सप्तपदीची पन्नाशी
नुकत्याच एका लग्नाच्या सुवर्ण-उत्सवानिमित्त जाण्याचा योग आला. घरगुतीच सोहळा असल्यामूळे सगळेजण भेटले. उत्सवमुर्ती अगदी उत्साहात सगळ्यांचा समाचार घेत होते. साधाच पण नीटनेटका समारंभ आयोजित केल्यामुळे बरे वाटले. मीही मुलाखतीचे अवघड काम पार पाडले. त्या मुलाखतीतून नकळत दोघांचे विचार, एकरुपता आणि समर्पित वृत्ती दिसून आली. कोणताही बडेजाव न करता साधी राहणी आणि सगळ्यांना मदत करणे, दोघेही जाणिवपुर्वक नातेसंबंध जोपासतात. अनेकांसाठी “आदर्श असणारी” ही जोडी कधी “लग्नाची पन्नाशी पार केली हे कळलेच नाही” असे म्हणते तेव्हा कुतूहल मिश्रीत आश्चर्यच सगळ्यांना वाटले. 50 दिवसही लग्न न टिकणा-या या काळात तर हे खूप मोठे आव्हानच ठरेल! याचे सर्व श्रेय कौटुंबिक पार्श्वभुमी, समजुतदापणा (दोघांचा), संस्कार आणि अद्ययावत राहण्याच्या वृत्तीला द्यावे लागेल.
50 वर्षापुर्वीची लग्नातली/लग्नानंतरची
आव्हाने वेगळीच होती. बेळगांव ते मुंबईपर्यंतचा
प्रवास (सगळ्या अर्थाने) तसा सोपा नव्हताच पण दोघांनी हे आव्हान व्यवस्थित, एकमेकांच्या,
कुटुंबाच्या सहकार्याने पेलले. तसे बघायला गेले तर दोघे काही समानधर्मीय नव्हते. आवडी-निवडी
भिन्न, राहणीमान वेगळे, हुशारी, अंगभूत कौशल्य आणि एकमेकांना दिली गेलेली मोकळीक हे
कदाचित यशाचे भागीदार असावेत. परदेशी वास्तव्य, मुलांचे शिक्षण, एकत्र कुटुंब, घरातील
अनेक आणिबाणीचे प्रसंग आलेच असतील पण त्याचा बाऊ न करता समर्थपणे तोंड देणे हे दोघांचे
सामायिक कर्तव्य समजून पार पाडले. त्यात दोघांचा मनमोकळा स्वभाव व तडजोडीची वृत्ती
असल्यामुळे अवघड काम सोपे झाले असावे.
आमच्या आधीची पिढी हे करू शकली म्हणुन आम्ही
किंवा आमची पुढची हे सर्व काही करू शकेलच असे नाही परंतु तसे प्रयत्न करावयास काय हरकत
आहे? असे या जोडीकडे बघून म्हणावेसे वाटते. सगळे काही पटापट आणि आटोपशीर हवे म्हणणारी
पिढी हे आव्हान कसे पेलू शकेल हा एक संशोधनाचा विषय ठरु शकेल असे कधी कधी वाटते. करियर,
नोकरी आणि स्वत:वर असलेला विश्वास अनेक इतर अडथळे पार करु शकतो परंतु लग्न ही दोघांची
सामायिक जबाबदारी असल्यामूळे तिथे मात्र यशाची खात्री बाळगता येत नाही. ऊलट आताच्या
काळात “लग्न हे एक संकट” असे वाटणारी पिढी वाढत चाललीय याची खंत वाटतेय.
कितीही सुधारीक, उच्चशिक्षीत व्यक्तींनाही ही सप्तपदी “तप्तपदी” होऊ शकते. याची अनेक कारणे असली तरी तुलनात्मकरित्या स्त्रीला याचा जास्त त्रास आणि जबाबदार धरले जाते. परिस्थितीनुसार कोणीतरी कमीपणा घेणे आवश्यक असते म्हणुन क्वचित स्त्रिया घेतात सुद्धा पण ते नेहमीच गृहित धरले जाणे चुकीचे वाटते. “कधी तू, तर कधी मी” असा विचार आणि एकमेकांना सांभाळून घेणे हे जास्त गरजेचे आहे कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कोणी कोणाच्यामध्ये पडायला जात नाही. अशा वेळी मित्र-मैत्रीणी, डॉक्टर, आजुबाजूचे सहकारी यांची भुमिका जास्त महत्वाची ठरते. वेळीच यांची मदत घेणे हेही तेवढेच गरजेचे असते. “मी म्हणेन तेच खरे” ही वृत्ती सगळीकडेच चालेल असे नाही त्यामुळे “कुछ पाने के लिए, कुछ खोना पडता है” हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
आंतरजातीय,आंतरधर्मीय तसेच अगदी भिन्न-देशीय विवाहसुद्धा करणारे अनेकजण दिसतात. सर्व काही सारखे असूनही विवाह का टिकत नाहीत किंवा ते टिकावेत म्हणून प्रयत्न का केले जात नाहीत? हा मला एक पडलेला मोठा प्रश्न आहे. त्याची संभाव्य उत्तरे अनेक आहेत असे तुम्ही म्हणाल पण तडजोड तर सगळीकडेच करावी लागते मग इथे का नाही? सामाजिक आणि वैयक्तिक स्वास्थ्य जपण्यासाठी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे हे तरी मान्य आहे का आताच्या पिढीला? त्यासाठी लागणारा संयम आणि समर्पित वृत्ती आहे का? अनेक असे प्रसंग/घटना घडतात जिथे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कसोटी पणाला लागु शकते याची जाणीव यांना असते का? किंवा तशी जाणीव करुन दिली जाते का? पालक, समाज आणि स्वत: ते दोघे या सगळ्यांसाठी सक्षम असतात का? सक्षम नसले तरी सक्षमता आणण्याचा प्रयत्न तरी करतात का? अशा अनेक प्रश्नांची गर्दी माझ्या मनात यानिमित्त्याने निर्माण झाली आहे. काहीही असो ”नांदा सौख्यभरे“ एवढेच आपण म्हणू शकतो.

Comments
Post a Comment