गीताई आणि आपण

            || जीवन पध्दतीचे सर्व सार  ज्यात समाविष्ट आहे,

               त्या पवित्र श्रीमद् भगवतगितेला नमन! ||

           नुकताच गीतेचा जन्मदिवस यंदा दि. 14 डिसेंबर रोजी साजरा झाला.  मार्गशीर्ष शुध्द एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला कुरुक्षेत्रावर भगवदगीता सांगितली होती,जी आजही सर्वांना कोणत्याही समस्येवर मार्गदर्शक ठरते. हा एक केवळ धर्मग्रंथ नसून आदर्श जगण्याचा वस्तूपाठ आहे. जेव्हा जेव्हा आपले मन अशांत असते तेव्हा तेव्हा या ग्रथांच्या वाचनाने मन:शांती लाभू शकते. माझे वडील म्हणायचे रोजच “गीता वाचा” आपोआप उत्तरे मिळत जातील आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू. ते स्वत:सुद्धा काही प्रमाणात गीता आचरणात आणत होते.

           शाळेत असताना एखादा अध्याय पाठांतरासाठी किंवा त्यावरचे लेखन एवढीच मर्यादित गीताईची ओळख झाली होती. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पेचप्रसंगात या ग्रंथाचा उपयोग किंवा संदर्भ घेता किंवा देता आला. परदेशी लोकसुद्धा यावर आपली मते, पठण करतात आणि त्यानुसार वर्तन आखायचा प्रयत्न करतात. आपली जन्मदात्री आई आपल्याला शिकवित असते पण जेव्हा तीची शिकवण कमी पडते किंवा काही प्रश्नाला तीच्या कडे उत्तरे नसतात तेव्हा ही गीताई आपल्याला अगदी “अथपासून इतीपर्यंत” उपयोगी पडते. आता चित्ररूपी, मालिकेद्वारे, सामाजिक  माध्यमातील दृकश्राव्य माध्यमाद्वारे हीची महती वेगवेगळ्या स्वरुपात आपल्याला आणखी सोप्या रितीने समजावून सांगितली जाते.

         आपण  या गीतेतून बोध किती घेतो ते महत्वाचे! आई-मुलांबद्दल जेवढी जागरूक आणि सजग असतेच तेवढ्याच पोटतिडीकेने अखिल मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूने गीताईचा जन्म झाला. तोही अशा परिस्थितीत जिथे प्रत्यक्ष अर्जून गोंधळलेला होता, निराश झाला होता, मागे फिरणार होता. अशा अर्जूनाच्या चल-बिचल मन:स्थितीचे अचूक वर्णन आणि त्याचे योग्य समाधान असे संवादरूपी निरूपण केलेले आहे. गीतेतील प्रत्येक श्लोक आणि अध्याय अर्थपूर्ण आहेत. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.  संस्कृतमध्ये असलेली गीता नंतर संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत भाषांतरीत करून सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी सोपी केली. त्यानंतर विनोबा भावे, टिळक, साने गुरूजी यांनी अनेक प्रकारे याचे भाषांतर मराठीत करून आणखी सोपी केली. हा ग्रंथ वैदिक ज्ञानाचा “मुकूटमणी” आहे. संपूर्ण विश्वात या ग्रंथाने वैदिक धर्म, तत्वज्ञान आणि संस्कृतीत अभूतपूर्व रुची उत्पन्न केली. ही भगवदगीता मूळ श्लोक शब्दार्थ, अनुवाद व संपूर्ण तात्पर्यासह सर्व भारतीय भाषेत आणि इंग्रजी, जर्मन, रशियन, स्पेनिश, फ्रेंच, इटालियन, चिनी, जपानी अशा 40 हून अधिक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आलेली आहे. अमेरिकेतील 90% पेक्षा अधिक विश्वविद्यालयीन पाठ्यक्रमात निर्धारित केली गेली असून आता पर्यंत 8 कोटीहून अधिक प्रती वितरीत झालेल्या आहेत.

           आपली संस्कृती, रहाणीमान, वर्तन, वर्तवणूक आणि समाधान या सर्वांसाठी दिशादर्शक असा हा राजमार्ग आहे. लहानपणापासून याचे नुसते वाचन केले तरी प्रत्येक जण समृध्द होवू शकेल एवढी ही गीताई परिणामकारक आहे. प्रश्न आहे फक्त तीच्याकडे आदराने बघण्याचा आणि “जगाच्या शांतीसाठी त्याचा सर्वदूर प्रचार व प्रसार करण्याचा”! नाहीतर आपण जसे आपल्या आईकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्हाला कोण मार्गदर्शन करणार? प्रत्येक शास्त्रात, कलेत, अभ्यासात पदोपदी “गीताईचे”एवढे अनन्यसाधारण महत्व आहे की, जिची शपथ घेणे हे कायद्यानेसुध्दा ग्राह्य धरण्यात आलेले आहे.

                आताच्या आपल्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात आणि योग्य मार्गदर्शन करणारी माणसे मिळत नसल्यामूळे ही गीताई तुम्हाला तुमच्या भाषेत सकस ज्ञान देऊन समृध्द करायला तयार आहे. फक्त प्रश्न आहे तो तुमच्या जाणतेपणाचा आणि ज्ञान आत्मसात करण्याच्या वृत्तीचा! ही काही मारून मुटकून शिकवणारी विद्या नव्हे. मनापासून श्रध्दा आणि भक्ती असल्यावर जी  प्रेरणा तुम्हाला मिळते त्यातून तुम्ही किर्तीवंत आणि ज्ञानवंत बनू शकतात. नुसता अभिमान उपयोगाचा नाही,तसे आचरण, वर्तन आणि स्वभाव असणे महत्वाचे!

            गीताई कोणताही उपदेश करीत नाही. योग्य आणि अयोग्याचा दाखला देते. तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री देते तर तुम्ही त्यासाठी “कसे वागले पाहिजे” याचा वस्तूपाठ देते. सगळ्यांनी किमान तसा प्रयत्न केला तरी अनेक समस्या उदभवणार नाहीत अशी मला खात्री आहे. नवीन वर्षात बघा प्रयत्न करुन!  “यथार्थ भगवदगीतेची” प्रत सोबत सुलभ संदर्भासाठी जोडत आहे, याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपण हा लेख वाचून अवश्य अभिप्राय नोंदवावेत अशी विनंती आहे.

 https://drive.google.com/file/d/1Wo38KSdZuQ8Oke9lFiRhUHQSyeICMIZY/view?usp=sharing


Comments

  1. अगदी योग्य लिहिलंय
    फक्त ज्ञानेश्वरांचा एकेरी उल्लेख खटकला
    संत ज्ञानेश्वर यांनी .... असं म्हंटलं तर ते त्यांचा आदर केल्यासारखं होईल

    ReplyDelete
  2. बरं वाटलं वाचून. चांगलं लिहिले आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad 🙏 Geetatai.it is possible due to your support!

      Delete
  3. बघू जमतंय का ! नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करू !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव