सेवापूर्त्तीचा आनंद
नुकताच एका शासकीय अधिका-याचा सेवानिवृर्त्तीचा समारंभ साजरा करण्यात आला. सेवानिवृत्तीपेक्षा “सेवापुर्त्ती” हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. शासनसेवा ही एक (सशुल्क )सेवा आणि जनसेवा,कल्याणकारी हेतूने सर्वसमावेशक विकास साधावा अशा हेतूने आयोजित केलेली सेवा असते. चकमकाट/झगमगाट किंवा पगाराचे आमीष नसले तरी निवृत्तीवेतन आणि नौकरीत स्थेर्य या हेतूने काही जण सरकारी नौकरी स्विकारणारेही असतात. अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स यांनासुद्धा सरकारी नौकरी आकर्षित करत असते. वास्तविक 4 दशकापुर्वी केवळ 10वी व आता कोणताही पदवीधर परिक्षा देऊन ही शासकीय सेवेस पात्र ठरु शकतो. शासकीय नौकरी करण्यासाठी लागणारा संयम, थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती आणि सेवाभावी स्वभाव असणे आवश्यक असते. अशा या जेव्हा 38-40 वर्षे सेवेला पुर्ण होतात तेव्हा निवृत्ती कशी? सेवापुर्ती हवी ना!
सोहळा म्हटले की, मिरवणारे, कौतुक करणारे, जुन्या ग़ोष्टींची जाणीव ठेवून आठवणीने भेटणारे असे सगळेच येत होते. त्यात “सत्कारमुर्ती”सुद्धा साजीशीच होती,त्यामुळे प्रत्येकाशी हसून,बोलून समाचार घेत होती. “शेवटचा दिवस गोड व्हावा” हा अर्थ ख-या अर्थाने ती व्यक्ती जगत होती. अनेकजण अनेक सल्ले देत होते सेवेतील केलेल्या कामाचे तर फारच कौतूक झाले, ती व्यक्तीपण शांतपणे ऐकत होती. सल्ले अंमलात किती आणणार हे माहीत नाही पण एकूणच सोहळा मजेत आणि आनंदात पार पडला. कार्यालयीन सहकारी, मित्रमंडळी यांनी उस्फूर्त भाषणे केली ज्याने अंतकरण भारावून गेले आणि केलेल्या श्रमाचे चीज झाले असे वाटले आणि आम्ही सर्वजण आनंदात घरी पोहोचलो. एकूणच काय प्रेमळ निरोप, सगळे भेटी, फुलांचे बुके आणि रोख बक्षिस घेऊन समाधानाने परतल्यावर ती व्यक्ती परतली. आम्हालाही कौतुक होतेच आणि आदरही होता त्या व्यक्तीबद्दल म्हणून जास्त आनंद वाटला.
खरंतर 36-38 वर्षाची सवय तशी सहजासह्जी सुटत नाही, विशेषत: पुरुषतर घरात सामावून घ्यायला तसा वेळच लागतो. अशावेळी थोडा बाहेरचा प्रवास, नातेवाईक, मित्र-मंडळाच्या भेटी यांनी जरा सोबत केली किंवा विचारपुस केली तर हा काळ थोडा सुसह्य होऊ शकतो. हल्ली मोबाईल, टि.वी. इंटरनेट यामुळे एकटेपणा जाणवत नाही. प्रवास, वाचन, छंद जोपासणे आणि आराम केला तरी किती करणार हा मोठा प्रश्न असतोच. दुसरे काहीतरी व्याप हाती घेतल्याशिवाय हे रिकामपण सुसह्य होत नाही हेही तेवढेच खरे! पण आयुष्यभर कार्यालयीन काम केले त्यांना इतर ठिकाणी रमायला थोडा वेळ लागतो. म्हणूनच मला वाटते कि, ज्येष्ठांचे एक स्वतंत्र फळी प्रत्येक क्षेत्रात असावी. त्यांचा अनुभव, कौशल्य आणि मार्गदर्शन असे स्वरुप असावे. मग ते शिक्षण, व्यवसाय किंवा उद्द्योग, व्यापार, सेवा, खेळ यापैकी कोणत्याही क्षेत्रातले असू दे. तसेच ज्यांना परिस्थीतीमुळे काही गोष्टी करावयाच्या राहून गेल्या अशांसाठीसुद्धा एक वेगळे व्यासपीठ असावे जेणेकरुन त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे समाधान व समाजाची प्रगती होऊ शकेल.
स्त्रीयांनीसुद्धा या गोष्टींचा विचार सेवानिवृत्ती पूर्वीच करावयास हवा. बाहेर अशी कितीतरी माणसे उद्योगी मिळतील ज्यामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळू शकेल. पहिली इनिंग नवखेपणात, तडजोड करण्यांत अथवा परिस्थीतीनुसार बदलण्यात गेलेली असू शकते. दुसरी इनिंग मात्र अनुभवाच्या जोरावर आपण आपल्या मनानुसार जगू शकतो. त्यामुळे मनाजोगी, वेळ-काळ, प्रकृती सांभाळून, हौस किंवा समाजसेवा या दुहेरी हेतूने ही इनिंग खेळण्यात मजा आहे. शिवाय आयुष्याच्या जोडीदाराची साथही महत्वाची ठरते. दोघांनी मिळून पुढील आराखडा ठरविणे आणि एकमेकांना साथ देणे ही या काळातील अत्यंत गरजेची बाब असते.
संध्याछाया, नटसम्राट किंवा बागबान या चित्रपटातील समस्या या थोड्या-फार प्रमाणात उभ्या राहणारच आहेत तेव्हा दोघांनी एकत्र असणे ही काळाची गरज आहे. याशिवाय अध्यात्म्य, भक्ती, वाचन, लिखाण, छंद जोपासणे व असलेल्या पैशाचा सुयोग्य वापर आणि काही अर्थाजन करणे हेही एक मोठे आव्हान असते. स्वेच्छेने आणि मनापासून केलेले कोणतेही काम आनंददायीच ठरते. कधी कधी पैशाची गरजही असते त्यापेक्षा जास्त आवडीच्या क्षेत्रात वेळ देऊन काही अर्थाजन करणेही महत्वाची ठरते. जशी नोकरी, व्यवसाय किंवा धंदा आपण प्रामाणिकपणे करतो तसेच ही दुसरी इनिंगही शेवट गोड ठरावी हे प्रत्येकाचे ध्येय असते आणि ते सर्वांनीच गाठून देवाने जन्माला घातलेल्याचा उद्देश हा सफल व्हावा ही त्यानिमित्याने ईश्वरचरणी प्रार्थना !

Comments
Post a Comment