आयत्या बिळावर नागोबा.

                माझ्या मैत्रीणीचा नवरा कायम  मैत्रीणीला बसून खाते म्हणून चिडवत असतो तरी बरे बायको नौकरी करणारी आहे. इतर गृहीणीबद्दल काय बोलला असता?  बसून खाणे म्हणजे काय हे मला कळले नाही. माझ्या मते काहीही काम न करता “आयत्या बीळावर नागोबा” या अर्थाने असावे पण आपल्या सारख्या मध्यम वर्गात असे बसून खायला कोणालाच मिळत नाही. काहीना काही तरी काम करावेच लागते अपवाद फक्त लहान मूले, दिव्यांग आणि म्हाता-या माणसांचा असावा.  पिढीजात श्रीमंत असणारेसुध्दा दुस-यांना असे कधी म्हणत नसतील.

            असा हा विचार करायला लावणारा वाक्प्रचार मनाला कधी कधी खुप त्रास देतो. जसे की, शिपाई लोकांना त्यांच्या वरच्या लोकांबद्दल असाच गृह असतो की हे मस्त “खुर्चीत फॅनखाली” बसतात आणि आदेश सोडतात. सर्वसाधारणपणे सरकारी खात्यात माणूस हलला नाही तरी चालेल पण नस्ती (File) हल्ली पाहिजे त्याशिवाय कामे पुढे सरकत नाहीत. दहा लोकांच्या हाताखालून गेल्यावर त्या फाईलवर काहीतरी निर्णय घेतला जातो,  हे निर्णय घेणारे आयते “खुर्चीवर बसून” निर्णय घेतात असे म्हणता येईल का?  त्यासाठी वेगवेगळे संदर्भ, संभाव्य परिणाम आणि स:द्यस्थिती याचा सांगोपांग विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे शक्यच होत नाही.

         जी गोष्ट सरकारची तीच व्यक्तीची, कोणताही निर्णय मग वैयक्तिक असू दे नाहीतर सार्वजनिक त्यासाठी लागणारी प्रक्रिया मोठीच असते म्हणून त्याबद्दल शंका घेण्यात अर्थ नाही. बसल्या ठिकाणी हल्ली बरीच कामे होतात. ऑनलाईन व्यवहार, मोबाईल आणि संगणकामूळे शक्य होतात परंतू त्यासाठी परवलीचा शब्द (Password),खाते (Account), CAPTCHA  (Completely Automated Public Turing Test to Tell Computers and Humans Apart), ओटीपी (One time Password) असे अनेक कार्यपध्दतीतून जावे लागते. तेव्हा एक लक्षात ठेवावे मेहनत केल्या शिवाय काही मिळत नाही आणि का मिळण्याची अपेक्षा करावी? जे काही मिळवायचे ते स्व:कष्टाने आणि मेहनतीने मिळाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते.

 

           त्यामूळे “बसून खाण्याचे” स्वप्न कुणी पाहू नये ते पुर्ण होण्याची शक्यता नाही, ही अपेक्षा ही कधी ठेऊ नये.  काही लोक भाग्यवान असतात ज्यांना आयते सर्व मिळते ज्यामूळे पुढील सर्व कार्य पुढे नेणे सोपे जाते पण कुणीतरी आधीच्या पिढीने किंवा दुस-याने कष्ट ओतलेले असतात त्यासाठी. तीच गोष्ट नुकत्याच पकडलेल्या “स्टार पुत्राबद्दल”, त्यालाही सर्व आयते मिळत होते,फक्त सांभाळावयाचे की उडवायचे हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न म्हटला तरी अप्रत्यक्षरीत्या तो समाजाशी बांधील असतो.  त्यामूळे आयते मिळाले तरी “लाभते” असे नाही. जे मिळाले ते टिकविण्यासाठीसुध्दा किंवा त्यात भर घालण्यासाठी तुम्हाला त्यात स्व:ताचे योगदान द्यावे लागतेच.

          “आयजीच्या जीवावर बायजी उदार” अशी एक म्हण आहे, म्हणजे आपल्याला फुकट मिळालेच आहे त्यातला थोडासा वाटा इतरांना देऊ असा दृष्टीकोन. हे काही चुकीचे नाही पण स्व:ताच्या हिस्स्याचे देणे वेगळे आणि कुणीतरी दुस-यांनी दिलेल्या कमाईचा वाटा तिस-यांना देणे वेगळे, असे अनेक पैलू या बसून खाण्याचे आहेत. ब-याच महिला कामाला नौकर ठेऊन स्वत:ला आराम मिळेल असा विचार करतात, मात्र त्या नौकरांकडून हवे तसे काम करून घेणे आणि ते तसेच होईल अशी अपेक्षा न ठेवणे. शिवाय त्यांना आपुलकी, गरज निर्माण होईलच असे नाही, शेवटी पैसे देऊन केलेल्या कामाला आपलेपणा कसा असणार?  हल्ली सगळे विकत मिळते म्हणून शक्यतो घरी पदार्थ करणे टाळले जाते. स्वच्छता,भेसळ, चव आणि आरोग्यवर्धक जेवढे घरी बनविलेले असते तेवढे बाहेरच्या पदार्थात असते का? याचा विचार केला पाहिजे.

          “बसून खाणे” आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. मग ते थोडे का होईना पण चांगले खाणे महत्वाचे आहे. शारिरिक हालचालसुध्दा तेवढीच आवश्यक आहे. अन्यथा अनेकविध आजार जडतात विशेषत: महिलांना याचा जास्त त्रास होतो म्हणून खाण्याच्या बाबतीत तरी बसून खाणे योग्य आहे. त्यानंतर चालणे, थोडा व्यायाम हा करावाच लागतो. यासाठी मला आता असे वाटते शाररिक तंदुरूस्तीसुध्दा शासनाने गंभीरतेने आणि स्वत: कर्मचा-याने सुध्दा याकडे लक्ष दिले पाहिजे.  तुम्हाला काय वाटते?




Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव