तारे जमींपर...
एका बहिणीने स्वानुभवावर आधारित कवितेत असे लिहिलेले आहे.
“माझ्या आईचे 27 वर्षाचे बाळ आहे.
(माझा differently भाऊ) ज्याचे ती दात घासते,
शु-शी साफ करते, आंघोळीपासून ते
झोपवण्यापर्यंत सर्व कामे करते.
कधी तिच्या चेह-यावर थकवा नाही, निराशा नाही,
तक्रार नाही की नशीबाला दोष देणे नाही.
कुठून येते एवढी सहनशीलता? हे
धैर्य जन्मत:च असते की अनुभवाने येते?”
. कविता
लिहिणारी (मैत्रिणीची मुलगीच आहे) वाचून डोळ्यात पाणी आले. माझी मैत्रिण म्हणून नाही
तर अशा अनेक माता-भगिनी/पालक असतात ज्यांना अशी विशेष मुले/मुली असतात. त्यांचे धैर्य,संयम,
कष्टाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. याही परिस्थीतीत त्या नौकरी करतात, मुलांना
सांभाळतात, त्यांना हवे नको ते बघतात, प्रसंगी त्यांच्या जीवावर बेतेल असे प्रसंगही
निर्माण झाले असतील, तरी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी कायम उभे असतात.
फार वर्षापुर्वी “तारे जमींपर“ हा
चित्रपट बघीतला होता. आशय आणि गाणी खूप छान होती. जूना “कोशीश”, मराठीत “चौकट राजा”
आणि आताचा “येल्लो” (yellow) चित्रपटातून या समस्येचा थोडाफार ऊहापोह करण्यांत आलेला
आहे. त्यांच्या व्यथा मांडून समस्या जगापुढे आणण्यात काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत.
अशा दिव्यांग मुलांच्या अनेक समस्या असतात. परदेशात दिव्यांगांना जास्त सोयीसुविधा पुरविल्या जातात,
सामाजिक सुरक्षितता असतात. त्या प्रमाणात इथे
भारतात तेवढ्या मिळत नाहीत. तरी आता बरेच जण जागरुक होऊन प्रयत्न करतात. आता आई-वडीलसुद्धा
सजग असतात त्यामुळे वेगवेगळया प्रयत्नाने त्यांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला
जात आहे.
या निमित्त्याने एक आठवण सांगावीशी वाटते.
आमच्याच कंपाउंडमधला साधारण 4-5 वर्षाचा (विशेष) मुलास रोज त्याची आई गाडी (ट्रेन)
दाखवायला घेऊन जात असे. त्या दिवशी काही कारणाने तिला जायला मिळाले नाही. थोड्या वेळाने
मुलगा अचानक घरातून गायब. सगळेजण शोधून शोधून हैराण. शेवटी मुलगा हरवल्याची पोलीस तक्रारही
केली. तेव्हा आम्हाला कळले की तो “तसा विशेष” आहे मग तर आणखीनच काळजी वाटत होती. रात्री
12 वाजता जेव्हा पोलीस स्टेशनमधून” फोन येतो की, “मुंबई सेंट्रल” स्टेशनवर जाऊन भेटा.
( एका गृहरक्षक दलाच्या मुलीला तो मुलगा स्टेशनवर दिसला, तिने स्टेशनमास्तरला सांगून
पोलिसांना कळविले) अशा त-हेने तो मुलगा मिळाला. आज जेव्हा जेव्हा तो मुलगा दिसतो तेव्हा
तो प्रसंग आठवून अंगावर शहारे येतात. जर तो चुकीच्या लोकांच्या हातात पडला असता तर
काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. आज जेव्हा तो कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याच्या
आई-वडिलांचे कौतुक वाटते.
या मुलांना प्रेम, आपुलकी, सहानुभूतीपेक्षा
ते स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर कसे उभे राहू शकतील हे बघणे जास्त गरजेचे आहे. एक “mfpa” संस्था आहे, (मी ज्याची सदस्य आहे) तिथे अनेक विशेष
मुले-मुलींनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन मांडून जागतिक स्तरावर विक्री केली जाते.
वर्षभरातून एकदा ग्रीटींग्स, कॅलेंडर्स आणि गिफ़्ट पाकिटे पाठवतात तेव्हा खूप आनंद
वाटतो. मी उत्सुकतेने गिफ्ट पाकीटाची वाटही बघत असते. खरेच या संस्थेचे कौतूक करावे
तेवढे कमीच आहे. तशीच वरळी येथील NAB (कारखाना) जिथे केवळ अशा मुलांना प्रशिक्षण देऊन
आत्मनिर्भर बनवितात. अनेक खाजगी/घरगुती सेवाभावी संस्था असतात, जे स्वत:च्या मुलांबरोबरच
इतर मुलांचाही विचार करुन त्यांना शिकविणे, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न
करीत असतात. त्यांच्यासाठी पाळणाघरे, नोकरीच्या जवळ वसतीगृहे, काही सुख-सोयी दिल्यास
बरीच मदत होऊ शकेल. धडधाकट मुलांचे पालक जेव्हा अनेक तक्रारींचा पाढा वाचतात तेव्हा
“या” मुलांच्या पालकांनी काय म्हणावे असे वाटते. अर्थात या मुलांना त्याची काहीच कल्पना
किंवा तक्रार नसते हा भाग वेगळा. सुशिक्षीत पालकसुद्धा कधी कधी अशी परिस्थीती स्विकारायला
तयार नसतात तेव्हा खूप आश्चर्य वाटते. तेवढेच काही जागरुक पालक मात्र त्यांच्या भविष्याचा
विचार करुन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. त्यांना मदत करणे हे आपल्या सर्वांचीच म्हणजे
समाजाची सामाइक जबाबदारी समजून तसे वागणे अपेक्षित आहे.
दिव्यांगासाठी शासनाने अनेक सोयी-सवलती, अनुदाने, नौकरीत आरक्षण, पदोन्नतीत आरक्षण, आयकरात सवलती, निवृत्ती वेतन, स्टॉल्स विक्री करण्यास प्राधान्य देऊ केलेली आहेत. यातील काही दिव्यांग अभ्यास करून मोठ्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या खेळातील विकासासाठी पॅराओलिंपिकमध्ये देशाचे शान वाढवणारी हीच मुले-मुली असतात तेव्हा त्यांनाही तेवढाच मान मिळाला पाहिजे. कलाकार, रेडिओ जोकी, टेलिफोन ओपरेटर, वेगवेगळे स्टॉल्स (राखीव) अशा अनेक जागांवर त्यांना नियुक्त केले जाते तेव्हा ख-या अर्थाने दिव्यांग मुख्य प्रवाहात येऊ शकतील. त्यांना आवश्यक असलेल्या विशिष्ट उपकरणे, विशिष्ट गाडी दिल्यास त्यांच्या काही समस्या कमी होऊ शकतील. त्यांना ते करू शकणारी कामे ही केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवल्यास ते आर्थिकदृष्टया स्वावलंबी होऊ शकतील. त्यांच्या उपचारावर आयकर सवलत आहे. शासनाने दिव्यांगातील प्रत्येक प्रकारातील त्यांची गरज, ते प्राप्त परिस्थितीत कोणते कामे करू शकतील याचा विचार करून त्या कामात त्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे. दिव्यांग्याच्या पालकांना देखील पालनपोषणासाठी विशेष अशी आयकरात अतिरीक्त सवलत दिल्यास त्यांचा संगोपन होऊ शकेल. त्यांना सहानभूती न दाखवता सामाजित सुरक्षिते अंतर्गत त्यांना “विशिष्ट सोयी आणि सवलती” हक्क म्हणून मिळाल्या पहिजेत. देशात / समाजात त्यांना गरज आहे ते त्यांना समजून घेण्याची आणि परिस्थितीत स्विकारण्याची. द्याल ना मग लक्ष अशा मुलांकडे ? हेच तारे जमिनीवर स्वप्रकाशात येऊन इतरांनाही मार्गदर्शक ठरु शकतील. हो ना !

खूप छान विचारपूर्वक आणि परिवर्तक लिखाण
ReplyDeleteDhanyawad Madam 🙏
Delete