वेळ नाही हे सत्य की सबब
बरेचजण “वेळ नाही “ या सबबीवर काही चांगली कामे”उद्यावर” टाकतात. “उद्या” कधी येत नाही आणि एक दिवस खुप उशीर झालेला असतो. ( अगदी पेपर वाचणे, whatsapp बघणेसुद्धा जमत नाही) रोज आपण आपला एक दिनक्रम कसा सुरु करतो यावर आपला अख्खा दिवस ठरतो. विशेषत: स्त्रियांना स्वत:साठी अजिबात वेळ नसतो. दुस-यांसाठी कायम तत्पर असणा-या गृहिणी त्यांना स्वत:साठी कधीच वेळ नसतो. कधी लहान मुले, आजारी माणसे आणि नौकरी किवा इतर अनेक कारणे समजू शकतो परंतू ही तिन्ही कारणे नसतांनासुद्धा वेळ नसतो. मध्यंतरी एक पोस्ट वाचनात आली होती. “वेळ नसतो असे नव्हे, प्राथमिकता भिन्न असतात” ( They are not busy, but they had some other priorities). पुन्हा एथे अर्थशास्त्र कामी येते, “प्राथमिकता.” “भाकरी कि फूल” मध्ये भाकरीलाच प्राथमिकता असणार पण पैसे उरलेच तर नक्की फूल घ्यावे असे मला वाटते. भाकरी पोटाची भुक भागविते तर फूल मनाची भूक भागविते.
प्रत्येकजण आपला वेळ दुस-यांसाठीच व्यतीत करीत असतो. वेळेचे व्यवस्थापन स्त्रियांना जास्त जमते असे माझे मत आहे नंतर बघू म्हणता म्हणता वेळ निघून जाते. पशु-पक्षीसुद्धा दिवसभर कष्ट करतात मात्र अंधार पडल्यावर एकदम आराम करतात. आपण मात्र रात्रंदिवस काम,ताण आणि शक्तीचा अतिरिक्त वापर करुन त्याला (शरीराला) आराम देतच नाही. त्यासाठीच पुर्वी सण-समारंभ, ठराविक अंतराने माहेरी किंवा घरी आराम करणे (ऋतुमास, बाळंतपण व इतर निमित्त)) असे होत असे. तसे हल्ली आजारपण किंवा पर्यटन केल्याशिवाय हा आराम मिळतच नाही. छंद जोपासणे, खेळ खेळणे, नातेवाईकांकडे जाणे-येणे किंवा रोजच्या त्याच कामात काही-तरी बदल घडविल्यास हे शक्य होऊ शकेल. नक्की काय बदल घडावा हे ब-याचवेळा लक्षात येत नाही. शरीर आणि मन हेसुद्धा कधी तरी थकतात आणि त्यांना आराम देणे हे आपले प्रथम कर्तव्य आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी केल्यास अनेक समस्या निर्माण होणार नाहीत.
कामाची विभागणी, मधून मधून सक्तीची विश्रांती, नवीन कामाच्या पद्धती किंवा सोयीस्कर दुर्लक्ष, योग्यवेळी खांदेपालट किंवा वेळोवेळी इतरांची मदत घेतल्यास हे शक्य होऊ शकेल. अधिकचा हव्यास, परिपुर्णतेचा ध्यास, इर्षा, तुलना करणे टाळल्यास हे शक्य होईल. “वेळीच घातलेला टाका, नंतरचे नऊ टाके वाचवितो “ असे म्हणतात ते या बाबतीतही लागु पडते. पुरुषांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. वैयक्तिक आयुष्य आणि सामाईक आयुष्य यात गफलत करणारे नेमके नंतर पस्तावतात.
अध्यात्मसुद्धा अप्रत्यक्षरित्या हेच सुचवित असते. अतिहव्यास टाळणे, षडरिपुंना दूर ठेवणे, मिळाले त्यात समाधान मानणे, इतरांप्रती आदर बाळगणे, मन:स्वास्थ्य सांभाळणे अशा अनेक उपायांनी आपण आपले जीवन स्वत:बरोबरच इतरांचेही सुधारु शकतो. त्यात पर्यायाने योगा, खेळ, मनोरंजन आणि स्वत:ला काय पाहिजे ते ओळखणे हेही आलेच. आवड असली कि सवड काढली जाते या अर्थाने मुद्दाम वेळ काढणे हे आवश्यक असते. वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा कधीही वेळेचे महत्व जाणून प्राधान्य देणे गरजेचे ठरते.

Comments
Post a Comment