सोयरे-सहचर
26 ऑगस्ट, 2022 रोजी पोळा साजरा करण्यांत आला त्यानिमित्ताने वर्षभर राबणा—या बैलांना एक दिवस आराम मिळून मालकाच्या हातचे चांगले पुरणपोळीचे जेवण मिळाले असेल. माझ्या नात्यातील मुलगी पहिल्यांदा ज्या कंपनीत नोकरीला लागली ती कंपनी केवळ प्राण्यांसाठी बनविलेल्या वस्तुंची निर्यात करीत असे. ऐकून आणि पाहून आश्चर्यच वाटले. (गादी, गालिचा, तक्क्या, टेकुन बसायला उशी, झोपायला फरचे पांघरुण असे वेगवेगळे महागडे प्रकार) प्राण्यांचा पोशाख तर बनवितातच. प्राण्यांच्या वाढदिवस स्पर्धा, फॅशन शो करण्यासाठी लागणा-या वस्तू पाहून आश्चर्य वाटले. प्राण्यांच्या बाल-लीला, मनुष्य-प्रेम, कार्टून यांची वेगवेगळे व्हिडिओज बघायला मजा वाटते.
आपली संस्कृतीच एवढी महान आहे की, पशु-पक्षी हे आपले सोयरे-सहचर समजूनच एकत्र गुण्या-गोविंदाने नांदत होते. अजूनही गांवा-गांवात गाय, बैल, कुत्रा-मांजर, पोपट-कोंबड्या असे प्राणी पाळले जातात. शहरात जागा लहान असुनसुद्धा कुत्रा, मांजर, पोपट-मैंना, लव-बर्डस, कासव, ससे असे वेगवेगळे सहचर राहतात. त्यांची एक आठवण म्हणून आपण “4 ऑक्टोबर” हा प्राणी दिन म्हणून जागतिक स्तरावरून साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांसाठी नागपंचमी, बैल-पोळा, बलिप्रतिपदा साजरी केली जाते. आपल्या देव-देवतांची वाहनसुद्धा प्राणीपक्षीच आहेत. श्री.सरस्वती-मोर, दत्तगुरु-गाय व कुत्रा, देवी-वाघ, गणपती-उंदीर, महादेव-नंदी(बैल), लक्ष्मीचे घुबड, विष्णूचे गरूड, यमाचा रेडा, आमची म्हालसादेवी-पाल असे अनेक आहेत. शेतक-याला शेतीला मदत करणारे गांडूळ, बेडूक, किडे-किटक खाणारे पक्षी आणि नांगरायला बैल अशा सोय-यांसकटच त्यांचे जीवन बांधील असते. एकमेकांसोबत राहूनच हे आपापले जीवन सुसहय करीत असतात. एकत्र कुटुंब पद्धतीत हे आपोआप होत असे, वेगळी अशी वागणूक देण्याची गरज नसे. त्यामुळे लहानपणीच हि शिकवणूक आपोआप मिळत असे.
प्राणी-पक्षीही तेवढाच लळाही लावतात विशेषत: लहान मुले, वृध्दांना प्राण्यांची जास्त ओढ असते. मालकासाठी प्राणी इमान राखून काहीवेळा जीवही देतात हे आपण अनेकदा वाचतो, गोष्टी ऐकतो, कधी कधी अनुभवही घेतो. एकवेळ माणसे दगा देतील पण हे प्राणी-पक्षी मात्र आपल्या मालकाशी कायम प्रामाणिक असतात. आपणही त्यांना मुकी जनावरे म्हणून त्यांची स्वच्छता, लसीकरण आणि खाणे-पिणे वेळच्या वेळी करीत असतोच. एकटेपणा आणि ताण-तणाव घालविण्याचे साधन म्हणुनही प्राणी-पक्षी सांभाळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परदेशात तर जवळपास सगळेच प्राण्यांचा सांभाळ करण्यास उत्सुक असतात. घोडा, उंट, गाढव, हत्ती, याक हे वाहन म्हणून आपल्याला मदत करतात. सैंन्य दलात व पोलीस खात्यात प्राण्यांच्या विशेषत: कुत्रा, गाढव व ऊंट यांचा उपयोग होतो आणि ते मानवी जीव वाचविण्यास मदत करतात.
पाळीव प्राण्यांची जोपासना, संगोपन हे एक जिकिरेचे काम आहे. प्राण्यांना भावना असल्याने त्यांचे संगोपन व्यवस्थित करावे लागते व त्यासाठी प्राणी प्रेमी मुद्दाम वेळ काढतात. प्राण्यांची आवड ही इतरांना त्रासदायक ठरु नये याचाही विचार झाला पाहिजे. शहरात कुठे बाहेर जावयाचे असल्यास प्राण्यांना कुठे ठेवायचा हा एक प्रश्न असतो. हा प्रश्न देखील काही प्रमाणात त्यांची पाळणाघरे सोडवितात. कुक्कटपालन, बकरी, शेळ्या-मेंढ्या पालन हे आर्थिक फायद्यासाठी काहीजण करतात. भारतीय संविधान कलम 51A (g) अन्वये, “वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे” हे मूलभूत कर्तव्यात येते. प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा त्रास टाळण्यासाठी आणि त्या उद्देशाने प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासंबंधी कायद्यात सुधारणा करण्याचा प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 (पेटा) आहे परिणामी, प्राण्यांना सहानुभूतीने वागणूक देण्याचा अधिकार आहे. याव्यतिरीक्त भारतात अनेक प्राणी कल्याण कायदे अस्तित्वात आहेत जसे, केंद्रीय स्तरावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि गोवंश संरक्षण आणि गोहत्या प्रतिबंध कायदा आहे. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA), ही गैर-सरकारी संस्था (NGO) समाजातील प्राण्यांशी अपमानास्पद वागणूक आणि व्यवसाय करताना क्रूर वागणूक बंद करण्यासाठी आणि प्राण्यांच्या हिताचा विचार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. सर्कसमध्ये प्राण्यांची नैसर्गिक खाणे-पिणे, जगणे डावलले जात नाही ना? सिनेमातला त्यांचा वापर प्राण्यांसाठी घातक ठरु शकतो. काही वेळा प्राण्यांना त्यांचे नैसर्गिक खाणे न देता अन्य खाणे खायला घालून आपण त्यांना आळशी बनवित नाही ना? प्राण्यांचे आयुष्यमान निर्धारीत असते. तेवढेच त्यांचे जीवन सुसह्य करणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून वागले पाहीजे. त्यांचे आजारपण, औषध-पाणी, दुखणे-खुपणे वेळीच बघितले पाहिजे. असा हा जीवनातील सखा-सोयरा, निसर्ग-चक्रातला महत्वाचा दुवा आपणच जोपासुन आपले जीवन सुसह्य करता आले पाहिजे. अप्रत्यक्षरित्या आपण हे पर्यावरण-रक्षणाचेच काम करित आहोत. यामागेही आपला स्वार्थाबरोबर परमार्थ असतो.

Comments
Post a Comment