मानससरोवर-एक अजूबा
2022 वर्षीच्या पुर्वसंध्येला आम्ही शेगाव आणि लोणार सरोवरला” भेट दिली. गेले कित्येक वर्षांचा योग आता जुळून आला. वैज्ञानिक कुतुहल, विवर, पर्यटन स्थळ, अभयारण्य म्हणुन मुलींना दाखवायचे होते पण राहूनच गेले. काय वैशिष्ट्य आहे असे वाटेल तुम्हाला? हल्ली google भाऊ आणि “कसे काय अप्पा”वर बरीच माहिती पुरवितात पण प्रत्यक्षात बघण्याची जी मजा आहे ती अशी समजत नाही. हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात असुन प्राचीन (अंदाजे 50000 वर्ष) व निसर्गनिर्मित आहे. त्याचे पाणी क्षारयुक्त असुन, पाण्याची पातळी स्थिर असते. (यंदा मात्र काहीशी वाढली असे ऐकिवात आहे.) एकच मंदिर पायथ्याशी आहे ते जेव्हा बुडेल तेव्हा विनाश होईल अशी वदंता आहे. शिवाय आजुबाजूला तिवराची झाडे आहेत म्हणजे समुद्राचे /खाडीचे वैशिष्ट्ये, डोंगर असल्यामुळे पटकन लांबून दिसतही नाही म्हणजेच नैसर्गीक संरक्षण लाभलेले आहे तथापि एका विशिष्ट उंचीवर गेल्यास मोठा नजारा दृष्टीक्षेपात येतो. ड्रोनने वरुन कदाचित बघता येत असेल. एका बाजूने खाली उतरण्यासाठी पाय-या आहेत पण उतरताना सोप्या व चढतांना अवघड अशा स्वरुपाच्या पाय-या आहेत. त्याच बाजूला लहान लेणी आणि एक “गोमुख धार” असून त्यातून गोडे पाणी वाहते आणि सरोवराला जाऊन मिळते पण तरीही सरोवराचे पाणी गोडे होत नाही. विवरात अनेक मंदिरे आहेत, त्यांचे कळसच दिसतात पण जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्यामागचे रहस्य काय हे अजुनही कुणी सागू शकत नाही. त्यावर बगीचा करुन तो आहे तसाच ठेवलाय, पर्यावरण विभागामूळे अद्याप कोणतेही व्यापारी/आर्थिक आक्रमण दिसत नाही हे विशेष.
दुसरे “कैलास मानस-सरोवर” कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे
व तिबेटाच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.
या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून चहू बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या
ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. ह्या पर्वताची उंची ६,६३८ मीटर इतकी असून सिंधू, ब्रम्हपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या
नावाने ओळखली जाते), सतलज व कर्नाली अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात.
हे स्थान चीन व्याप्त तिबेट्मध्ये असुन या
हिमालयीन पठारालाही भेट देण्याचा मानस आहे, हा योग कधी येतो ते बघायचे!. हे शिखर शिवशंकराचे
निवासस्थान असुन पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी येथेच तप केले होते असे पुराण संदर्भ
आपण बघू शकता. मानस सरोवर (अपभ्रंश - मान सरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे. मानस सरोवर समुद्र सपाटी पासून
४,५५६ मीटरवर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानस सरोवर
आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. सरोवराचा घेरा ८८ किमी, खोली ९० मीटर तर क्षेत्रफळ
३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते.
कैलाश मानस सरोवर हे तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील अनेक भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान
करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून
कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण
ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे. हजारो लोक त्याच्या
तत्त्वज्ञानासाठी दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात. हिंदू विचारसरणीनुसार
हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला. मानसरोवर हा संस्कृत शब्द मानस आणि सरोवर
यांच्या जोडीने बनला आहे ज्याचा शब्दशः अर्थ “मनाचे सरोवर” आहे. येथे सती देवीच्या
शरीराचा उजवा हात पडला. दगडी देवीचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते, हे एक
शक्तीपीठ आहे. मानस सरोवर हे बौद्ध धर्मात
देखील पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की राणी मायाची ओळख येथे भगवान बुद्धाशी
झाली होती. जैन धर्म आणि तिबेटचे स्थानिक बोन्पा लोकही हे स्थान पवित्र
मानतात. या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत. मानस कैलास सरोवर यात्रा ही शारीरिक तंदुरुस्ती
पणाला लावणारी व कठिण अशी तीर्थयात्रा समजली जाते. अनेक ऋषी, मुनी आणि गिर्यारोहकांना
हे स्थळ कायम आकर्षित करित असते. हजारो भाविक अत्यंत श्रद्धेने आणि मनाची तयारी करुनच
दरवर्षी भेट देत असतात. हि-यासारखे आकाराचे आणि पुर्ण बर्फाच्चाधित असे हे कैलास शिखर
असून जीवननैय्या पार करतांना एकदा तरी पाहावे, प्रयत्न करावा असे वाटते. शक्यतो चालत्या-फिरत्या
वयात ही यात्रा केल्यास बरे. हल्ली यात्रा कंपन्यासुद्धा ती नेपाळ मार्गे सोप्पी करण्याचा प्रयत्न करतात. थोडी
खर्चीकपण मनाला कायमस्वरूपी “समाधान देणारी” अशी ही यात्रा हे एक ध्येय (माझ्या नव-याच्या
boquet list मध्ये आहे, अर्धांगीनी म्हणुन मलाही जायला मिळेल.) असू शकते.
तिसरे
सरोवर आपले स्वत:चे “मानस-सरोवर” ज्याला कधी कधी भेटतो तर काहीजणांना त्याचा पत्ताही
नसतो. ऋषी, मुनी, समाजसेवक, डोक्टर, योग, अध्यात्म आणि मानसशात्रज्ञांनीही याचे महत्व
जाणून त्याला काय पाहिजे ते “ओळखा” असे विवीध मार्गाने सांगितलेले आहे. आम्ही मात्र
जोपर्यंत काही अघटीत घडत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्वच मान्य करीत नाही. मनाचा शोध,
शक्ती आणि सामर्थ्य यावर अनेक संदेश, मार्गदर्शन मिळत असतेच. साने गुरुजींच्या आईने
“मनाचे पावित्र्य” जपण्याबाबत सांगितले होते शामला म्हणूनच म्हणतात ना, “मन चंगा तो
कटौतिमें गंगा”! बालपण, तारुण्य आणि इतर अनेक प्रलोभने आपल्याला मनाला भेट देणे जमतच
नाही. फारतर आपण त्याचा विचार “म्हातारपणात करु” असे म्हणतो आणि विसरुन जातो. तेही
(मन) “असू दे” म्हणून सोडून देते पण असे अचानक काहीतरी घडते आणि आपल्याला त्याचे अस्तित्व
मान्य करुन त्याला शरण जावे लागते. ज्यावर आपले सगळे भवितव्य अवलंबून आहे त्याचीच आपण
दखल घेत नाही हे किती आश्चर्यकारक/वेदनादायक आहे ना! ”आनंदाचे डोही आनंद तरंग” असे
तुकाराम म्हणून गेले ते उगाच नाही, शिवाय “तुझे आहे तुजपाशी” हेही तितकेच खरे नाही
का !
बाय द वे, मुंबई शहराला पाणी पुरवठा
करणारे भातसा, वैतरणा, तुळशी आणि मोडकसागर या तलावांचेही मोठे योगदान आहे हे विसरता
कामा नये. नवीन वर्षात अनेकांनी अनेक संकल्प केले असतील, त्यात “मानस-सरोवराला (दोन्ही
अर्थाने) भेट देणे” हा एक संकल्प करावा” ही नवीन शुभेच्छा !!

Very nice Madhavi!
ReplyDeletedhanyawad Madhuritai!
Delete