बोलक्या वेदना


                                           दु:खा पर्यंत येते ती आई

                                           वेदना पदरात घेते  ती माई ..

 

                 दि. 4 जानेवारी, 2021 रोजी, पद्मश्री “अनाथांची आई” सिंधू सपकाळ यांचे हद्यविकाराने निधन  झाल्याचे वृत्त कळले आणि मन सुन्न झाले.  एकीकडे दि.3 जानेवारी रोजी सावित्रीबाईचा जन्म दिवस साजरा करतो आणि दुस-याच दिवशी सिंधूताईंचे निधन व्हावे हा कोणता योगायोग समजायचा! एकीने मुलींनी शिकावे म्हणून जीवाचे रान केले तर दुसरीने समाजाने दुर्लक्षित केलेल्या अनाथ मुलांची माय होण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्य, भाषणाची शैली आणि बोलक्या वेदना मनाला सद्गदीत करतात.

            सिंधूताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करण्यात आला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या,पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले.

         बरोब्बर 55 वर्षापूर्वी  सिंधूताई समाजाचे कौर्य भोगत होत्या तेव्हा समाज एवढा निष्ठूर होता का? ज्या वेदना सिंधूताईना भोगाव्या  लागल्या  त्यावेळी समाज कुठे गेला होता? एवढ्या हलाकीच्या परिस्थितीतू न त्या कणखरपणे उभ्या राहिल्या आणि समाजाविषयी कोणताही रोष न पत्करता उलट त्या स्वत:च अनाथांच्या “माय” झाल्या,पण या “मायची काळजी” घ्यायला कुणीच “माय का लाल” निर्माण झाला नाही. त्यांच्या बोलण्यातून एवढ्या वेदना जाणवयाच्या की त्या ऐकल्यावर कित्येकदा अंगावर काटा यायचा ( जरी हसत हसत बोलत असल्या तरी) त्यामुळेच मी सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला “मी सिंधुताई सपकाळ”,“अनाथांची यशोदा” हे चित्रपट बघू शकले नाही.

           सिंधुताईंना गायनाची नैसर्गिक झळाळी लाभली आहे. सिंधुताई गाणे आणि भीक मागत राहिल्या. त्या अनेकदा इतर भिकाऱ्यांसोबत सामील होत आणि या भिकाऱ्यांनाही खाऊ घालत. असे अनेक महिने आणि वर्षे गेली. त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणीही नव्हते आणि त्या कोणाच्याही नव्हत्या. आपल्या लहान मुलीस “श्रीमंत दगडूसेठ हलवाई ट्रस्टकडे” सोपवले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

          सिंधुताई अनाथ, निराधार आणि इतर गरीब लोकांसाठी मनापासून काम करत असत. तिने अनाथांवर आपले मातृप्रेम आणि वात्सल्य ओतले. तिने त्यांना पंखाखाली घेतले. जमेल त्या मार्गाने त्यांना अन्न आणि निवारा दिला, ते तिला प्रेमाने आई म्हणतात. खाजगी देणग्या आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातील इतर मदतीद्वारे निधी मिळविला जातो. स्वत:च्या आयुष्यातील कष्ट कधीही त्यांनी स्वत:ला खचू दिले नाही. त्यांची हृदयस्पर्शी भाषणे,वक्तृत्व, कवितांचे पठण आणि गझल खूप आकर्षक आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, सिंधुताईंना त्यांची मुलगी ममता आणि मुलगा दीपक आणि त्यांचे इतर मोठे मुलगे मदत करतात. ती अनेकांसाठी "आई" झाली आहे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सन १९९४ साली सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात  सुरु झाली आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत.   त्यातील काही खालील प्रमाणे आहेत.

·        बाल निकेतन हडपसर, पुणे

·        सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा

·        अभिमान बाल भवन, वर्धा

·        गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

·        ममता बाल सदन, सासवड

·        सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

              सिंधूताईंचे विशेष कौतूक हे की त्यांनी बहिणाबाई आणि सुरेश भट यांना आपलेसे करून जीवन एक तत्वज्ञान बनविले. स्वत:च्या वाचनावरचे प्रचंड प्रेम त्यांना जगण्याचे बळ देऊन गेले. उपाशी पोट आणि बाळांची काळजी आयुष्यात काय काय करायला लावते हे त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर आपल्याच आपली लाज वाटते. खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा तेव्हा पोहचली नव्हती पण साधी माणुसकीसुध्दा त्यांना मिळू नये ही समाजाच्या अधोगतीची लक्षणे वाटतात. त्या सिंधूताईने मात्र माणूसकीचा कळस गाठून अनाथांना सनाथ केले हे आपले केवढे भाग्य!  मुळात अनाथ निर्माण का होतात आणि समाज / शासन का काळजी घेऊ शकत नाही किंवा अनास्था दाखविली जाते याचा विचार झाला पाहिजे.

            सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.  शासनाने गुणगौरव आणि पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे परंतू त्याच्या कष्टाचे मोल होणार नाही.  त्या आजारी पडल्यानंतर त्यांची बातमीपण पेपरमध्ये छापून येत नाही आणि नको त्या बातम्या वारंवार दाखविल्या जातात. या पत्रकारितेचे वैष्यम्य वाटत रहाते. त्यांची जीवन कहाणी कर्नाटकातील पाठ्यपुस्तकात शिकवली जाते. समाजकार्यासाठी दारोदारी त्यांना वर्ग़णी गोळा करावी लागायची, यासाठी त्यांना वेदनांचा बोलका इतिहास मांडावा लागला. अनेक व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके, व्याख्याने आणि दृक-श्राव्य माध्यमाद्वारे आपण धडे घेत असतो पण अशा जीवंत धड्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असतो.

               सिंधू सपकाळ,हा 75 वर्षाच्या झंजावात आता शांत झालेला आहे,यातून आपण, समाज आणि शासन काही धडा घेऊ शकतो का? का अजूनही आपण आपल्या सुरक्षित कोषात जगणार आहोत. “दुसरी सिंधूताई” निर्माण होणार नाही याची काळजी कोण घेणार? समाज सेवक म्हणून त्यांचे कार्य नक्कीच भूषणावह आहे. आपल्यासारखी इतरांची अवस्था होऊ नये यासाठीची त्यांची धडपड वाखाणण्यायोग्य आहे.

              एक किंवा दोन मुलांचा सांभाळ करणे आपल्याला भारी पडते तिथे 1050 मुलांचे पालकत्व जपणे किती कठीण असेल याची कल्पनादेखील करवत नाही. तरी इतक्या माझ्या सुना आणि जावई आहेत म्हणून त्यातही आनंद मानणा-या सिंधूताई कायम हसमूख असल्याचे बघून आश्चर्य वाटायचे. त्यांच्या बोलण्यातून प्रेरणाही मिळायची तसेच तत्वज्ञानही हसत खेळत सांगून जायच्या. प्रेमळपणा हा आईचा गुणच आहे,ती जगाची माय बनू शकते हा धडा त्यांनीच दिला आणि स्वत:सुध्दा गिरवला. आता त्यांच्याकडील आणि अशाच प्रकारच्या मुलांकडे कोण बघणार? हा मोठा प्रश्न आहे. आता या मुलांकडे बघणे हा समाजाचे आणि शासनाचे प्रथम कार्य असले पाहिजे ज्यामूळे कोणीच अनाथ राहू शकणार नाही आणि पद्मश्री “अनाथांची आई” सिंधू सपकाळ यांना खरी श्रध्दांजली ठरेल,वरुनही त्या आपल्याला आर्शिवाद देतील. करूयाना आपण एवढेतरी?







 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव