मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
कंपनीचे “मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)” हे संपूर्णपणे व्यवस्थापन, प्रशासन, लेखापरिक्षण, संचालक मंडळ आणि संस्थेचे दैनंदिन कामकाजाला जबाबदार असतात. हे महत्वाचे जबाबदारीचे पद खाजगी क्षेत्रात मानाचे समजले जाते. जेवढे जास्त अधिकार, तेवढी जास्त जबाबदारी हे ठरलेले आहे, त्यामूळे त्यांना कंपनीचे सर्वेसर्वा समजले जाते.
मुख्य कार्यकारी
अधिकारी (CEO) पदासारखे महत्व गृहपुरूष किंवा कुटूंबप्रमूख या व्यक्तीला असते. मग
तो “नवरा” किंवा “वडील” असो,कधी ते “आजोबा” असतात. जशी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
मूळे कंपनी भरभराटीला येते तसेच घराचा मुख्य नेता योग्य असला की, घराची व त्यातील
माणसांची आपोआप भरभराट होते. ब-याच वेळा स्त्रियांची गृहिणी, घरमालकीण, घर
बनविणारी आणि सगळ्यांना बांधून ठेवणारी, अशी चढत्या भाजणीने प्रशंसा होते. या
सगळ्यामागे तीचा वडील किंवा नवरा भक्कमपणे पाठीशी उभे राहिले तर शक्य होत असते.
जरी काही वेळा पुरूष आक्रस्ताळी, आक्रमक किंवा हेकेखोर आढळत असला तरी त्याची
त्यामागची भुमिका ही समजून घ्यावी लागते. तसेही पुरूषांना संकटाची चाहूल बायकांपेक्षा
आधी लागते असे म्हणतात कारण ते व्यवहारी दृष्टीकोन बाळगतात. त्यामानाने बायका फार
कमी वेळा असा व्यवहारीपणा दाखवू शकतात. ममता, भोळेपणा आणि भावनाशीलता त्यांना
कधीकधी चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते.
आजच्या
समानतेच्या युगात कितीही नाही म्हटले तरी एकमेंकावर अवलंबून रहावेच लागते. श्रम
विभागणी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वावलंबन शक्य असले तरी पुर्णपणे समर्थ होणे शक्य
नाही कारण त्याला नैसर्गिक क्षमता लागू आहे.
कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी एकवेळ अशी येते की, आपले घर, मुले, संसार
आणि आधाराची गरज निर्माण होते. त्यासाठी लागणारी तडजोड दोघांनी करणे अपेक्षित
असते. मग “मीच का तडजोड करावी?” हा कळीचा
मुद्दा उभा रहातो आणि कित्येक जण पटत नाही म्हणून वेगळे रहातात. सगळेजण असा विचार
करायला लागले तर कसे होणार? जबाबदारी नको, मजा हवी. हक्क पाहिजे,कर्तव्य नको. सुख
हवे पण तडजोड नको असे एकच कसे मिळेल? या
सर्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामूळे दोन्ही स्विकारणे अपरिहार्य आहे.
शिक्षण, हक्काची जाणिव, कमालीची स्वतंत्र
वृत्ती आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचा अभाव यामूळे परस्पर सामंजस्य धोक्यात येत
आहे. त्याच्या परिणामी विवाहसंस्था धोक्यात आलेली आहे. त्याचे कारण समजून घेऊन आता
आपण मुलांचे व मुलींचे विवाहपुर्व समुपदेशन किंवा शिक्षण झाल्याझाल्या समुपदेशन
करावे असे वाटते. जसे की, 10वी किंवा 12वी
नंतर मुलाचा किंवा मुलीचा शैक्षणिक कल तपासणीसाठी “समुपदेशन चाचणी (Counselling Test)”
करतात. विभक्त कुटूंब पध्दती, नौकरीवाली आई, एकूलता एककिंवा एकुलती एक लाडोबा लग्नाच्या
वेळी गोंधळून जातात. अशा वेळी त्यांना योग्य दिशेने वळविणे ही वेळेची गरज असते.
मुख्य कार्यकारी
अधिकारी नेमणे हे एक जिकीरीचे काम असते कारण कंपनीचे भवितव्य त्याचा हातात असते.
तीच गोष्ट लग्न आणि नवरा शोधणे या बाबत अंमलात आणावी लागते. दोघांनी पटवून घेतले
तर ठीक नाहीतर भांडणे किंवा वादविवाद आहेतच. त्यात आता कामाचे तास वाढल्यामूळे
ताण-तणाव आणि इतर जबाबदा-यापण नाकारता येत नाही. अशावेळी गरजांचे प्राधान्य ओळखून
त्याप्रमाणे वागणे अपेक्षित असते, अन्यथा ठिणगी पडू शकते.
व्यक्तिमत्व विकासात “तुम्ही तुमचे मुख्य कार्यकारी
अधिकारी व्हा” असे सांगितले जाते. त्यात स्वत:बरोबर इतरांचाही विकास करणे अभिप्रेत
असते. हे साध्य झाले की, आपोआप कुटूंब,
समाज आणि देश यांचाही विकास होतो. म्हणूनच “स्वत:ला स्वत:चे मुख्य कार्यकारी
अधिकारी” आहे,असे समजणे आणि तसे वागणे हे किती महत्वाचे आहे हे कळेल. बघा पटते का?
प्रयत्न करा “CEO”बनण्याचा आणि बनविण्याचा!
बाय द वे,तुमच्या घरातील “CEO” कसे आहेत? सगळ्यांना बरोबरीने घेऊन चालतात ना, की एकतर्फी कारभार आहे ? तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
Comments
Post a Comment