कृतज्ञता भेट (Return Gift)

                “जब तक तुम्हारे पास पैसा है!  दुनिया पुछेग़ी की भाई तु कैसा है?”

                                                                                                        “-जिंदगी की सच्चाई”

          असा एक फेसबुक वरील संदेश वाचल्यावर मन भूतकाळात गेले.  खरेच पैशाला एवढे महत्व का देतो आपण? हे एक साधन आहे ,साध्य नव्हे!  माणूस, चारित्र्य, इमान, देश कि पैसा? हे जेव्हा मुद्दे उभे रहातात तेव्हा काय निवडायचे हा एक मोठा गहन प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाला पडत असतो.  कधी तरुणपणात, कधी मध्यम वयात तर कधी म्हातारपणात सुध्दा त्याची उत्तरे प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात आपआपल्या परिस्थितीनुसार सोडवत असतो. आमच्या कार्यालयात सेवानिवृत्तीच्या समारंभात प्रत्येकाला प्रत्येकजण आवर्जून सांगत असतो की, आलेला पैसा सगळा मुलांच्या हातात देऊ नका. गरज असेल तेव्हा द्या,पुन्हा परतफेडीची शक्यता बघूनच द्या.  वाईटपणा आला तरी चालेल पण घर,संपत्ती, पैसा कधीही आपल्या हयातीत देऊ नका जेणेकरून मुलापुढे हात पसरावे लागणार नाही. 

          कधी कधी असे वाटायचे की,का असे सांगतात? मुलांना नाही देणार तर कोणाला देणार!  शक्य असताना देणार नाहीतर केव्हा देणार! नंतर जसजसे अनेक लोकांचे अनुभव ऐकावयास मिळाले आणि काही वेळा पाहिले तेव्हा “त्या”बोलांचे महत्व पटायला लागले. आपला मुद्दा असा होता की, परतफेड किंवा काहीजण “उसने वाण” म्हणतात,ते कशासाठी द्यायचे? कृतज्ञता, समानता, प्रेम, अनुकंपा या भावनांचे मोल करता येत नाही हे मान्य! परंतू हे घेतलेले देणे परत कसे करावयाचे हा एक प्रश्न असतो.

       अध्यात्माच्या दृष्टीने विचार केल्यास आपण काही घेतले आहे आणि पुन्हा ज्याचे त्याला परत करावयाचे आहे हेच आपण मुळात विसरलेले असतो म्हणून त्याची आठवण ठेवून त्याची कृतज्ञता बाळगून परतफेड करणे हाच मानवी जीवनाचा उद्देश असावा.  ज्या ईश्वराने सर्व काही दिले तो किती महान असेल! याची जाणीव ठेवणे. आपल्याला जे काही मिळाले त्याचा उपभोग घेऊन प्रसंगी इतरांना त्याचा लाभ करून देणे.  प्रत्येक अवयवाद्वारेसुध्दा आपण पुन्हा परतफेड कशी करू शकतो ते पहा. 

(1) कान -चांगले ऐकणे, ऐकवणे, वाईटाकडे दुर्लक्ष करणे.

(2) डोळे -चांगले पहाणे, दृष्टीहीन लोकांना मदत करणे, मरणोपरांत दृष्टीदान करणे.

(3) दोन हात-एका हाताने घ्यायचे तर दुस-या हाताने घ्यायचे, चांगले काम स्वत: करायचे आणि इतरांकडून करून घ्यायचे.

(4) दोन पाय - चालणे, फिरणे, निसर्ग निरीक्षण करणे, सौंदर्यस्थळे बघणे व इतरांना दाखवणे. (5) डोके - भन्नाट कल्पना व बुध्दी वापरून स्वत:चे व इतरांचे भले करणे. या बाह्यअंगाच्या गोष्टी झाल्या, अंतरंगाचे काय? सुंदर विचार, आचार, कृती, वागणूक इत्यादीमूळे माणूस स्वत:ही घडतो आणि इतरांनाही घडवू शकतो.

         परतफेड ही कुवतीनुसार व आवश्यकतेनुसार करावी. नुकताच एक व्हिडीओ बघण्यात आला ज्यामध्ये स्वामी समर्थ मठासमोर जे अन्नदान केले जाते ते कसे सगळे फेकून देतात याचा. मग अशा दानाचा काय उपयोग? पुर्वी कामवाल्या बाया जास्तीचे अन्न, जुने कपडे, जुन्या वस्तू कौतूकाने घेऊन जायच्या. आता दिले तर विकून टाकतात किंवा सरळ फेकून देतात. आता त्यांच्या गरजासुध्दा बदलल्यात.  संगणक, मोबाईल, ओव्हन,घड्याळ अशा आधुनिक वस्तू त्यांना दिल्या तर हव्या असतात.  “कालाय तस्मेय नम:!” म्हणून परतफेड कशी व कुणाला करावी हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा ठरू शकतो.

          कुणी वारस किंवा लिखीत पुरावा नसल्यामूळे ब-याच वस्तू मालमत्ता, संपत्ती ही “ना दावा (Un-Claimed) प्रकरणात अडकून पडलेल्या असतात. तर काहीजण वेळीच सावध होऊन थोडे इतरांना काही प्रमाणात वाटून टाकतात. अशा वेळी घेणा-यांची मानसिकता विचारात घेतली पाहिजे. एक तर खूप आहे, थोडेसे दिले तर काय झाले, नाहीतर फुकट जाणार होते ते अनायसे कामाला आले. फुकट मिळते ना मग घेऊन टाका,जास्त विचार करू नका. कायदेशीर रित्या वाटणी करून ठेवल्यास काही अडचणी कमी होऊ शकतात पण तसा विश्वसनीय माणूस हवा. मंडळी, असे फुकटचे घेऊन खरंच त्याचा लाभ होतो का? याचाही विचार करावा असे मला वाटते.  खरे ना?



Comments

  1. Gift milyavar jitka anaand hoto, tevdhyach anandane return gift hi dile pahije!!!

    ReplyDelete
  2. Yess surely 😃 💕 thank you 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव