नाचु आनंदे
“गणेश जयंती” निमित्त ऐकलेले “गणराज ...नाचतो..” हे गाणे पहिल्यांदा जेव्हा ऐकले तेव्हा मोठी मजा वाटली होती. एवढा तुंदिलतनू असलेला गणपती कसा काय नाचु शकतो? टि.व्ही.वर एकदा यावरच एक कार्यक्रम आखला होता. सगळ्या स्पर्धक “100 किलो” वा थोड्या कमी जास्त वजनाच्या होत्या. त्यामुळे लठ्ठ मुली नाचू शकत नाहीत हा गैरसमज अवाजवी होता हे प्रथम लक्षात आले. मनात इच्छा असलेले कोणीही गाण्यावर ताल आणि फेर धरु शकतो.
हल्ली नाच-गाणे हे सक्तीचे झालेले आहे
की काय असे कधी कधी वाटते. लग्न-समारंभ, पार्टीज,
साखरपुडा इत्यादी प्रसंगी तर नाच-गाणी आवश्यकच झालेले आहे. काही नाचातील पाऊले
(Steps) मुद्दाम शिक्षकामार्फत बसवतात, शिकवतात आणि कार्यक्रमात गाण्यांवर नाच केला
जातो. आमच्यासारखे न नाचता येणारे थोडे मागास समजले जातात. समजो बापडे!
नर्तनकला ही एक व्यावसायिक, सामुदायिक किंवा वैयक्तिक आनंद घेण्याची व देण्याची कला
आहे. यात अनेक प्रकार असून पारंपारीक, प्रादेशिक तसेच परकीय शैलीसुद्धा आत्मसात केली जाते. अंगभुत कौशल्य,
आवड आणि अभ्यास याद्वारे ही कला शरीर सौष्ठव, लवचिकता जपणारी आणि मानसिक समाधान देणारी
आहे. काही राज्यात (केरळ आणि बंगाल) काही घरगूती / सामाजिक कार्यक्रमात तर हे सक्तीचे
होत असून वधु-परिक्षासुद्धा याद्वारे केली जात असे. सामाजिक माध्यमामुळे याची लोकप्रियता खूप होते. लहान
वयापासूनच ही कला जोपासता येते. समाज माध्यमावरील टि.व्ही. वरील विविध रियालिटी शोजमूळे
याची जाहिरात आणि आवड निर्माण होण्यास मदत होते. त्यामागचा व्यावसायिक दृष्टीकोन मात्र कधी कधी घातक
ठरतो.
पुर्वी फक्त चित्रपटापुरतीच मर्यादित
असलेली ही कला आता घराघरात शिरत असून कार्यक्रमात सामान्य मुलीचीसुद्धा इच्छा असू शकते.
प्रायोजकसुद्धा प्रोत्साहन देण्यास हल्ली तयार असतात. नृत्य येणे अभिनेत्रींना सक्तीचे
असे आता तसे नाही. वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, माधुरी दिक्षीत अशा अनेक अभिनेत्री नृत्यांमुळेच
जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. कोणतीही कला
कधी बदनाम नसते फक्त आपण तिचा वापर कसा करतो यावर अवलंबून असते. हेलन आणि बिंदुसुद्धा नृत्य करायचे पण कधी त्यातुन
वाईट भावना दिसून आली नाही.
शाळेत असतांना वर्षातुन एकदा तरी समुहनृत्य
केले जायचे. कॉलेजला ऐछिक असायचे त्यामुळे सहसा कोणी नृत्याला महत्व द्यायचे
नाही. हल्ली त्यामध्ये एरोबिक्स, वेगवेगळ्या कसरती अधिक दाखवल्या जातात. लहान मुलांच्या नृत्याचे कार्यक्रम बघायला मजा येते.
नृत्यातून हावभाव, वेगवेगळ्या मुद्रा आणि संदेश
सादर करण्याची संधी मिळते. ज्येष्ठांनासुद्धा यामुळे आनंद आणि मानसिक समाधान मिळुन
जाते. तथापि ब-याच ठिकाणी नृत्याच्या नांवावर जे काही केले जाते ते मात्र बघून कधी
कधी वाईट वाटते.
गोपीकृष्ण, शामक दावर, सरोज खान, फराह
खान असे अनेक कलावंत नृत्य आणि कोरियोग्राफर
म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रामाणिकपणा, समर्पित वृत्ती आणि योग्य तिथे प्रोत्साहन
दिल्यास व्यक्तिमत्च विकासास हातभार लावणारी, मन:शांती देणारी ही एक कला आहे. काही गाणी आपोआप नृत्याचा ठेका धरायला भाग पाडतात
अगदी देशावरची गाण्यावरसुद्धा ठेका धरलेला
दिसतो. एकदा श्री.श्री. रविशंकर यांच्या वर्गात
एक भजन लावण्यात आले होते त्याच्यावर भान हरपून नृत्य करण्यास सांगण्यात आले होते.
आपोआप जमत गेले, कसे ते याचे माझे मलाच नंतर
आश्चर्य वाटले. तन्मय होउन नाचणे हीसुद्धा
एक कलाच म्हणावी लागेल. भलेही कोणतेही शास्त्रीय
शिक्षण घेतले नसले तरीही.
उपजिवीकेचे साधन आणि आनंद अशी ही रस्त्यापासून
सुरु झालेली कला अगदी महालात पोहोचली तरी आनंद
मात्र सगळ्यांना सारखाच देते. पुरातन शैलीचे नृत्य आपल्याला वेगवेगळ्या मंदिरातून,
लेणींतून पहावयास मिळते. देवादिकांनासुद्धा कधी कधी या कलेचा आधार घ्यावा लागला होता.
याचा संदर्भ पुराणिक कथांमधून तांडव नृत्य,
मोहीनीअट्टम यामधून दिसून येतो. शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि हल्लीची डि.जे.वर
थिरकणारी पावले (पाश्चिमात्य शैलीत) बघितली की मजा वाटते. तसेच व्यक्त होणे आणि आनंद घेणे हा ही एक ताणतणाव कमी करण्याचा उपाय ठरु शकतो. आपल्या वाटेल तेव्हा आणि जमेल तसे (अगदी वयाचे बंधन
नाकारुन) “पाय थिरकवत राहा,” ज्यामुळे मन तरुण, उत्साही आणि आनंदी वाटेल.

Uttam bhasha shaili, Mandani, ani mahiti. 👍💐🙏
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteNav lihile aste tar!👍