जावई /सुन शोधणे आहे
पुर्वी वर्तमानपत्रात “गोरी वधु हवी/ वर हवा” अशी जाहिरात येत असे. मला नेहमीच प्रश्न पडत असे, खरंच त्यांना मिळत असेल का? एक विनोद कायम तेव्हा सांगितला जायचा,”श्रीमान किंवा श्रीमती” शोधण्याच्या नादात वय मात्रा हरवून बसलेत म्हणून! आता तीच जागा वधू-वर सुचक मंडळांनी घेतलेली आहे. त्यांच्या टि.व्हि.वरच्या जाहिराती बघून तर मला अजुन एक आश्चर्य वाटते की ह्यांचे उत्पन्न एवढे खरेच असेल का? या कथा आणि व्यथा आता नवीन राहिल्या नाहीत. आमच्या पिढीने थोडे कमी अनुभवल्या असतील, आता मात्र हे प्रमाण खुप वाढत चालले आहे त्यामुळे थोडी चिंता आईवडिलांची वाढलेली आहे.
काही प्रमाणात काही जण हा प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करतात. जे आई-वडिलांच्या मर्जीवर / आवडी-निवडीवर, दर्जा, शिक्षण या गोष्टींसाठी अडून राहतात त्यांना मात्र बराच संघर्ष करावा लागतो. काहीजण नाईलाजाने तयार होतात, तर काहीजणांना मुद्दाम फसवून, खोटे-नाटे सांगून तयार केले जाते. पुढे होईल सगळे ठिक हा उदार दृष्टिकोन लक्षात घेऊन! अशी आजू-बाजूची उदाहरणे आणि लग्न झाल्यावरसुद्धा टिकेल याची शाश्वती कोणीच हल्ली देऊ शकत नाही. हे सर्व बघितल्यावर मला नेहमी प्रश्न पडतात. पुर्वीचीच पाळण्यातली, मोठी व्हावयाच्या आधीच बाल-विवाह व्हायचे ते बरोबर होते का? लगेच माझ्यावर टिकेचा भडिमार करायला लागाल तुम्ही.“मुलगी शिकली, प्रगती झाली” असे म्हणतात, पण हा एक वधु-वर शोधतांना अडथळा ठरतोय का? अपेक्षा दोघांच्याही वाढतात, आत्मनिर्भरता, स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय का?
सगळ्यांनाच ही समस्या कमी-अधिक प्रमाणात भेडसावत आहे. 25 वर्षे झाली की, आई-वडिल या शोधात असतात ते पार लग्न होईपर्यंत. “मीया-बीबी राजी,तो क्या करे मा-पिताजी” असा सावध पवित्राही काहीजण घ्यायला तयार असतात. नंतर जेव्हा संसारात पडतात तेव्हा खरे गुण कळायला लागतात आणि कोणी माघार घ्यायची यावरुन मग तु तु, मै मै सुरु होते. तेव्हा आणखीन अवघड अवस्था चोघांचीही होते. त्यात दोघे परदेशी आणि आई-वडिल मायदेशी असतील तर आणखीन कठिण. ही भानगडच नको म्हणुन “नकोच ते लग्न” असाही विचार बळावत चालला आहे. मै मेरी मर्जी” हा दृष्टिकोन बळावत गेल्यास सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनही बाधित होतो. शेवटी कोणतरी म्हातारपणाची सोय म्हणून सहारा घ्यावाच लागतो. तडजोडीची कल्पना, सामंजस्य, सकारात्मक दृष्टिकोन हे कोणत्याही नाते टिकवण्यासाठी लागतेच. योग्य अपेक्षा, समानतेची वागणूक आणि मनापासून स्विकारलेली बांधिलकी हे आवश्यक गुणांची आता खरेच नितांत आवश्यकता आहे. याची तयारी लहानपणापासुन किंवा जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा समुपदेशनाद्वारे पुर्ण करणे ही काळाची गरज आहे. ती प्रत्येकाने समजुन वेळोवेळी घ्यावी म्हणजे तुटणारे नाते-संबंध जोडायला थोडी तरी मदत होईल असे मला वाटते. त्यासाठी मुद्दाम वेळ काढुन हे संस्कार झाले पाहिजेत किंवा निदान लग्नापुर्वी तरी असे समुपदेशन दिले पाहिजे. यासाठी घरातलेसुद्धा आधुनिक पद्धतीने, व्याख्यान न देता कृतीने (आपल्या) सुद्ध नक्कीच दाखवून देऊ शकतात. यामागे असलेला गैरसमज, शास्त्रीय दृष्टिकोन, तडजोडीचे गणित व्यवस्थित समजावल्यास नच तरुण पिढी तयार होऊ शकेल.
तसेच त्या त्या वयातल्या प्राधान्यांवर भर दिल्यास सर्वकाही शक्य होईल. गरज आहे ती एकमेकांना समऊन घेण्याची व विचारांमध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment