प्रसंग स्त्रित्वाची आणि एकूणच परिस्थितीची कसोटी ठरणारे आहे का? अशा अनेक प्रश्नाने ग्रासलेले स्त्रीमन संकटाच्या वेळीच सावध होते. अन्यथा नेहमी कोषातच रहाण्याची सवय कधी कधी महागात पडते. एकदम खडबडून जागे होतात तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आज विज्ञान, तंत्रज्ञान, साधने आणि पैसा सर्व काही उपलब्ध असतानासुध्दा काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. ज्यांची उत्तरे कधी मिळणार? समस्या कधी संपत नसतात, स्वरूप बदलते, समाधान बदलते. तसे अनेक नवीन पर्यायपण उपलब्ध होतात, फक्त आपली दृष्टी, विचार आणि मानसिकता बदलावयास हवी. नौकरी, धंदा, आणि व्यवसाय सांभाळताना घराकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होणार हे गृहित धरावयास हवे. अन्यथा दुसरी पर्यायी व्यवस्था उभारण्यास मदत करावयास हवी. सर्वांचा सहभाग हा कोणत्याही कामात महत्वाचा ठरतो. ज्या समस्या शहरात तशाच किंवा त्यापेक्षा जास्त गांवात आणि खेड्यांत असू शकतात. शिक्षणामूळे हक्क आणि स्वातंत्र्याची ओळख होते पण कोणतेही काम हलके वाटणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे परिणामी बेरोजगारी किंवा नाईलाजाने कोणतेही काम करावयास लागणे. शिक्षण घेतले म्हणजे सुशिक्षीत झाले असे नव्हे. त्यासाठी लागणारी मनाची प्रगतीपण अपेक्षित असते. संस्कारक्षम जगणे आणि जगायचे म्हणून जगणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सगळीकडे संघर्ष आहे तो टाळून पुढे जाणे किंवा स्वत: सक्षम बनणे हे पर्याय असू शकतात. आर्थिक साक्षरता म्हणावी तेवढी अजून महिलांना जमत नाही ती शिकून घेणे. तांत्रिक क्षेत्र, जिथे शारिरीक तंदुरुस्ती आवश्यक असते तिथे स्त्रियांचा नैसर्गिक कमीपणा जाणवतो तिथेसुध्दा जास्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील मुलभूत फरक लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. आताची पिढी जास्त तंत्रज्ञान प्रभावित आणि हिशोबी आहे. त्याच्या पुर्ण आहारी न जाता सावधगिरी बाळगणे कधीही श्रेयस्करच ठरेल. तसेच मुळात “मला काय हवे” याची पुर्ण जाणीव स्वता:ला आणि इतरांना देण्यात यशस्वी होणे हे अत्यंत गरजेचे आहे. फार कमी लोकांना हे जमते पण प्रयत्न करावयास काय हरकत आहे. चला तर मग नवीन स्वयंसिध्दतेचे आणि सक्षमतेचे पाऊल उचलूया आणि स्वत: बरोबरच इतरांचेही भले करुया.

फारच सुंदर, भाईंबदधलचे विचार
ReplyDeleteDhanyawad 🙏 Bhau👍
Deleteतेवढी प्रगल्भता दोघांमध्येही असणार म्हणूनच शक्य झाले
ReplyDeleteहा महत्त्वाचा मुद्दा आपण अधोरेखित केलात. फारच छान
धन्यवाद
Deleteधन्यवाद
Delete