जीवन एक खेळ

 

          यावर्षी नुकताच ऑलिंपिक फिवरने जोर धरून भारतात सगळीकडेच जोश अनुभवला. अनेक कथा,  खिलाडूवृत्ती, जिद्द, टोकाचे परिश्रम यांचे अभूतपुर्व दर्शन घडविले. एकूण 7 पदकांची (1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉंझ) कमाई आपण केली. यातून आपण काय शिकलो हे महत्वाचे!  या निमित्त मला पडलेले काही प्रश्न!

(अ)  मोठ्या शहरांपेक्षा लहान गावात अनेक हिरे दडलेले असतात. विपरीत परिस्थितीतसुद्धा अनेक अडचणींवर मात करून ते त्यांचे अपेक्षित ध्येय गाठतात.

(ब)  वैयक्तिक स्वार्थापेक्षा सांघिक यश महत्वाचे. “माझा देश आणि माझा खेळ”हे एकच ध्येय सगळ्या समोर होते. (जे इतर वेळी आपण का दाखवत नाही?)  

(क) सगळ्या सुविधा असतानासुध्दा शहरी मूले खेळाकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना खेळाचे व्यवसायमार्ग (Career) म्हणून आकर्षण का वाटत नाही?

(ड)  शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्यामध्ये खेळ हा अविभाज्य घटक नाही का?

(इ)   खेळ हा सक्तीचा विषय करता येऊ शकेल का?

(ई)   पालकांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक नाही का?

(उ)   परदेशात जसे संपूर्ण प्रोत्साहन (प्रशिक्षण, आहार, साहित्य) दिले जाते तसे आपल्याकडे का दिले जात नाही?

           खेळ हा नुसता खेळ नसतो ज्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत असतात, ज्याचा उपयोग आयुष्यात अनेक समस्यांना तोंड देताना सुध्दा होऊ शकतो. असे म्हणतात जे लहानपणी जास्त खेळतात त्यांचे आयुष्य इतरांपेक्षा जास्त सूखी आणि शांतताप्रिय असते. स्पर्धा, जिद्द, विरोधकांवर मात करणे, अंगभूत कौशल्याचा विकास याचा एक सुंदर अविष्कार बघून प्रेक्षक सुध्दा या खेळाडूशी तादात्म्य पावतात, परिणामी दोघांनाही देशाचे नाव उंचावण्याचा आनंद मिळतो. यानिमित्त जपानचे कौतूक करावे तेवढे थोडेच. कोविड सदृश्य परिस्थितीत प्रायोजकत्व निभावणे आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून विविध खेळाचे आयोजन दिमाखात पार पाडणे हे एक मोठे दिव्य होते.  खेळ म्हटला तर हार-जीत अपेक्षित असते. किती छोटे देश पदके कमावतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून आपण मात्र दर्जेदार खेळाडू तयार करू शकत नाही. आता मिळालेल्या पदकसंख्येवरून प्रोत्साहन मिळवून नवीन खेळाडू पुढच्या ऑलंपिक पर्यंत तयार होतील का? आपण कायम क्रिकेटच्या प्रेमात रहाणार का?  खेळ ही श्रीमंताची मक्तेदारी असा गैरसमज कधी दूर होणार?

          आमच्या लहानपणी मुलींची शाळा असूनसुध्दा आम्ही सर्व खेळ खेळत होतो. तेव्हा शिक्षक आणि पालक या दोघांचा कधी विरोध नव्हता. पुर्ण 10वी होईपर्यंत आम्ही सर्व खेळ व्यवस्थित खेळत होतो. त्यामूळे शारिरिक आणि मानसिक वाढ होण्यास मदत झाली. त्यामूळे आम्ही आमच्या मूलींनासुध्दा 12वी पर्यंत कायम खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी आपाआपले मार्ग स्विकारले. लवचिकता आणि तडजोड ह्या मुलींच्या बाबतीत जमेच्या बाजू असतात त्यामूळे मूली जास्त खेळात पुढे जाऊ शकतात. लहानपणी मुलांना एक तरी खेळ चांगला शिकवला की 1) खिलाडूवत्ती अंगी बाणवते त्याचा उपयोग त्याला तहहयात होतो. 2) मानसिक आणि शारिरिक आरोग्य सुधारते. 3) खेळामूळे एकाग्रता वाढीस लागते त्यामूळे जीवनाच्या स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता वाढते. 4) मुले शिस्तप्रिय होतात आणि 5) मुलांचा वेळ सत्कारणी लागतो, कुसंगतीत पडत नाहीत.

          जे मैदानी खेळाच्या बाबतीत तेच बैठ्या खेळांच्या बाबतीतसुध्दा. तिथेही मनाचा कस लागतो.  मात, प्रतिमात, बुध्दीने खेळायचे, स्मरणशक्ती आणि तर्कशास्त्र याचा ताळमेळ घालणे, संयम बाळगणे ईत्यादी.  ऑलंपिक पुरताच खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन मर्यादित न ठेवता खेळाकडे कायमच गांभिर्याने बघण्याची वेळ आलेली आहे. सैन्यातले, शासकीय खात्यातले करीअर अधिक नौकरी सांभाळू शकतात तर इतर खात्यातले का नाही सांभाळू शकत?  खेळ हा ठरावीक वयापर्यंत खेळता येतो. त्यासाठी कायम फीट रहावे लागते आणि मेहनत करावी लागते पण खेळाचे वय संपल्यावर पुढे काय? यामूळे खेळाडू निर्माण होण्यात अडचण होते. परंतू आता सर्वच क्षेत्रात अनिश्चितता आहे.  जीवनामध्ये सर्वांगिण विकास साधण्यासाठी खेळ हा अपरिहार्य घटक आहे. अगदी उतारवयात सुध्दा कमी अधिक प्रमाणात आपण खेळ जोपासू शकतो. अशा या प्रश्नांकडे खेळ मंत्रालय, पालक आणि पाल्य प्राधान्य देतील का?  लवकरच याची झलक बघावयास मिळो हीच अपेक्षा!  


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव