बायका कुठे काय करतात?

              सर्वसाधारणपणे सगळ्यांचा गोड गैरसमज असतो, बायका कुठे काय काम करतात? पण खोलात जाऊन विचार केला तर सगळे काही बायकाच करतात.  बघा हं, बाई नसलेले घर आणि बाई असलेले घर याच्यातील फरक कळतोच ना!  सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यात जास्त काम कोण करत असेल याचा कोणी विचार केला आहे का? काय करीत नाही बायका? आई, बहीण, बायको आणि नंतर मूलीच्या स्वरूपात स्त्रिया प्रत्येक पुरूषाच्या जीवनात येतच असतात.

           नौकरीवाली किंवा गृहिणी असो, सगळ्या कामाची जबाबदारी स्वता:ची समजून ती वागत असते. म्हणूनच इतरांना (मूले व नवरा) बिनधास्त आपआपली कामे करू शकतात ना?  तीच बाई जेव्हा नौकरीवाली असते तेव्हा थोडीफार कामे ती इतरांना हस्तांतरीत करु शकते. (पाळणाघर, स्वयंपाकीण किंवा घर सांभाळणारी) मात्र अंतिम जबाबदारी तिचीच असते. याचाच ताण स्त्रियांना जास्त होतो. तिचे दुर्लक्ष झाले की सर्व घराला त्रास होतो म्हणून तिला कायम जागरुकच रहावे लागते. ठराविक रितीरिवाज व परंपरा पाळायच्या, आई व सासू यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामे झाली पाहिजेत हा अप्रत्यक्षरित्या घालून दिलेला नियम तिलाच लागू असतो. एकवेळ नवरा, मुलगा, वडील एखादी गोष्ट विसरू शकतात पण तिला ती मुभा नसते. तरीही “गरीब बिच्चारे पुरूष” असा सगळ्यांचा दावा असतो.

           गृहखाते म्हणून “मोठेपणा” दिला की, पुरुष स्वत: अलिप्त राहून इतर कामे करू शकतो. त्या गृह खात्यात सुप्तरित्या अनेक खातीपण असतात हे कुठे कुणाला कळते? देशाचे गृहखाते फक्त देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम बघते.  इथे मात्र नागरी विकास (पालन पोषण), वित्त मंत्री (येणारे उत्पन्न उत्पन्न आणि खर्च यांची सांगड), शिक्षण मंत्री(मुलांचा अभ्यास, प्रवेश, फी आणि त्यांच्यावर लक्ष), आरोग्यमंत्री (कुटूंबाची शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य  सांभाळणे) आणि राजशिष्टाचार मंत्री (आले- गेलेले पाहूणे, पाहुणचार, सासर-माहेरचे संबंध सांभाळणे अशी अनेक खाती घरातील स्त्री लिलया सांभाळत असते. तेही विनाशर्त, विनामोबदला आणि विनाकौतूक. उलट काय करतात, बसून खातात, टिव्ही बघतात, सामाजिक माध्यमाद्वारे चर्चा करतात, अशा अनेक वागबाणांनी घायाळ करणारे पुरूष जास्त असतात. अर्थात ज्यांना या सर्व कामांची जाणीव असते ते असे कोणालाच हिणवू शकत नाहीत हा भाग वेगळा!

         असे कुणी कोणी काही बोलले तरी आपण मनाला लावून घ्यायचे नाही, हे आता 29 वर्षाच्या संसारानंतर कळून चूकलेले आहे. आपण काम करीत रहावे, बोलणारे बोलत राहू दे, असा एक तटस्थपणा स्विकारल्यामूळे डोक्याला जास्त त्रास होत नाही. ज्यांना हे जमत नाही त्यांना मात्र या गोष्टींचा खूप त्रास होतो. मग त्या त्रास सहन न होऊन एक तर आजारी तरी पडतात किंवा त्यांचा जीवनाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन वाढत जाऊन, लवकर निराश होतात.

           अहो, बाई हा घराचा “कणा” असतो, तो ताठच रहावयास हवा. ताठ रहावा म्हणून इतरांनी साथ द्यावयास हवी. नाहीतर एकटी बाई काय काय करणार?  म्हणून एखाद वेळी काहीच करत नसता राहीली तर चालेल का तुम्हाला?  बायकांना काय हवे असते. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटतात. खूप मोठ्या अपेक्षा नसतात. नव-याची साथ आणि जाणीव हे आपोआपच सर्व काही देऊन जाते. तेवढे मात्र जमावयास हवे. कौतूक करणे जमले नाही तरी निदान दोष देणे तरी टाळणे महत्वाचे! मग प्रत्येक घर “स्वर्गाहून सुंदर” आणि कल्पनेपेक्षा भारी वाटेल तुम्हाला! शेवटी घर सांभाळण्याची जबाबदारी दोघांची असते ना, मग ती वाटून घेतली तर काय बिघडेल. दोघांनीही आपआपसात एकमेकांना समजून घेऊन ती पार पाडली तर “सोन्याहून पिवळे”! एवढे तरी कराल ना मग! तुम्हाला काय वाटते ते सांगा!

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव