सेवा उद्योगाची भरारी

            आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये भर घालणारे क्षेत्र म्हणजे उद्योग, तंत्रज्ञान, शेती आणि अनुषंगिक क्षेत्र (बॅंक, विमा, वाणिज्य, आणि दळणवळण) असे आपण समजत होतो. मागील 35 वर्षात “सेवाक्षेत्राची” जास्त मागणी वाढू लागली जी आधी दुर्लक्षित होती.  आता जवळपास 40% वाटा सेवा क्षेत्र उपलब्ध करून देतो. त्या प्रमाणात सोई-सुविधापण दिवसेंदिवस वाढत आहेत.  या क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन सन 1994 मध्ये केंद्राचा “सेवा कर” कायदा अस्तित्वात आला. जो आता सन 2017 मध्ये “वस्तू व सेवा कर” कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला यावरून याची व्याप्ती लक्षात येईल.

         सेवा क्षेत्रात प्रचंड मनुष्यबळ,यंत्रसामुग्री लागत असल्यामूळे याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच रहाणार. प्रचंड लोकसंख्येमूळे आपल्या देशात या क्षेत्राला मागणी आणि वाव आहे.  सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक सेवांचा आपण लाभ घेत असतो ते आपल्या लक्षात येत नाही. सेवा घेऊन त्यावर करही लादला जातो आणि त्या प्रमाणात सेवा किंवा सुविधा मिळत नाही हे ही कुणाच्या लक्षात येत नाही. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच ख-या अर्थाने ग्राहकांना याचे महत्व पटेल असे वाटते.

         एकदा एखादे उत्पादन विकले की आपली जबाबदारी संपली असे बहूधा सर्वांचे मत असते त्यानंतरच खरी त्या क्षेत्राची कामगिरी सुरू होते. ते मशीन जुळवणी करणे, मशीन हाताळणे, देखभाल करणे आणि मग दुरुस्ती करणे असे वेगवेगळ्या टप्प्यांवर या क्षेत्राची गरज निर्माण होते.  तिमाही, सहामाही किंवा वार्षिक अशी देखभालीची खरतर गरज असते. त्यासाठी “दुरुस्तीची खात्री (Warantee), हमी (Guarantee)” ठराविक कालावधीसाठी दिलेली असते. नि:शुल्क सेवा किंवा सुटे भाग बदलून मिळतील असा त्याचा अर्थ असतो. मुळात अशी सवलत असते हेच काही जणांना माहित नसते आणि माहित असले तरी दुर्लक्ष होते किंवा विस्मरण होते. मग जेव्हा वस्तू नादुरुस्त होते तेव्हा सगळीकडे धावाधाव करावी लागते. विक्रेता व ग्राहक या दोघांची ही जबाबदारी असते.  काही कंपन्या त्यांच्याकडून सुटे भाग घेणे बंधनकारक करतात. इतर ठिकाणी मिळत नसल्यामूळे ग्राहक मात्र विनाकारण आर्थिकदृष्टया भरडला जातो.

       यासाठी ग्राहक तक्रार मंच उपलब्ध आहे परंतू तिथली कार्यपध्दती एवढी मोठी आणि वेळखाऊ आहे की तक्रार करण्यास कोणी सहसा धजावत नाही.  ब-याचवेळा दिलेला निर्णय पाळला जात नाही किंवा आरोपीकडून दुर्लक्ष केले जाते. कित्येकदा दर्जा, रंग, वस्तूचा आकार, किंमत,सोबतची मोफत ऑफर,याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यासाठी ग्राहक जागरूक असणे, त्यांना अधिकार माहित असणे, कुणाकडे तक्रार करावयाची याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.  त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा वेळ देणे गरजेचे असते.

        आता ऑनलाईन व्यवहारात तरी हे खुपच गरजेचे आहे कारण विक्रेता अदृष्य असतो. अज्ञानामूळे किंवा काही अटी व शर्ती संदीग्ध असल्यामूळे गोंधळात टाकून फसवणूक करू शकतात शिवाय काही सेवा अजूनही प्रमाणित झालेल्या नाहीत त्यामूळेही फसवणूक होऊ शकते. वैद्यकिय क्षेत्र, विमा, बॅंक, सौंदर्य प्रसाधन यांच्या सेवेचा दर्जा व त्याचे समीकरण याबाबत ठोस पाऊले उचलल्यास आणि चांगली सेवा न दिल्यास शिक्षा व दंड होऊ शकतो ही भिती निर्माण होणे गरजेचे आहे.  यासाठी ग्राहक प्रथम प्रशिक्षीत झाला पाहिजे, त्याला विविध पर्याय देऊन त्याच्या समस्येचे त्वरित निराकरण होण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे असे मला वाटते.  वैद्यकीय सेवेत रुग्णालयाने रूग्ण सेवा कोण देणार, काय शुल्क लागणार, औषध जर रुग्णालय देत असेल तर त्याचे सवलतीचे दर, आरोग्य विमाबाबत दर कसे असतील,  तक्रार कुणाकडे करावयाची इत्यादी माहिती देणारा एक दर्शनी फलक लावल्यास रुग्णाची व्यवस्थित सोय होऊ शकेल. गरजवंत आहोत म्हणून ग्राहकाला गृहित धरता कामा नये हे उद्दीष्ट हवे. तुम्हाला काय वाटते?


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव