अचेतन मनाची शक्ती आणि आपण

        “The power of your subcontious mind” असे इंग्रजी नाव असलेले  “पुष्पा ठक्कर”  अनुवादित पुस्तक नुकतेच वाचनात आले.  मन:शक्तीबद्दल पुर्वी अनेकवेळा ब-याच पुस्तकातून वाचन झाले होते. यावर वेगवेगळे वर्कशॉप्स, व्याख्याने, लेखपण वाचून झाले होते. हे पुस्तक मात्र या सगळ्याहून वेगळे आणि अभुतपूर्व अनुभवांनी भारीत आहे. आपण वाचत जातो तसे आपल्याला आपले मन नव्यानेच उलगडत जाते.  सगळ्यांनी नक्कीच वाचावे विशेषत: मुलांनी किमान तरुणपणात वाचावे.  मोठ्यांनीसुद्धा वाचावयास हरकत नाही.  मनात दडलेली अभुतपुर्व शक्ती मिळविण्याचे अनेक मार्ग  सोदाहरण पटवुन दिलेले आहेत.  ही शक्ती आपल्यात असतेच फक्त तिला जागे करावे लागते. या  अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा करता येऊ शकतो हे सोप्या, साध्या, सरळ भाषेत समजावून सांगण्यात आले आहे. आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक आधार घेऊन हे पुस्तक यशाकडे नेणारी मार्गदर्शिका ठरते.  यातुन तुम्हाला अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती कशी मिळवायची हेसुद्धा सांगण्यांत आले आहे.

          प्रत्येकाला एक सुखी, परिपुर्ण आणि समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही करतात पण काहीजण अयशस्वी होतात त्याचे कारण अप्रत्यक्षरित्या हे अचेतन मनच असते. आपण मात्र दोष दुस-यांना देत असतो. परिसाची महती माहित असल्याशिवाय लोखंडाचे परिवर्तन होऊ शकणार नाही. तेच काम आपले अचेतन मन रात्रंदिवस करीत असते.  अव्याहत चालू असलेले हृद्य, पचनसंस्था आणि रक्ताभिसरण चालू ठेवण्याचे काम हे अचेतन मन करीत असते.  जसे इंग्रजीमध्ये (Active Voice  &  Passive Voice) वाक्याचे रुपांतर करुन देते तसेच हे काम अचेतन मन करीत असते.  तुमचे अचेतन मन तुमच्या शरिराचा निर्माणकर्ता असून ते उपचारपण करु शकते.  तुमचा विश्वासू सेवक बनून तुमच्या आज्ञेचे पालन करील. आज्ञा मात्र अचुक व योग्यच असल्या पाहिजेत. आपण झोपल्यावरसुद्धा आपले अचेतन मन जागे असते एखाद्या वॉचमनसारखे विश्लेषण, निवड, तुलना हे अचेतन मन करीत नाही तर फक्त तुम्ही दिलेल्या सुचनांचे पालन करणे एवढेच त्याचे काम असते. निद्रीस्त अवस्थेत जास्त प्रभावीरीत्या कार्यरत असते. इथे स्वयं-सुचना देणे अपेक्षित असते. काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट साध्य करण्याकरिता या अचेतन मनाचा सिंहाचा वाटा असतो.

           याला आधार आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या मुर्तीपुजेत असावा असे मला वाटते. जोपर्यंत आपण भक्तीभावाने पुजा करीत नाही तोपर्यंत तो केवळ दगडच असते.  जेव्हा या दगडाचे आपण पुजन करतो तेव्हाच त्यात देवत्व निर्माण होत असावे. याशिवाय “मनी नाही भाव, देवा मला पाव” असे कधीच होतच नाही. श्रद्धा, भक्ती आणि इच्छा याचा एकत्रित संगमच कोणतेही काम यशस्वी होणार की नाही हे ठरवत असते. तसेच ”शुभ बोल ना-या, डोंगराला आग लागली पळा पळा..  असे बोलू नये” असे आपले पुर्वी जेष्ठ मंडळी सांगत होती. 

           तुमचे मन दृष्ट नाही.  निसर्गाची कोणतीही शक्ती दुष्ट नसते. तुम्ही याचा वापर कसा करता यावर त्याचे फळ अवलंबून असते. “चांगले पेरा, चांगले उगवेल” हा न्याय सगळ्यांनाच लागु असतो. सुदैव,  दैवी मार्गदर्शन,  योग्य कृती आणि जीवन सुंदर आहे हा विश्वास ठेवल्यावर सगळे काही चांगले होणारच. महात्मा ग़ांधीजींच्या भाषेत “आपल्या मनातला आवाज ओळखा” तुम्हाला जे करावेसे वाटते तेच करा” ते सगळे या मनाच्या (अचेतन) शक्तीला उद्देशून असावे असे वाटते. ही शक्ती वापरल्यानंतरच तुमची भरभराट, आनंद आणि मनाची शांती कोणीच थांबवू शकत नाही. नवीन विषय, कल्पना, अभिरुचि यांचा पाठपुरावा सतत केल्यास तेच जीवन तुम्हाला नित्य-नुतन भासेल.  इतरांच्या सुचना जोपर्यंत तुम्ही स्विकारीत नाही तोपर्यंत  त्या बलशाली नसतात. एकदा त्यांचा स्विकार केल्यावर मात्र तसा संदेश अचेतन मनाला जावून  मन तसे वागते. याचाच वापर मानसशास्त्रात केला जातो. म्हणूनच वामनराव पै सांगून गेले “तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो.”

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव