अमुचा राम-राम घ्यावा..
नुकताच गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त स्वत: गणपतीची मुलाखात घेतली तर त्याचे काय म्हणणे असेल? याचा घेतलेला एक आढावा.
श्री गणपतीचे धुमधडाक्यात झालेले पुनरागमन आणि विसर्जन दोन्ही एकाच डोळयात आसू आणि हसू याचे समिश्र मिश्रण आहे. आराध्य देवतेचा मान, बुद्धीची देवता म्हणून मिळालेली अगदी परदेशात देखील मला आवर्जुन सोबत नेणारे भक्तांची ओढ बघून खुप आनंद होतो. त्यानिमित्ताने होणारी एकमेकांकडे जाणे-येणे, भेदभाव विसरुन एकत्र येणे, कला-गुणांची होणारी ऊधळण आणि उत्साहाने सर्व काही भक्ती-भावाने साजरे करणे हे मला खूप आवडते. दरवर्षी “पुन्हा लवकर या” ची विनवणी करुन बोलवत असता म्हणून मला यावे लागते. कधी याचाही अतिरेक होऊ नये म्हणून मला तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. सणाच्या नावाने वारेमाप खरेदी, उत्साह आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. पुर्वी भरपुर कष्टाची सवय असलेला माणूस आज आळशी बनत चालला आहे. सारखे तेलकट, तुपकट पदार्थांची होणारी सढळ होणारे वाटप बघितले कि, दुसरीकडे दोन घास मिळत नसणारी माणसे आठवतात. त्यापेक्षा मला 4 प्रकार कमी वाढले तरी चालतील, पण एखाद्या भुकेल्या माणसांना दोन घास वाढलेस तर जास्त आवडेल. तुम्ही प्रेमाने वाढलेली भाजी, भाकरीसुद्धा मला प्रिय आहे. काही घरात सकाळी साधे जेवण आणि रात्री चमचमीत प्रकार असे दोन त-हा असतात. साधे तुम्ही 2 दिवस जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही का?
दुसरे तात्पुरता आणलेला उत्साह, एकोपा, आपुलकी आणि सदभावना मी गेल्यावर लगेच विसरुन जाता. विनाकारण एकमेकांना दोष देणे बंद करुन सरळ साधे जगणे तुम्हाला शक्य का होत नाही. मोठमोठ्या उंच मुर्ती बनवुन सार्वजनिकरित्या जो तुम्ही गोंधळ घालता तो तर मला अजिबात आवडत नाही. विसर्जनाच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी, प्रदुषण व विसर्जनानंतर समुद्र किना-यावरील मुर्तीची होणारी स्थिती मला बघवत नाही. आता गणेशोत्सवात सामाजिक संदेश / जाणिवेचा अभाग आढळून येतो. याबद्दल कधी कधी टिळकांना काय वाटत असेल याचाही मला प्रश्न पडतो. माझी मदत तुमच्या भल्यासाठीच असते, पण सर्व काही पैसा हेच साध्या नाही असू शकत. कधी कधी तुमच्या बुद्धीची किंव करावीशी वाटते. का असे वागता तुम्ही? प्रत्येक घरात गणपती ठेवणे शक्य नसल्यास कॉलनीचा, गल्लीचा आणि “एक गांव एक गणपती “राबविल्यास सगळ्यांचेच भले होईल.
माझ्या आगमनाचा हेतूच हा असतो कि, जे जे चांगले आहे त्याची क्षणभंगुरता तुमच्या लक्षात यावी. हे जगणे म्हणजे एक उत्सव समजुन तो आनंदाने, शांतीने, समाधानाने जगावे हे तुम्ही लक्षात घ्या आणि याची आठवण करण्यासाठी मला दरवर्षी यावे लागते. ज्यावेळी हे तुम्ही समजुन घ्याल आणि तसे जगाल असे वाटते तेव्हा मला यावेच नाही लागणार पृथ्वीवर! राम राम तर प्रत्येकाला एक ना एक दिवस घ्यायचाच असतो. परंतू जायच्या आधी आपण समाजाला काय देऊ शकतो याचा विचार केल्यास सगळ्यांचे भले होईल.

Comments
Post a Comment