वृक्षाबंधन
नुकताच “रक्षाबंधन” सण साजरा झाला. त्यानिमित्त्याने अनेक नवीन संकल्प, परंपरा सांभाळल्या गेल्या. कधी कधी लोकांची मजा वाटते. राखी-पोर्णिमेनिमित्त अनेक संदेश, विचारांची देवाण-घेवाण, फोटो, व्हिडिओ, गाणी शेअर करुन झाली. वैयक्तिक जीवनात खरेच एवढे / असे खरेच वागत असतील का? आपुलकीने चौकशी, विचारपूस करीत असतील का? करत नसतील तर निदान त्यानिमित्ताने तरी करत असतील / असावेत अशी आशा करुया.
एका संदेशाने (Msg) मात्र माझे लक्ष वेधून घेतले, तो होता “वृक्षाबंधन.” कधी कधी कौतुक वाटते, नवीन नवीन विचारांचे. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांना भाऊ नाही, त्यांनी किंवा आहे पण येऊ शकत नाही त्यांनी वृक्षालाच राखी बांधून सण साजरा करावा. किती छान ना कल्पना! तसेही मी “चिपको” आंदोलनाबाबत लहानपणी ऐकले होतेच. ज्यावेळी लोक झाडे तोडायला येत तेव्हा गावकरी असे करीत असत जेणेकरुन ते झाड तोडत नसत. तशीच ही वृक्षांबद्दलची संकल्पना, सुधारित स्वरुपात असावी, नक्कीच विचार करण्यासारखी आहे. माणुस हा मुळात निसर्गप्रेमी असतोच जरी तो निसर्गापासुन लांब जात असला तरी! असेही आपले संत म्हणुन गेलेच आहेत “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”
शेवटी बंधन हे मानण्यावर असते. आज आपण अनेक समस्यांना आंमंत्रण देऊन ठेवलेच आहे आपल्याच कर्माने आणि प्रगतीच्या नांवावर असंख्य झाडे तोडली जातात, तेवढीच पुन्हा लावली जावीत ही अपेक्षा असते, परंतु तसे होत नाही.
“तु चाल पुढे” हे जरी खरे असले तरी आपण आपलेच बंधन (जगण्याची) तोडत चाललो आहोत, त्याचा अनुभव नुकताच “करोना काळात” घेतला आहे. त्यातून आपण काही बोध घेऊन सुधारणा केल्यास नक्कीच थोडीफार निसर्गाची हानी कमी होईल असे मला वाटते. ज्या वृक्षांमुळे आपण श्वास घेऊ शकतो त्यांनाच आपण कापत चाललो आहोत. ज्या वृक्षांच्या अंगा-खांद्यावर खेळत मोठे होत होतो, त्यांच्याच जीवावर आपण उठलो आहोत. कोकणात अजूनही झाडे टिकून आहेत म्हणून तेवढे निसर्ग-सोंदर्य अजुन टिकून आहे असे म्हणावे लागेल. काही वर्षांनी मला अशी भीती वाटते की, झाडावर घर बांधून रहावे लागेल की काय?
एक कोकणी माणुस म्हणुन विचार केल्यास “ आजोबांची 40 नारळाची झाडे होती, त्यात मी माझी स्वत:ची किती भर घातली? याऊलट आता ती संख्या 14 वर येऊन पोहोंचली आहेत. अशी अनेक उदाहरणे असतील, तर मग प्रगती कशाला म्हणायची? माझी संपत्ती अशा निसर्गाच्या सांन्निध्यासाठी उपयोगी येत नसेल तर मी काय आयुष्यात काय कमावले? वृक्ष एका कुटुंबप्रमुखाची भुमिका बजावत असतो अगदी मरेपर्यंत. लहान असतांना इतरांची सोबत करीत असतो. मोठा झाल्यावर त्याच्या अंगाखांद्यावर पशु-पक्षी विसावा घेतात, घरटे बांधीत असतात. त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्थासुद्धा (फळे-फुले, वेगवेगळे रस, छोट्या छोट्या काटक्या) अप्रत्यक्षरीत्या होत असते. माणुसपण याचा फायदा कमी-अधिक प्रमाणात घेत असतो. साधा बांबूसुद्धा किती उपयोगी ठरतो ते आपण बघतच असतो. एकसारखी झाडेसुद्धा नुसती लावून उपयोगी नाही, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
अर्थ-संकल्पासारखे “वृक्ष-रोपणाचे” धोरणही परिणामकारक राबवावे लागेल. जमीन, हवामान आणि गरज लक्षात घेऊन याकडे गांभीर्याने सगळ्यांनीच बघितले पाहीजे. प्रोत्साहन, जागरुकता आणि महत्व दिल्यास नक्कीच सुधारणा होऊ शकेल. आयुर्वेदिक उपयोग लक्षात घेऊनही झाडांचे संवर्धन आता गरजेचे ठरले आहे. तुम्ही म्हणाल “शहरात कसे शक्य आहे?” आधीच जमीन थोडी, त्यात झाडे कुठे लावणार ? कुंडीत छोटी छोटी लावून मोठी झाल्यावर मग जिथे त्यांना वाढीस शक्य आहे, तेथे पुन्हा रुजवावीत आणि ही जाणिव शालेय स्तरावर मुलांच्या मनावर बिंबवावी. प्रसंगानुसार किमान एक तरी झाड लावणे अपेक्षित आहे. त्यांचे संगोपन करणे म्हणजे एक प्रकारे समाजाचे, निसर्गाचे ऋण फेडणे आणि माणूस जगविणे शक्य होईल.

Comments
Post a Comment