जगण्यातला आनंद
जगणे आणि आनंदाने जगणे यात बराच फरक असतो. अशी अनेक माणसे आपल्या अवती-भोवती असतात. ज्यांना सर्व काही मिळते तरी त्यांना कशाची तरी कमी जाणवत असते. याऊलट काही माणसे अशी असतात त्यांच्याकडे काहीच नसते तरी ते आनंदी असतात हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. यामागे असलेला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत असावा. आजारी, अपंग, अक्षम लोकांबाबतीत एकवेळ समजू शकतो मात्र धडधाकट, सर्व काही असुनसुद्धा ते कमालीचे उदास का असतात हा एक संशोधनाचा विषय ठरु शकेल. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मानणारी माणसे विरळाच असतात. शेवटी आनंद हा मानण्यावर असतो. एकाचा आनंद दुस-यालापण आनंद देऊ शकतोच असे नाही, कधी कधी उलटही होऊ शकते. मुळात जगणे म्हणजे काय? हेच मुळात समजायला वेळ लागतो.”चलतीका नाम गाडी” असाही काहीजणांचा दृष्टीकोन असतो.
दुसरा कोणी आपल्याला आनंद, सुख देऊ शकेल या अपेक्षेने काहीजण स्वत: काही प्रयत्न न करता कायमच दु:खी असतात. अमुक एक गोष्ट मिळाली तर मी सुखी होईन असे काहीजण मानतात,तर काहीजण त्या गोष्टीनंतरसुद्धा वेळेत न मिळाल्यामुळे दु:खीच असतात. शिखर गाठायचे तर आहे पण पाय-या चढून जाण्याची कुणाला जिद्दच नसते. एक म्हण आहे” तुमच्याकडे लिंबू आहेत, आंबट आहेत म्हणुन तोंड आंबट करुन बसायचे की त्यात साखर, पाणी व मीठ घालून आपल्याबरोबर इतरांनीही सरबताचा आस्वाद घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.” जन्मल्याबरोबरच जाण्याचे अज्ञात तारखेचे तिकिट काढून आलेलो आपण, त्या तारखे आणि वेळेपर्यंत जो प्रवास असतो तो प्रवास म्हणजेच जीवन असे म्हणतात. पाडगावकरांच्या भाषेत “हसत जगायचे की रडत” हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
ए जिंदगी गले लगाले.. 2) दिल हे छोटासा... 3) रोते रोते हसना सिखो.. अशा अनेक गाण्यांतुन हेच सुचित करण्यांत आले आहे. आपण या गोष्टी किती मनावर घेतो हे महत्वाचे! जे मिळाले त्यात समाधान मानून, जे मिळाले नाही त्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी पण एक ठराविक मर्यादेपर्यंतच. त्यानंतर हीच परमेश्वरी इच्छा प्रमाण मानून दुस-या कामाकडे लक्ष वळविणे योग्य ठरते. “उसकी कमीज मेरी कमीजसे ज्यादा सफेद कैसी?” हा प्रश्न ब-याचवेळा नाराजीचे कारण ठरते. पैसा, नोकरी, धंदा आणि यश गाठणे हेच अंतिम ध्येय बाळगून कुटूंबाकडे दुर्लक्ष करणारेही नंतर पस्तावतात. माणसे, नातेवाईक आणि मित्रमंडळी म्हणजेच सर्वस्व मानणारीही नंतर पस्तावतातच. एकूण काय सर्वांमध्ये समतोल राखणे आणि अंतर ठेवणे हेही तेवढेच महत्वाचे असते.
मुलांनी आई-वडीलांना सांभाळायचे हे गृहितच धरलेले असते, याला छेद गेला की दु:ख वाटते. म्हणजे थोड्क्यात अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्यास येते. आपण पेरलेलेच ऊगवते किंवा आपण जसे इतरांशी वागतो तसेच इतरही आपल्याशी वागणार हे माहित असूनही कधी कधी उलटच अनुभव येतो. काहीजण इतरांवर कायम विरोध किंवा टिका करण्यातच धन्यता मानतात तर काहीजण मी कसा गरीब, अज्ञानी, भोळा आहे असे दाखविण्यात स्वारस्य असते. काहीजण दिशा येईल तसे आपले वर्तन बदलणारेपण असतात. काहीजण जगबुडी झाली तरी चालेल पण मी बदलणार नाही अशा ठाम मतावर जगत असतात. एखादी छोटी गोष्ट फार मोठा बदल घडण्यास कारणीभूत ठरते.
आनंदी आयुष्य जगायचे कसे? तो शोधायचा कुठे? तुकारामासारखे संत भक्तीतून परमार्थ शोधतात तर आवडाबाई घरच्या कामातच आनंद शोधत राहते. आनंद, सदमा, अमरप्रेम असे अनेक चित्रपटाद्वारे आनंदाची व्याख्या विहित करण्यांत आलेली आहे. “आनंदाच्या डोही, आनंद तरंग” उमटायला वेळ मुळीच लागणार नाही पण तशी वृत्ती हवी, शिवाय प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात त्या वेळीच ओळखणे आणि त्याप्रमाणे वागून स्वत: व इतरांनाही आनंदी ठेवणे हे सहज शक्य होऊ शकते.

आनंदीआनंद. खूप सुंदर मांडणी 👌👌🌹
ReplyDeleteDhanyawad 🙏
Delete