आधुनिक जिजाऊ आणि शिवबा / शिवानी

          नुकतीच वीरमाता जिजाऊंची जयंती  (12 जानेवारी, 1598 ते 17 जून 1674 ) ही 12 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. राणीची बाग आणि व्ही.जे.टी.आय. कॉलेज यांचे इंग्रजी नाव बदलून वीरमाता जिजामाता असे ठेवण्यात आल्यावर कोण अभिमान वाटला. आम्ही फक्त तेवढेच करु शकतो, मानसिक समाधान किंवा पराक्रम काही नाही. असो.

           जिजाऊंनी (प्रत्यक्ष नव-याची कोणतीही साथ नसताना) आदीलशाहीविरुध्द लढण्यासाठी स्वत:च्या मुलाला तयार केले होते,जे मोगल आणि इंग्रजांविरुध्दसुद्धा कामाला आले. सर्वगुणसंपन्न पुत्र स्वराज्यासाठी तयार करणे तसे सोपे काम नव्हते. तसा आराखडा तिच्या मनात होता म्हणून हे शक्य झाले. शिवबाने स्वत:ला  त्या आराखड्यास अनुसरुन घडवले आणि जिजाऊचे स्वराज्य-स्वप्न प्रत्यक्षात आणले. 

            आताच्या महिला परकीय आक्रमण, अंतर्गत सुरक्षा, कौटूंबिक सुरक्षा, सामाजिक समस्या सोडविण्यास सक्षम आहेत. तरीही लढा अजून चालूच आहे. अंतर्गत शत्रू आणि काळानुसार येणारी नवनवीन आव्हाने यासाठी तिला वेळोवेळी लढा द्यायचाच आहे. तसेच सक्षमरित्या भावी पिढी तयार करावयाची आहे. सुपर वुमन बनून सगळ्या आघाड्यांवर लढणे हे एक आव्हान आहे तर स्वत्व टिकवणे हे दुसरे आव्हान आहे. बरं, या सगळ्या धडपडीत वेळ काढून शिवबा किंवा शिवानीला वाढविणे हे वाटते तेवढे सोपे नाही.

               आपल्याला इतर क्षेत्रातल्या अज्ञात जिजाऊ दिसतच नाही. ज्या प्रत्यक्ष युध्दावर न जाता आपल्या मुला-मुलींना त्यासाठी तयार करतात,कष्ट करून यशस्वी व्यक्तिमत्व घडवितात अशा आई-बाबांची नावे कुणाला माहित नसतात. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील, बाळ गंगाधर टिळक, लालबहाद्दूर शास्त्री, अब्दुल कलाम आणि अटलबिहारी बाजपेयी यांच्या मागेसुध्दा जिजाऊ होत्याच, त्या प्रकाशात आल्या नाहीत. तसेच सुंदर पिचाई, अम्यर्त्य सेन, व्ही. आर. लतिकाअंबिका (ज्येष्टः महिला शास्त्रज्ञ) अशी अनेक जण अज्ञात राहून देशाचे नाव उज्वल करून जातात.  दिवसेंदिवस जिजाऊ आणि शिवबा दुर्मिळ होत चाललेत. धाडस, ध्येय आणि ध्यान एकत्र आणून जे काम यशस्वी केले जाते त्यामागचे समर्पण कोणाला कळत नाही पण असतेच किंवा कालांतराने कळते. क्षेत्र कोणतेही असो “समर्पित वृत्ती” अंगी बाळगल्याशिवाय शिवबा आणि शिवानी तयार होवू शकणार नाही.

           परिस्थिती बदलली तरी, लोकशाहीतसुध्दा शिवबाची गरज जाणवतेच. लोकशाही राबविण्यासाठी शिवबा आणि मावळे दोघांची समर्पितवृत्ती आवश्यक आहे. तसेच शिवबा / शिवानी नेहमी शेजारी जन्माला यावी ही वृत्ती सोडून द्यायला हवी. तसेच नुसतेच शिवबा / शिवानी होऊन चालत नाहीत तर मावळे साथीला असणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी “स्वत: मावळे होऊया” हा निर्धार प्रत्येकाने आपआपल्या हद्ययात जपला पाहिजे.

            कठोर आणि स्मार्ट मेहनत करून स्वराज्याचे सुराज्यात रुपांतरीत होवू शकेल. मिळवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते,हेच आपल्याला करावयाचे आहे. निसर्गरक्षण, माणुसकी,देश आणि स्वत्व जपून स्वत:बरोबरच देशाची प्रगती करणे म्हणजे ख-या अर्थाने सुराज्य निर्माण करणे होय. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यास काही कठीण नाही. मग करणार ना प्रयत्न?



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव