चेहरे की मुखवटे?
“चेहरा क्या देखते हो. दिल मे उतरके देखो ना” ...आशाताई आणि कुमार सानु यांनी गायलेले हे गाणे किती अर्थपूर्ण आणि सत्य परिस्थिती उलगडून दाखविणारे आहे. असे ही चेह-यांवर मुखवटे घालूनच आपण वावरत असतो. कोणत्याही गुप्तहेर मालिकेत ही वाक्ये ठरलेली असतात. चेहरा कधी फसवणूक करेल ते सांगता येत नाही. हस-या चेह-याची माणसे सगळ्यांना आवडतात पण त्या हसण्यामागे किती दु:ख आणि न्युन लपलेली असतात ते त्या परमेश्वराला ठाऊक! दिव्यांग मूले सुंदर, प्रेमळ व लाघवी असतात मग त्यांना असे का बनवतो? हा प्रश्न मला नेहमी पडतो. वैभवाच्या किंवा समृध्दीच्या आणि आनंदाच्या अत्युच्य शिखरावर असतानासुध्दा काही चेहरे कायम दुर्मूखलेले असतात हे ही एक कोडेच आहे.
माणूस मोठा होत जातो तसा तो अनेक मुखवटे घालायलासुरू करतो. कधी परिस्थितीमूळे तर कधी काळाची गरज तर कधी अपरिहार्यतानुसार या बेगडी दुनियेत स्वत:चा खरा चेहरा हरवतो हे त्यालासुध्दा कळत नाही. नुकताच अमिताभ बच्चनचा “चेहरे” हा चित्तपट बघण्यात आला. त्याचा नित्कर्ष एवढाच होता, “प्रत्येक चेह-यामागे एक गुन्हेगार दडलेला असतो त्याला वेळीच उघडे पाडणे आणि तात्काळ न्याय देणे, गुन्ह्याचे स्वरुप बघून तशी शिक्षा देणे हे जोपर्यंत जलद होणार नाही तसे हे चेहरे / मुखवटे वाढत जाणार. परिणामी गुन्हेगारी वाढणार आणि सामाजिक मुल्यांचा -हास होत जाणार,” विचार करण्यासारखा विषय होता.
हल्ली चेहराविरहित (Faceless), पारदर्शक व्यवहार म्हणून आपण डिजीटल तंत्रज्ञाचा खुप उदोउदो करतो. त्यामुळे अनेक नवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि अशा व्यवहारात मुख्य चेहरा शोधणे कठीण होत आहे. तशी यंत्रणा अजून सक्षम नाही. चेह-यावरून माणूस ओळखणे खरेच कठीण आहे. त्यासाठी एकतर ज्योतिषशास्त्र किंवा न्यायवैद्यक शास्त्र (Forencic Science) शिकावयास हवे. कित्येक फसवणूकीचे व्यवहार या गोड चांगल्या चेह-याआडून होत असतात. विश्वास ठेवणेसुध्दा कधी कधी कठीण होते. सुंदर, सात्विक चेहरा पाहून बरेच जण भूलतात. प्रत्यक्ष संबंध आल्यानंतर हे लपून ठेवणे कठीण जाते. जेव्हा कळते तेव्हा खुप उशीर झालेला असतो. स्त्री-पुरुष या दोन्हींच्या बाबतीत हे घडू शकते. कधी कधी तर प्रेमापोटी आणि आकर्षणापोटी कित्येक न करावयाच्या गोष्टीपण केल्या जातात आणि समाज त्याला नाईलाजाने मान्यता देतो.
आपले संस्कार, विचार आणि वर्तवणूक दर्शविणारा आरसा म्हणजे आपला चेहरा असतो. तो कधी फसव्या रुपात चेह-यावर उमटविण्याचे काम करतात ते त्या व्यक्तीला देखील कळत नाही. निरागसता, चैत्यन्य आणि हसू या गोष्टींमूळे चेहरा सुंदर दिसतो असे म्हणतात. हल्ली वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामूळे (Cosmotology) कोणाचाही चेहरा आपण बदलू शकतो. तसेच आधूनिक त्वचाविशेषतज्ञांकडून (Dermitologist) पुर्ण व्यक्तिमत्वही बदलणे शक्य झाले आहे.याचाही उपयोग करुन घेतला जातो.
हे सर्व खरे असले तरी आपला खरा चेहरा आपण सांभाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सगळ्या जगाला फसवले तरी माणुस स्वत:च स्वत:ला फसवू शकत नाही असे म्हण्तात. तसेच एखादी संस्था, समूह किंवा कंपनी एखाद्या माणसाच्या कर्तूत्वाची ओळख पटवून देत असते. जसे की, टाटा, नारायण मूर्ती, अझीझ प्रेमजी यांचे चेहरे भलेही सुंदर किंवा आकर्षक नसतील परंतू त्यांचे कर्तृत्व हेच त्यांच्या संस्थेचा “चेहरा” उजळण्यास कारणीभूत ठरतो.
श्यामच्या आईने श्यामला सांगितले होते, “तु जसे पायाला चिखल लागू नये म्हणून जपतो, तसेच मनालाही चिखल लागू देऊ नकोस,” हीच गोष्ट सर्वांना लागू आहे. मनातल्या विचारांचा, प्रलोभनांचा परिणाम नक्कीच चेह-यावर दिसून येतो. “मन करा प्रसन्न हे सर्व सिध्दीचे कारण” असे रामदास स्वामी म्हणतात ते उगीच नाही. खरी मेख आपल्या चेह-यात आहे. मग सांभाळणार ना हा आरसा?
चेहरे की मुखवटे? दिल को देखो चेहरा न देखो! चेहरे ने लाखों को लूटा!
https://www.youtube.com/watch?v=CoN9LbZS27E
Comments
Post a Comment