आधुनिक सत्यवान आणि सावित्री
नुकतीच वटपोर्णिमा झाली, त्यानिमित्त्याने अनेकांचे पतीप्रेम, वडाचे माहात्म्य नव्याने व्यक्त होऊ लागले. सामाजिक माध्यमामूळे हल्ली प्रत्येक विषय, घटना, सण वेगवेगळ्या दृष्टीने साजरा करणे याच्यावर उलटसुलट चर्चा घडतात ते एका अर्थी बरे वाटते. अनेकाचे विचार, सोयीनुसार सण साजरे करणे हे चालू आहे हे बघून बरे वाटते. अगदी उपवास करण्यापासून ते नटुन-थटून पूजा करणेसुद्धा नवीन पिढीने आत्मसात केलेले पाहून मनात आशा निर्माण झाल्या. जुन्या परंपरा, चालीरिती यांना कायम नावे ठेवणारे त्यातून नवीन अर्थ काढून जर आपआपल्या पध्दतीने साजरा करित असेल तर काय हरकत आहे? थोडे जुने आणि नवीन याचा सुरेख संगम करणेच काळानुसार अपेक्षित आहे.
वडाकडे जाण्यापेक्षा घरात फांदी साग्रसंगीत पुजा केली जाते हे खरे तर योग्य नाही. देवळात जाऊन पुजा करणे, वडाच्या झाडाचा फोटो लावून पुजा करणे, नव-याभोवती प्रदक्षिणा घालणे, वृक्षारोपण (नवीन वडाचे किंवा इतर) निराधार महिलांचे सक्षमीकरण करणे, इ. असे अनेक उपक्रम राबवायला सुरु करणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सत्यवानही आता कोणतीही अपेक्षा न करता सावित्रीला हळूहळू समजून घेऊ लागले हेही नसे थोडके. प्रामाणिकपणा, बांधिलकी आणि जाणीव एकमेकांबद्दलची असली तरी वेगळ्याने व्रतवैकल्ये करण्याची काही गरज नाही असे माझे मत आहे. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
अपवादात्मक परिस्थितित सावित्रीची कसर भरुन काढणे, तिची धावपळ, ताण-तणाव लक्षात घेऊन सोयीनुसार तिच्याऐवजी तोही हे व्रत करु शकतो. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असली की सर्वकाही आपोआप जमते असे माझे मत आहे. सत्यवानाने आपले आरोग्य, भविष्याकडेही गांभिर्याने बघण्याची वेळ आता आलेली आहे. तसेच सावित्रीचीही काळजी घेणे अपेक्षित आहे. विभक्त कुटूंबामुळे हे सर्व त्या दोघांनीच एकमेकांना सांभाळले पाहीजे. “पती परमेश्वर” ही समज नसली तरी माणूस म्हणून त्याने तिच्याकडे आणि तिने त्याच्याकडे बघितले पाहिजे. एका ग्रहिणीने तर चक्क मी पुढच्या जन्मी पुरुष व्हावा आणि माझा जन्म त्याने घ्यावा अशी इच्छा व्यक्त केलीय. आजच्या समानतेच्या जमान्यात एकमेकांना पुरक ठरणे महत्वाचे. “तु तु, मै मै करुन” करुन कोणतेच समाधान मिळणार नाही.
अशा अनेक सणा-समारंभातून “पर्यावरण बचाव आणि निसर्ग-संवर्धन” हेतू साध्य करणे महत्वाचे. गरजेप्रमाणे आपापल्या भुमीका बदलून प्राप्त परिस्थीतीतून मार्ग काढला पाहिजे अन्यथा “वटवट सावित्री आणि आळशी सत्यवान ” होईल. असे असेल तर कुटुंब किंवा संसार टिकणार कसे? याचाही विचार झाला पाहिजे. पौराणिक कथा आणि त्यामागचा कार्यकारणभाव लक्षात घेऊन आपले पुर्वज किती हुशार/दुरदर्शी होते याचा आपल्या पिढीला अभिमान वाटला पाहीजे. आताच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही याचे महत्व लक्षात घेऊन त्याचा आदर राखणे हेच प्रथम कर्तव्य सगळ्यांनी पार पाडले पाहिजे. येणा-या पिढीसाठीसुद्धा हे अनुकरण करणे हे नितांत गरजेचे झाले आहे. सणाच्या निमित्याने नुसते नटणे, थटणे एवढाच मर्यादीत अर्थ न ठेवता एकमेकांना समजून घेणे हे आवश्यक आहे आणि हे जास्त संयुक्तीक ठरेल असे मला वाटते. बाईपणाचा बाऊ न करता सक्षम होण्याच्या दृष्टीने महिलांनीसुद्धा पुढाकार घेऊन शिक्षण आणि सर्वच क्षेत्रात आघाडी घेणे अपेक्षित आहे.

Very well written Madhavi! Keep writing!
ReplyDeleteDhanyawad Madhuri Tai 🙏
Delete