एक होती राणी...

        एक होता राजा, एक होती राणी, एक आवडती, एक नावडती..ऽ अशी सुरुवात होउन अनेक गोष्टी लहानपणी ऐकल्या होत्या.  तशी कल्पना मनात आणुन आपण राजा व्हावे आणि राणीला आणावे किंवा आपला स्वप्नातला राजकुमार प्रत्यक्षात यावा आणि त्याने आपल्याला घेऊन जावे अशी बालसुलभ मनसुबेही रचले जात असत. काहीजण यशस्वी होतही असतील. काहीजणांना वास्तवाची जाणीव होऊन मिळाले त्यातच समाधान मानत असतील. काहीजण अजुनही आशा धरुन असतील. मला मात्र या गोष्टीतून एक नेहमी प्रश्न पडत असे, “नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे शेंबुड गोड” कसे लागत असेल?

        मोनालीसाने तर आपल्या सगळ्यांना वेड लावलेले आहेच. खरंच संसार राजा-राणीचाच असतो कि, सोबत आणखीन कोणी असावे लागते? नोकरदार स्त्री राणी कि गृहिणी राणी असते?  राजकुमारपण दमून-भागून येऊन घरात मदत करत असेल की मी राजा म्हणून कायम राणीला दासीच समजत असेल?  आई-वडिलांकडे राजकुमार आणि राजकन्या असलेली मुले लग्नानंतर सत्व सांभाळू शकत असतील का?  मनावर राज्य करणे चांगले की, सत्ता, ताकद आणि मस्तीने राज्य करणे चांगले?  सौंदर्य, गुण, स्वभाव कि श्रीमंती राणी बनविते?

         बुद्धिबळाच्या खेळात राणी गेली की खेळ संपला असे समजले जाते. प्रत्यक्ष जीवनात तेवढे तरी महत्व राणीला मिळते का? कधी कधी असेही अनुभवाने समजले की, कितीही चांगले वागले तरी नावडतीचे रुपांतर आवडतीत कधी होऊ शकत नाही. कित्येकजण आपल्या मुलींमध्ये, सुनांमध्ये अगदी मुलांनाही वेगवेगळी वागणूक देतात. असे का? असे अनेक प्रश्न नुकतेच एका राणीच्या झालेल्या निधनाने मनात निर्माण झाले. 

         आपल्याकडेही अनेक राजे-राण्या होउन गेल्या. राणी लक्ष्मीबाई (झाशी), रुपमती, पद्मिनी, जोधाबाई, तारामती, अहिल्याबाई होळकर आणि शिवाजीराजेंच्या काळातल्या अनेक जीजाबाईंपासून सईबाईंपर्यंत. त्यांच्या वागण्या-बोलण्यापासून त्यांचे विचार, धडाडी इतरांना मार्गदर्शक तर ठरलीच पण शत्रूलाही पाणी पाजणारी ठरली. आपल्या  स्वातंत्र्यानंतर कित्येक संस्थाने, राजघराणी खालसा करण्यात आली. तरीही त्यांचा थाट, वागणे, बोलणे, मान-मरातब कुठेही कमी झालेला नव्हता. त्यांच्या अनेक चुरस कथा अजुनही वाचायला, बघायला मिळतात. नुकताच हा अनुभव आपण बाहुबली चित्रपटातून घेतला. 

       परदेशात अजूनही राजघराणे, परंपरा यांना महत्व दिले जाते. त्यांचा वाडा, वस्तू, हत्यारे, प्रदर्शनात जपून ठेवले जातात.  त्यामानाने आपण लवकरच हे सर्व विसरुन जातो. नुकत्याच ब्रिटनच्या राणीचे (राणी एलिझाबेथ) निधन झाले. तेव्हा सगळ्या जगाने त्यांची नोंद घेतली. त्यांचा रुबाब, घराणेशाही, शिस्त, शिष्टाचार आणि वागणुकीचे कायम सर्वसामान्य जनतेला कुतुहूल वाटत असते. एकेकाळी ईस्ट-ईंडिया कंपनी चालविणारी राणी आपल्या भारत देशावर 150 वर्षेपर्यंत सत्ता गाजवित होती. सार्वभौमत्व म्हणजे काय ते या राजघराण्याकडुन शिकावयास मिळाले. खरे तर, त्यांचे अनुकरण आपल्या राजकीय नेत्यांनाही  बरेचसे शिकायला मिळेल! 

        कालौघात राजघराणी जरी सर्व नष्ट झाले असले तरी काहीजण अजुनही परंपरा, रितीरिवाज, घराणेशाही अप्रत्यक्षरित्या सांभाळत असतात. एकदा सत्तेत आलेले त्यांची मुलेबाळे यांना देखील जनता राज्याच्या वारसा प्रमाणे मान आणि परंपरेप्रमाणे सत्ता दिली जाते.  स्वघोषित राजकुमार, राण्या जरी असले तरी मानाने राज्य करणे केव्हाही हितकारक असते. वयानुसार आपले वर्चस्व आधीच्या राजाने किंवा राणीनेही सोडणे अपेक्षित असते. नाहीतर अगदी 72 वर्षे झाली तरी वाट पाहावी लागू नये. लोकांनी लोकशाहीत जागरूक रहाणे आवश्यक आहे. काय वाटते तुम्हाला? 



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव