आक्रमण अनेकांचे
नुकतीच गिरिश जखोटीया लिखीत आणि श्री.जैंन अनुवादीत “आक्रमण” कादंबरी वाचनात आली. अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने चाललेले आक्रमण आणि त्यावर होऊ शकणारी मात अशी साधारण मध्यवर्ती कल्पना घेऊन लेखकाने आधुनिक महाभारत घडवून आणलेले आहे. पौराणिक संदर्भांचा ऊपयोग करुन समांतर हल्ला करुन आधुनिक प्रकारे कसे हे आक्रमणावर मात करता येईल याचे सोदाहरणरित्या छान पटवून देण्यात आलेले आहे. लेखकाचा आशावाद नक्कीच पूर्ण व्हावा ही इच्छा आणि तसेच घडावे ही प्रार्थना !
अनेकांचे आक्रमण अनेकांवर अनेक प्रकारे होत असते. इतिहासात अनेक दाखले मिळतील. भारत हा एक समुद्ध देश पाहूनच तर अनेक आक्रमणे झाली, होत आहेत आणि होत राहणार! सत्ता, लोभ, असूया आणि आकर्षण अशी अनेक कारणे यामागे असतात. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपाच्या आक्रमणाला तोंड द्यावेच लागते. वैचारीक, आर्थिक, जैविक आणि सामाजिक अशा अनेक स्तरावर हे आक्रमण चालूच असते. ज्याचा मुकाबला करणे हेच जीवनाचे ध्येय बनून जाते कित्येकवेळा. हेच जर खेळीमेळीत, प्रामाणिकपणे आणि वैध मार्गाने होत असेल तर नक्कीच समाजाची प्रगती होऊ शकते. तेच जर जबरदस्ती, चुकीच्या मार्गाने, वशिल्याने आणि भ्रष्ट आचार-विचाराने होत असल्यास समाजात तेढ, विषमता, अशांती निर्माण होऊ शकते.
साम, दाम, दंङ, निती आणि भेद वापरुन हे ब-याच वेळा आक्रमण केले जाते. कधी पुरुष स्त्रियांवर, मालक-नोकरांवर, सासु-सुनेवर आणि सबल-दुर्बलांवर (शारीरिक किंवा मानसिक स्तरांवर) वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. कधी नकळत, कधी नाईलाजाने तर कधी भीतीपोटी प्रतिकार करणे शक्य होत नाही. अन्याय वर्षोवर्षे होत असतो पण त्यावर कोणीच विरोध करत नाही. कधीतरी याचा अतिरेक हौऊन “कृष्ण” तयार होतो. अशावेळी “कृष्ण-नीती” अवलंबणे हीच खरी काळाची गरज आहे. कोणतरी तारणहार येईल आणि आपला उध्दार होईल याचीच वाट बघणारे मात्र लगेच याला साथ द्यायला तयार होतात.
सर्व-सामान्य माणूस त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यात तर पैसा कसा गुंतवावा या विवंचनेत उच्चवर्ग व्यस्त असतो. याऊलट या आक्रमणाचा सगळ्यात जास्त त्रास मध्यम वर्गाला होतो. “विरोधाची भुमिका घेण्याइतपत त्याची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक ताकद नसल्यामुळे “तो मुग गिळून” राह्तो. वास्तविक हा खरा वर्ग सुशिक्षीत आणि आपले अधिकार, कर्तव्य याबाबत जागरुक असतो पण तरीही या आक्रमणाप्रती दुर्लक्ष करित असतो. कधीतरी त्याचे परिणामाचे भयानक स्वरुप पाहुन मात्र तो खडबडून जागा होतो आणि मग क्रांती घडून लोकांनासुद्धा जाणीव करुन दिली जाते.
हे आक्रमण कधी कधी सौंदर्याचे कुरुपतेवर, स्वाभिमान किंवा कष्टावर आळसाचे तर कधी प्रामाणिकपणावर भ्रष्टाचारांचे असते. पुर्वी चोर, दरोडेखोर, लुटारु प्रत्यक्ष दिसायचे, त्यांचा राग फक्त श्रींमंतांवर असायचा. आता तसे नाही, छुपे गुन्हेगार, तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेणारे, आभासी जगाचा (डिजीटल व्यवहार, ई-कोमर्स आणि अप्रत्यक्ष सहभाग) उपयोग करुन सगळ्यांनाच फसविणारे खूप मोठा गैरव्यवहार करीत असतात. लक्षात येईपर्यंत खुप वेळ निघून जातो, नंतर शोध घेणेही कठिण होते. नुकताच आपण जागतिक स्तरावर करोनारुपी आक्रमणामूळे झालेल्या आर्थिक, सामाजिक असा भयानक नुकसानीचा अनुभव घेतलेला आहे. या सर्व पार्श्वभूर्मीवर लेखकाने “समांतर व्यवस्था” निर्माण करुन कसा त्याला शह देता येईल हे वाचकांना समजावून सांगितले आहे. जमल्यास हे पुस्तक नक्की वाचावे जेणेकरुन सध्या जे चालले आहे, त्याचे अवलोकन आणि त्यावरील उपायांचे पालन करु शकू.

Comments
Post a Comment