घर पाहावे बांधुन

         मध्यंतरी एक कविता पक्षाची “कैफियत” म्हणून वाचनात आली होती, त्याचा मतिथार्थ असा होता, जंगल तोडल्यामुळे पक्षी बेघर झाले होते. पर्यावरण वाचवा हे माहित होते परंतु तेव्हा हा मुद्दा लक्षातच आला नव्हता.  सगळे पक्षी आडोसा शोधतात कुठे ना कुठे, ठराविक पक्षीच घर बांधतात त्यामुळे नटसम्राट मधल्या बेलवलाकरांसारखीच कोणी घर देता का घर? ही व्यथा मन हेलावुन गेली. जी गोष्ट पक्षांची तीच माणसांचीसुद्धा आहे हे आपण कधी कधी तरी याचा अनुभव घेतच असतो. 

          लहानपणी घराचे चित्र घराचे काढा म्हटले की, एक झोपडी, समोर रस्ता, त्याच्या मागे सुर्योदय, आणि बाजूला झाड असे ठराविक साचा असे. स्वत: जेव्हा घर खरेदी करायाला गेलो तेव्हा अनेक अनुभव, त्यातील अडचणी कळल्या. काहीजणांचा झोपडीपासून महालापर्यंतचा प्रवास अनाकलनीय ठरतो, तर काही जणांचे घराचे स्वप्न शेवटपर्यंत पुर्ण होतच नाही.  काहीजण अगदी म्हातारपणात यशस्वी होतात ज्यावेळी त्याचा आनंद उपभोगेपर्यंत वर परत जायची वेळ येते. काही जणांना मात्र 2-3 घरे कशी काय मिळतात आणि ती सुस्थितीत ठेवणे कसे काय शक्य होते हे एक आश्चर्यच वाटते. एकुण काय घर लाभणे हा एक जुगारच वाटायला लागतो. नोकरी,लग्न, मुले आणि मग घर अशी साधारण चढती भाजणी सर्व-साधारणपणे असते. ज्यांना आई-वडिलांचे आयते घर मिळते ते यात भाग्यवान ठरतात. देखभाल खर्च हा एक मुद्दा असतोच मात्र असे कोणतेही पाठबळ नसतांना घर घेणे हे एक आव्हानच ठरते. बरेचजण त्यापेक्षा भाड्याने किंवा नोकरीचे ठिकाणी असलेले मालकाच्या अखत्यारीतले घरालाच प्राधान्य देतात. ते घर नोकरी असेपर्यंतच  मिळत असल्यामुळे त्यानंतरची सोय बघावीच लागते. 

        शहराच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक किंवा कंत्राटदार हे काम थोडे सोपे करतात पण तेवढेच पैसेही तेवढेच जास्त आकारतात.  गावी किंवा कुठेही जागा घेऊन घर बांधणे तसे स्वस्त असते परंतु वेळ, कष्ट व मेहनत जास्त होते.  त्यापेक्षा बहुतेकजण आयते बांधलेले घरच घेणे पसंद करतात.  त्यातही बुकिंग, कर्ज, तारण हे एक आव्हान पेलावे लागतेच.  ही सर्व प्रक्रीया खुप किचकट आणि वेळखाऊ असते. वैतागुन कधी कधी “घर नको पण प्रक्रिया कमी करा” असे म्हणावे लागते. या क्षेत्रात फसवणुकही ब-याच वेळा ग्राहकांची होते. दर्जा, पैसा तर कधी सुविधांचा अभाव तर कधी ताबा लवकर मिळत नाही अशा अनेक संकटांचा अनुभव घेऊन कुठेतरी शेवटी घर घ्यायचे  स्वप्न पुर्ण होते. एवढे सगळे होईपर्यंत सेवानिवृत्तीची वेळ जवळ येते. 

         काहीवेळा आधीचे घर नवीन करायचीपण वेळ येते तर कधी पुनर्विकासासाठी बांधकाम करावे लागते. तसेच मानसिक समाधान आणि पैशाची उपलब्धता यावरही घर कुठे घेणार हे त्यावर अवलंबुन असते. 

        वास्तविक “घरासाठी बचत” असा एक नोकरी लागल्यावर लगेच एक निधी सामुदायिक, किंवा खाजगीरित्या उभारणे सुरु झाले पाहिजे. जसे इतर कारणांसाठी सक्तीची बचत किंवा आयकरात सुट मिळण्यासाठी एक ठराविक रक्कम जमा झालीच पाहिजे. बांधकामाच्या किंमती आणि विकावयाच्या घरांच्या किंमती यांचे प्रमाणीकरण करणे, घर व्यावसायिंकावर कडक नियंत्रण, सामुदायिक वसाहत उभारणे अशा अनेक उपाय यासाठी सुचवावेसे वाटते. यासाठी ग्राहक संरक्षण कायदाच्या तरतुदींचाही आधार देणे महत्वाचे ठरते, मुख्य म्हणजे आपणच जागरुक राहणे अपेक्षित आहे.

        पुर्वीची चाळ पद्धत माणुसकीची जीवंत उदाहरणे असायची. हल्लिच्या “ब्लॉक सिस्टीम”मुळे जगाला माहित पडते परंतु शेजारच्याला गंधही नसतो अशी परिस्थिती असते. त्यामुळे “निवारा” ही किमान गरज असलेली माणसे मग कुठेही आपले बस्तान घालायला तयार असतात.  बांधकाम साहित्याच्या किंमती हा एक संशोधनाचा विषय ठरतो. समाधान, शांती, आपुलकी आणि आत्मविश्वास देणारी घर मग आपले एक जिव्हाळा जपण्यासाठीचे एक मंदिर वाटते.


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव