दहशतवाद - एक समस्या
सध्याचा ज्वलंत विषय आणि सगळया जगाला ग्रासलेली समस्या म्हणजे
“दहशतवाद” असे म्हणता येईल. दहशतवाद म्हणजे नक्की काय? एखाद्याने दुस-यावर कुरघोडी
करून दबाव आणणे, स्वत:चे वर्चस्व सिध्द करणे किंवा भितीदायक परिस्थिती निर्माण करून
नाईलाजाने किंवा भीतीने नको ते काम करण्यास भाग पाडणे अन्यथा त्यांना शरण जाणे एवढाच
एक पर्याय उपलब्ध असतो. असा दहशतवाद जिथे दोन गटांमध्ये मतभेद असतात, तिथे शस्त्र
आणि शास्त्र यांच्या मधील संघर्ष, जात, धर्म, वंश आणि सत्ता यासाठी कोणत्याही
थराला जाऊ शकतात. दहशतवाद हा
जन्मल्यापासून प्रत्येक प्राण्याच्या वाट्याला येतच असतो. काही जणांना छोट्या
छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो तर काही जणांना आहे ते टिकवण्यासाठी किंवा
नवीन क्षेत्र काबीज करण्यासाठी करावा लागतो. “इथे बळी तो कान पिळी” चा न्याय लागू
होतो. हा केवळ शारिरिक, मानसिक आणि आर्थिक आघाडीवर नसतो तर कधी कधी भावना, इर्षा,
प्रेम आणि हिंसात्मक स्वरुपाचादेखील असू
शकतो. त्याला तोंड देण्यासाठी मानसिकरीत्या सक्षम होणे आणि आपल्या हक्कांची जाणीव
करुन देणे हे महत्वाचे ठरते. आपल्या देशावर तर कायम अनेकांनी आक्रमण केले. अगदी शक, मुघल, अब्दाली, पोर्तूगीज ते इंग्रजापर्यंत,
यांनी अनेक प्रकारे, अनेक वेळा आक्रमण केले. हे सर्व झेलून आणि त्यांना सामना देत,
स्थित्यंतर टिकवून आपण अजूनही टिकून आहोत. त्याशिवाय अनेक अंतर्गत दहशतवाद,
प्रांतीय स्वायत्तता, कडवी विचारसरणीचे लोक यांच्यामूळे देशातील लोकांचे स्वातंत्र्य,
जीव, संपत्ती यावर गदा येऊन अशांतता फैलावते. न्याय मागण्यासाठी कायदेशीर मार्गाने
लढा देणे योग्य असते पण त्यासाठी शस्त्रांचा वापर आणि मनुष्यहानी टाळणे गरजेचे
आहे. आपल्याकडे सैन्य, पोलिस कायम तैंनात
असतात म्हणून सर्वसामान्य माणूस सुरक्षित आहे, अन्यथा कठीण झाले असते. जगात अशी
अनेक उदाहरणे आहेत,जी दहशतवाद करून जगात अशांतता निर्माण करून प्रगतीस खिळ घालतात.
नुकताच करोनारुपी
दहशतवाद आपण गेले वर्षभर अनुभवतो आहे. या विषाणूरुपी दहशतवादाने जगातील प्रजेला मोठ्या
प्रमाणात जिवीत- वित्तहानीस सामोरे जावे लागले,त्यामूळे जगाची प्रगती खुंटली. अशी
अनेक आव्हाने पेलण्यासाठी कोणता तरी मार्ग शोधावाच लागतो. सामुहीक प्रयत्नाने,लस
आणि पथ्य पाळून यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शत्रू दृश्य असो वा अदृष्य त्याला जोपर्यंत विरोध
करीत नाही तो पर्यंत त्याचा जोर असतो अन्यथा नाही. दहशतवाद छुपा हल्ला करून जिवित
व वित्त हानी करुन देशाच्या मान-सन्मानाला इजा पोहचवत असतो. त्यांना आपण सडेतोड
उत्तर देत असतो आणि त्यामूळे होते काय आपले दैनंदिन आयुष्य ढवळून निघते,निष्पांप
लोकांचा बळी जातो.
मानसिक आणि शारिरिक
दहशतवादपण असाच संपवावा लागतो. ब-याचवेळा घरात स्वकिंयाकडून अशा दहशतवादी वृत्तीचा
सामना करावा लागतो. त्यासाठी हल्ली हेल्पलाईन, समुपदेशक आणि डॉक्टरी इलाज करता येऊ
शकतात. मात्र याला ठामपणे वेळीच विरोध करावयास हवा नाहीतर “जाऊदे, जाऊदे” म्हणून
त्याचा भस्मासूर निर्माण व्हायला वेळ लागत नाही. विष्णूला अवतार घेवून त्याला
युक्तीने ठार करावे लागते. यासाठी लहानपणापासून सुरक्षिततेचे नियम, धैर्य आणि
मुकाबला याचे प्रशिक्षण,शाळा, कॉलेजस्तरावर तसेच घरातूनही आणि आवश्यक तेथे
प्रशिक्षण सक्तीचे करावयास हवे. जेणेकरून मुलांना स्वता:चा बचाव स्वत:च करता
यावयास हवा. कोणीही, कसाही अत्याचार सहन करणारासुध्दा तेवढाच जबाबदार असतो. वेळीच त्याने
किंवा तिने आवाज न उठवल्यास पुढे मोठा गुन्हा किंवा अत्याचार होण्यापासून वाचवता
येईल. जसे लहान मूले, स्त्रिया, वृध्द माणसे, अपंग, गरीब यांच्या असहाय्यतेचा फायदा
घेऊन त्यांना लूटणारे किंवा त्यांच्यावर अत्याचार करणारेसुध्दा असतात. धार्मिक तेढ
निर्माण करणे, अफवा पसरवणे, गुन्हेगारांना पाठीशी घालणे हे एक प्रकारे आपणच
दहशतवादाला प्रोत्साहन देत असतो. तेव्हा हे सर्व टाळा आणि वेळीच विरोध दर्शववा.
सुरक्षित रहा आणि स्वत:ची व इतरांची काळजी घ्या.
Comments
Post a Comment