अंतर्गत बंडाळी
पुर्वी राजघराण्यांत, सरदार मंडळीत आणि पेशव्यांच्या काळातसुद्धा अंतर्गत बंडाळी झाली होती. सध्याच्या लोकशाहीमध्येही ही अंतर्गत बंडाळी बघून आश्चर्य वाटते. शेवटी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी काहीही होऊ शकते हेच खरे. याचे प्रत्यंतर कधी कधी वैयक्तिक जीवनातपण येते.
एकाच वेळी सगळ्यांना खुश करणे शक्य नाही हे वास्तव आहे परंतु ते नजरेआड करुन थोडे थोडे सगळ्यांना नाराज केले जाते. ही नाराजी एवढी वाढत जाते की एक दिवस कोणतरी बंड करुन ऊठ्तेच. एकत्र कुटूंबातसद्धा कुटूंबप्रमुख म्हणुन सगळ्यांचे मन राखण्याचे प्रयत्न करित असतोच. तीन पिढींमध्ये कधी तरी कोणी नाराज होऊ शकतो. स्त्रियांनासुद्धा हा ताण नेहमीच सहन करावा लागतो. घर, संसार आणि नोकरी यामध्ये समतोल साधणे हे कधी कधी शक्य होत नाही. कुठेतरी मग तिचे दुर्लक्ष होते आणि त्याचे परिणाम सगळ्या कुटूंबाला भोगावे लागतात.
हे टाळण्यासाठी सगळ्यांना गप्प बसविणे किंवा स्वत: सक्षमपणे नियंत्रण ठेवणे आणि बंडाळी माजण्यां इतपत दुर्लक्ष करु नये एवढी खबरदारी घेणे गरजेचे ठरते. सगळ्यांना खुश ठेवणे तसेही अवघडच असते. सत्ता आणि मान टिकवायचा असल्यास सगळ्यांचे सहकार्य अपेक्षितच असते. कधी कधी उलटेच होते, बाहेरच्यांना खुश ठेवताना घरातलेच सदस्य दुखावले जातात हे लक्षातच येत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
मुळात आपले कोण, बाहेरचे कोण हेच कधी कधी ओळखता येत नाही. खंबीर नेतृत्व, गुणांची पारख, निष्ठा व प्रेमामुळे माणसे एकत्र येतात. यातला एकही घटक कमी पडला तरी सगळी व्यवस्था कोलमडू शकते. वेळीच सावरणे किंवा नाराजी दुर करणे हे प्रमुखाचे आद्य कर्तव्य ठरते आणि तशी पाळी येऊ न देणे हेच जास्त योग्य ठरते.
दुसरी एक बंडाळी असते आर्थिक. नुकतेच श्रीलंका, बॅंक ओफ अमेरीकाचे दिवाळे किंवा आपल्याकडच्या अनेक घोटाळे हे अशा बंडाळीतूनच तयार होतात. नको त्या आत्मघाती अनिष्ट योजना त्यातील पळवाटा माहित असल्यामुळे त्याचा अनेकांनी गैरफायदा घेणे हा अंतस्थ हेतू नंतर त्याचे परिणामी आर्थिक संकट ओढवून पुर्ण सिस्टिम कोलमडावयास वेळ लागत नाही. यासाठी कायदे, नियम अनुपालनासाठी होणारी दिर्घकालीन दिरंगाई आणि सर्वसामान्य जनतेचे अज्ञान याचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक पैसा, सत्ता आणि संसाधने याचा गैरवापर केला जातो. लोककल्याण, सार्वजनिक हिताकडे दुर्लक्षच केले जाते. वेगवेगळ्या चांगल्या योजनाही अशाच बारगळल्या जातात.
सर्वसामान्य जनतेचा वाली म्हणून उभे राहिलेले शासन, सत्ताधा-यांना चाप वेळीच लागण्यासाठी तेवढी यंत्रणाही सक्षम असली पाहीजे. सुशिक्षीत जागरुक नागरिकांनाही आपल्या कर्तव्य वा अधिकाराची / जबाबदारीची जाणीव होऊन दखल घेणे भाग पडले पाहिजे. सक्षम प्रशासन,लोक-सहभाग यांचे महत्व लोकशाहीत अभिप्रेत असते. अधिकाराचा गेरवापर वा सत्ता देश चालविण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी जर वापरली जात असेल तर मोठे आर्थिक संकट ओढवणे क्रमप्राप्त होते. आणि देशात अराजक निर्माण होऊन सत्ताधा-यांना पाय-ऊतार व्हावे लागते. हे जेव्हा वेळीच थांबेल. राज्यकर्ते वेळीच जागे होतील तेव्हा ख-या अर्थाने लोकशाहीचा मान राखला जाईल.
सार्वजनिक पैसा राज्यकर्त्यांनी / नोकरशाहांनी “विश्वस्त (Trustee)” म्हणून वापरल्यास असे धोके उदभवणार नाहीत. जेव्हा आपण सार्वाजनिक हित लक्षात घेतो तेव्हा वैयक्तिक हित असे काही राहतच नाही. जर असे होत असेल तर वेळीच आवर घालणे वा ती चुक लक्षात आणून देणे हेही न्यायालय, वृत्तपत्रे, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष यांचे प्रथम कर्तव्य ठरते. प्रगती आणि विकास दोन्ही हातात हात घालूनच कोणतेही राष्ट्र, कुटुंब किंवा व्यक्ती पुढे जात असते. शेवटच्या माणसांपर्यंत हा संदेश पोहोचणे हा विचार सुरुवातीलाच झाला पाहिजे. लोकजागृती आणि सक्रिय सहभाग या दृष्टिने महत्वाचा ठरतो. त्यासाठी प्रत्येकानेच आपापली जबाबदारीचे महत्व ओळखले पाहिजे.

छान लेख आहे.
ReplyDeleteDhanyawad 🙏
Delete