माणुस सवयीचा गुलाम

            असे म्हणतात की “माणुस सवयीचा गुलाम” असतो. लहानपणापासून लागलेल्या सवयी सहसा लवकर सुटत नाहीत मात्र त्या चांगल्या हव्यात, लवचिक हव्यात, काळानुसार बदल करण्याची मानसिकता हवी. काही जणांचे संबंध या सवयीवरून बिघडतात. आपल्या सवयीमुळे इतरांना त्रास होतो का? याचाही विचार झाला पाहिजे. जसे की, काही जणांना भल्या पहाटे उठायची सवय असते. चांगली सवय आहे पण तो किंवा ती एकटीच उठून बसली /बसला आणि इतरांना उठा,उठा करायला लागला तर कसे चालेल? लवकर उठणे ही सवय कधीही चांगली पण इतरांवर बंधनकारक ठरू नये. प्रत्येकाच्या शरीराचे घड्याळ वेगवेगळे असते. त्यात बदल करणे सहजासहजी शक्य होत नाही पण प्रयत्न करावयास हरकत नाही.

           फार पुर्वी मी “अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी” हे पुस्तक मुलींना आणून दिले होते. मी पण स्वत: वाचत होते. आपल्या वागण्यातल्या ब-याचशा चुका त्यामूळे कळत गेल्या पण मुली कदाचित विसरुन गेल्या असतील. खरे म्हणजे अशी पुस्तके जीवनात अत्यंत आमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. लेखकाने अगदी विस्तृतरीत्या समजून सांगून यशाची परिभाषाच बदलून टाकलेली आहे. अनेक किस्से, उदाहरणे आणि आपली वागणूक याबाबत विस्तृत मार्गदर्शन व सुधारण्यास वाव कसा देता येईल याचे विवेचन केलेले आहे. एवढे मोठे पुस्तक बघून खरे तर कधी संपेल याचे दडपण येते पण हळूहळू विचारांचा पगडा आपल्याला जाणवतो.

        काम करण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. वैयक्तिक आयुष्यात, सामाजिक जीवनात आणि दैनंदिन व्यवहारात अशा सवयी व्यक्तिपरत्वे बदलणा-यासुध्दा असतात. चांगल्या सवयींचा जसा फायदा होतो तसेच दिर्घकालीन आपली मानसिकताही चांगली रहाते. याउलट वाईट सवयींमूळे आपण स्वत:चे व इतरांचेही नुकसान करीत असतो. त्यासाठी बदल घडवून आणण्याची मानसिक आणि नंतर शारिरीक तयारी हवी. कोणी सांगितले, वाचले म्हणून लगेच बदल होईल असे नव्हे, त्यासाठी मनापासून सवय बदलण्याची जाणीव झाली पाहिजे. जसे की, सकाळी लवकर उठले की अनेक फायदे होतात हे सगळ्यांना माहित आहे पण किती जण उठतात? बरे जे उठतात ते, तरी काही विधायक कामे करतात का? की उगीच लोळत पडतात किंवा मोबाईल चाळत बसतात मग त्या लवकर उठण्याचा उपयोग काय?  शिवाय मी “लवकर” उठतो म्हणून इतरांना कमी लेखायचे हे ठरलेले असते.

       काही जणांना लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय असते. त्यामूळे कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. काहीजण कायम नकारात्मक विचार करतात आणि कामे होत नाहीत म्हणून कांगावा करतात. त्यासाठी मानसिक संतुलन आणि विचारांची परिपक्वता असणे महत्वाचे असते.काही पथ्य पाळली तर या सवयींवर मात करणे शक्य आहे. 

(1) काही अलिखीत धारणा किंवा तत्वे आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलेली असतात त्यांना छेद द्यावा लागेल.

(2) मी कधीही हरणार नाही. परिस्थितीवर मात करेन हा स्वत:वरचा दृढविश्वास कायम असला पाहिजे.

(3) स्वत:हून कामात, वागण्यात आणि बोलण्यात पुढाकार घेतल्यास आपोआप समोरची व्यक्ती प्रतिसाद देते.

(4) कामाचे,जबाबदारीचे प्राधान्य ठरवा.(First Come,First Serve) नेहमी शक्य नसले,तरी शक्यतो हा नियम पाळावा.

(5) मी एकटा नाही, इतरांची मदत घ्यावी लागणार आहे, मग ती प्रेमाने की जबरदस्तीने घ्यावयाची ते ठरविणे.

(6) कोणत्याही परिस्थितीत आपण सहकार्य दिले तरच आपल्याला इतरांकडून सहकार्य परत मिळणार हा विश्वास बाळगावा.

(7) कायम काळाबरोबर व इतरांबरोबर चला. इतरांना काय पाहिजे याचा मागोवा घ्या. स्वत:चे इप्सित साध्य होईल.

        साधारणपणे मी, “अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी” या पुस्तकातून काढलेला हा “लेखाजोखा” असे म्हणता येईल. पुर्ण पुस्तक अजून अमंलात आणायला आयुष्य पुरेल का?असा प्रश्न आहे. उशीरा का होईना जर आपल्याला एखादी अमुक एक सवय त्रासदायक आहे किंवा काहीतरी सुधारणा करण्यास हवी असे वाटत असल्यास नक्कीच करावी. जेणे करून आपआपसात चांगले संबध निर्माण होतील, कटूता टाळता येईल. अजून काय पाहिजे आपल्याला? करणार ना प्रयत्न?

     बाय द वे, पुरुष बायकांचे गुलाम असतात असे म्हणतात. खरे आहे का ते? की बायकाच गुलामगिरी स्विकारतात? हा प्रश्न “To be or Not to be” एवढा गहन आहे असे मला कधी कधी वाटते.  तुम्हाला काय वाटते?

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव