दिवाळी संपली आता पुढे काय ?
दिवाळी सण येणार म्हणून पैसा, आनंद आणि खरेदी अगदी उत्साहाने करून झालेली असते. हे दिवाळीचे 4 दिवस अगदी मजेत जातात. आता करोना आणि इतर कारणामूळे म्हणावा तेवढा उत्साह लोकांमध्ये दिसून येत नाही. उत्पन्न, गरजा आणि पुर्तता यात एवढी व्यस्त असलेली माणसे तात्पुरते अवसान आणतात आणि दिवाळीचे आगमन साजरे करतात पण इतरांचे काय? अशी अनेक माणसे आहेत की ज्यांना हे सर्व शक्य होत नाही. त्यांना सगळे दिवस सारखेच असतात जसे की, अत्यंत महत्वाच्या सेवेत असलेले, दैनंदिन गरजा भागविणारे आणि कर्तव्य म्हणून सेवा बजावणारे अशा माणसांना आणि त्यांच्या घरच्यांनासुध्दा जेव्हा ते घरी येतील तेव्हाच “दिवाळी, दसरा” असे म्हणता येईल.
कार्यालयातसुध्दा वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी
साजरी केली जाते. पॉटलक (Pot Luck) म्हणून प्रत्येकाने एक पदार्थ करून आणायचा आणि मग तो इतरांनी चाखून त्याच्यावर
अभिप्राय द्यायचा,सगळ्यांनी एकत्र फराळ करायचा. दस-यानंतर व दिवाळीच्या आधी मिठाई,
कपडे, वस्तू घेऊन अनाथाश्रम, आदिवासी पाडे, वृध्दाश्रम यांना पाठविणे. वर्षभर सेवा
देणारे कर्मचारी (वर्ग 4, द्वाररक्षक, सफाई-कर्मचारी )यांना स्वेच्छेने दिवाळी भेट
देणे. मिळालेल्या बोनसचा यथायोग्य वापर करणे. स्वत:साठी वा इतरांसाठी खरेदीची गरज
असल्यास कुठे “सवलतीत विक्री किंवा विशेष दिवाळी सवलत” आहे का याची चौकशी करून
त्याप्रमाणे खरेदी करणे. मुलांना दिवाळीचे महत्व आणि सुट्टी यातून उत्साहवर्धक
काहीतरी नवीन शिकण्यास प्रवृत्त करणे. अशा अनेक मार्गाने, विविध अंगाने दिवाळी
साजरी केली जाते. कुणी माहेरी, कुणी सासरी, कुणी स्वत:च्या गावच्या घरी जाणे पसंत
करतात तर काही जण बाहेर इतरांसोबत जसे की मा.पंतप्रधान जवानासोबत किंवा ज्यांना
जसे सुचेल त्याप्रमाणे साजरा करीत असतात.
पुर्वी दिवाळी एकदाच वर्षातून यायची तेव्हा जे अप्रुप होते तेवढे आता
राहिलेले नाही. वर्षभर सर्व वस्तू मिळतात,वारंवार खरेदी करीतच असतो. शक्यतो फराळ
विकत आणला जातो. घरी केला तरी खाल्ला जाईल आणि संपेल याची खात्री नसते. अशी ही
दिवाळी संपली की आमची कार्यालयीन धावपळ सुरू होते. लक्ष्यांक गाठणे, समय-मर्यादेतील
कामे, वर्षभरातल्या कामाचा आढावा घेऊन उरलेली कामे त्वरीत संपविणे इत्यादी.
दिवाळीत घेतलेली सुट्टी, मौज, आनंद विसरून कामाला लागायचे असते. थोडक्यात वर्षातली
“क्षणभर विश्रांती”म्हणता येईल ज्यामूळे कामाला उभारी यावी व जोमाने कामे व्हावीत
हीच गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते.
अशा या दिवाळीचा बहर ओसरल्यावर सर्व सामानसुमान जागेवर जाणे, फराळ संपविणे, आलेल्या किंवा आणलेल्या वस्तूंची रचना करणे आणि नेहमीचे दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरू करणे याशिवाय पर्याय नसतो. पुन्हा दुस-या वर्षी याच प्रमाणे दिवाळीची परंपरा कायम राखली जाते फक्त परदेशस्थ मुले-मूली असल्यावर किंवा एकत्र रहात नसतील तर थोडा फार फरक पडतो. आता तिथेपण इथल्यासारखीच दिवाळी जास्त उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. एकूण काय “दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा”, फक्त हा आनंद स्वत: किंवा कुटूंबीय यांच्यापुरता मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत कसा विस्तारता येईल याचा विचार केल्यास ख-या अर्थाने सगळ्यांना समाधान व समृध्दी लाभेल. तुम्हाला काय वाटते?
छान कथा
ReplyDeleteDhanyawad 🙏
ReplyDelete