ये कहा आ गये आ गये हम..
“सिलसिला” हा चित्रपट आणि हे गाणे माझे अत्यंत आवडते आणि अंतर्मुख करणारे गाणे आहे. संदर्भ वेगळा असला तरी आज आठवण्याचे कारण थोडे वेगळे आहे. सध्या सगळीकडे “तिरंगा-ज्वर” जोरात फोफावलाय, हे चांगले आहे. यामागे जाणीवपुर्वक “देशभक्त” राग आळवला जात आहे की, फक्त देखावाच आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 75 वर्षे हा कालावधी तसा मोठा आहे. कित्येक आहुत्या, बलिदाने, भळभळणा-या जखमा, काही युद्धे आणि काही अनिर्णित प्रश्न ऊराशी बाळगून आहोत. एका डोळयात हासू तर दुस-या डोळ्यात आसू असा हा संमीश्र योग आहे. स्वातंत्र्य सगळ्यांनाच प्रिय असते परंतु ते टिकवणे हे मिळवण्यापेक्षा कठिण असते.
75 वर्षापुर्वींचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास नक्कीच आता सर्व काही सोपे झालेले आहे. काही गोष्टी त्याचबरोबर लुप्त किंवा कालबाह्य होण्याची भितीही तेवढीच वाढलेली आहे. देशासाठी आन, मान, शान देणारे लोक कमी झालेत, ऊलट देशाला विकून खातील की काय अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असे वाटते. परदेशात जाऊन देशाचा झेंडा फडकावयाला तयार पण देशात राहुन त्या झेंड्याची शान राखावी असे वाटणारे कितीजण असतील. वर्षातील 2 दिवस ( 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी व्यतिरीक्ता ) वगळता आपण तिरंगा मनात तरी फडकवतो का? देशासाठी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा. या दिवशी ना मुले शाळेत जात, ना मोठी लोकं कार्यालयात बोलावून शक्य असूनही झेंडा वंदनाला जातात का. ना प्रभातफेरी, ना मनात देशाबद्दलचे प्रेम, आस्था, अभिमान. कुणीतरी भांडायला, कुरापती काढल्यावरच आपण जागे होणार, बाकीच्या वेळी मी, माझा संसार एवढाच मर्यादित विचार, आचार ना तशी कृती. दिखावा जास्त, मोठे समारंभ, मोठे देखावे यांचे स्थान मोठे ज्ञात आणि अज्ञात अनाम विरांचे स्मरण होते का ? जन-गण-मनसुद्धा हल्ली ध्वनीमुद्रित लावले जाते, तोंडाने जोरात म्हणायलासुद्धा काही जणांना लाज वाटते.
प्रत्यक्ष सीमेवर जाऊनच देशभक्ती दाखवली पाहीजे असे नाही. दैंनंदिन जीवनातही आपण ही देशभक्ती दाखवू शकतो. यासाठी जपानचे उदाहरण कायम लक्षात घ्यावे. आपल्या एवढीच त्यांची वर्षे झाली ( बेचीराख होऊन) पण ते कुठे आणि आपण कुठे पोचले आहोत. लोकसंख्या, वातावरण आणि मर्यादित जागा ह्या काही अपरिहार्य बाबी वगळता आपले प्रगतीसाठी पुरेसे प्रयत्न होत आहेत का? लोकांची मानसिकता बदलतेय का? असलेल्या साधनसंपत्तीचा तरी आपण पुरेपूर ऊपयोग करुन घेतो का? सामाजिक घडण किती सुधारली आपली? नितीमान, प्रामाणिकपणा वाढतोय की कमी होत चाललाय? उद्याच्या पिढीसमोर आपण आपला कोणता आदर्श ठेवणार आहोत? त्यांच्यासमोर कोणती नवीन आव्हाने आपण तयार करणार आहोत?
भविष्यात ऊदभवणा-या समस्यांचा गंभीर विचार करुन त्या निर्माणच होऊ नयेत म्हणून प्रयत्न करतो का? स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन पाहिजे तसा घेतो का आपण? स्वत: स्त्रिया तरी आत्मनिर्भर झाल्या आहेत का? देशतर लांबच राहिला. तंत्रज्ञानाचे फायदे घेतो पण त्याचे दुष्परिणामासाठी तयार आहोत का. किंवा टाळण्यासाठी प्रयत्न करतो का? “भारत” आणि “इंडिया” अशी विभागणी आपण टाळू शकतो का? देश म्हणजे तरी काय? भौगोलिक सीमा, वातावरण, मानवी वसाहत कि धरतीचे विभाजन ? तुम्ही, आम्ही मिळूनच देश बनतो, बनविला जातो आणि बनविला पाहिजे असे मला वाटते. हीच वेळ आहे सिंहावलोकन करण्याची आणि नवीन मार्ग शोधण्याची असे मला वाटते. शेवटी असेच म्हणावे लागेल.
II हे भारतवासी, मरगळ वाटे सगळीकडे
झटकून टाक आळस, दे तन-मन-धन,
लढण्यासाठी देशाकडून घे मान सन्मान,
आपला देश हाच खरा अभिमान II

Comments
Post a Comment