राजदूत (Ambassador)
राजदूत/राजनैतिक अधिकारी किंवा राजशिष्टाचार अधिकारी असे म्हणता येईल. लहानपणी माझी इतर अनेक इच्छांप्रमाणे राजदूत बनण्याची ( सी.ए., वकील बनायचे होते) हीही एक इच्छा होती ती राहून गेली. नंतर कळले की, त्याला लागणारे शिक्षण,पात्रता आणि स्वभाव गुण माझ्या अंगी नसल्यामूळे कदाचीत देश एका चांगल्या राजदूताला मुकला असावा. “Better luck in next birth!” असो. होते ते ब-या साठीच म्हणायचे. तसेही शासनाचे/शासनातर्फे मीही एक प्रकारे लेखापरीक्षणच करते आणि कर-आकारणीबाबतची “राजदूत” आहेच की! (दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायची).
पुराणात/महाभारतातली असफल“कृष्णशिष्टाई” प्रसिद्धच आहे. सफल झाली असती तर युद्ध झालेच नसते. रामायणातील हनुमानाने देखील रावणाकडे सीतेच्या सोडूवणूकीसाठी “राजदुताचे” काम जोखीम घेऊनच पार पाडले. ती सफल झाली असती तर रामानेही रावणाशी युद्ध केलेच नसते. शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा बोलणी करणारे वकीलच यशाचा पाया रचत होते. ( अफजलखान वध असू दे नाहितर आग्र्याहून सुटका असू दे.) मुसद्देगिरी, वक्तृत्व, दुरदृष्टी आणि देशावर असलेली निष्ठा यांची कसोटी घेणारे असे हे व्यक्तिमत्व सगळ्या देशांसाठी /राज्यकारभारांत अत्यंत भुषणास्पद असते. आंतर-राष्ट्रीय स्तरावर या राजदूताचे काम गृहित धरले जाते. प्रत्येक देशासाठी स्वतंत्र राजदुत नेमले जातात. राजकिय महत्वाकांक्षा, परदेश प्रवास, जोखीम आणि देशाचे प्रतिनिधित्व अशा अनेक अंगाने परिचीत असलेला हा अधिकारी भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. देशाचे महत्वाचे निर्णय, वाद-विवाद, आंतर-राष्ट्रीय करार यांच्या शिफारशीवरुन, पत्रव्यवहार करणे, यजमानांच्या, पाहुण्यांच्याभेटी, त्या देशातील भारतीय लोकांचे हितरक्षण, स्वागत-समारंभ आयोजित करणे अशा अनेक कर्तव्यासाठी ते बांधील असतात.
परराष्ट्र खाते यासाठी सदैव जागरुक असते. हेरगिरी, काही गुपिते यांची गळती होण्याची शक्यता असते. हा अधिकारी कायम देशहितकारी कार्यक्रमांत मग्न असतात. याशिवाय देशप्रमुख, राष्ट्रपती यांना त्या देशाची परराष्ट्र निती आखतांना मदत करणे, आणिबाणी, दुखवटा, संकटात, दुस-या देशांना मदत वितरित करणे, त्याचा अहवाल देणे, अशी अनेक जबाबदा-या त्यांच्यावर असतात.
भारतावरील आणिबाणीच्या प्रसंगी देशाचे हितसंरक्षण करणे, अधिकृत भूमिका यासाठी “राजदुताचाच” सहभाग महत्वाचा ठरत असे. वेगवेगळी मौल्यवान भेटी देऊन ही राजकिय मुत्सुद्देगिरी पार पाडली जात असे. ब-याचवेळा अशा वस्तुंच्या देवाण-घेवाणीतून व्यवहार पार पाडीत असत. इंग्रजांनी तर व्यापारी म्हणूनच पहिल्यांदा पाय रोवले होते त्यासाठी त्यावेळच्या विविध राज्यांकडे, संस्थानिकांकडे राजदूत नेमले होते. पोर्तुगीज, फ्रेंचांनीही तेच केले होते त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे.
शाकुंतलात “मेघदूताने”सुद्धा राजदूताची भुमिका पार पाडलेली आढळून येईल. (Brand ambassador). देशांतर्गत व्यापारी उत्पादनासाठी मराठीतील मिलिंद गुणाजी भटकंती, मुग्धा वैशंपायन-कालनिर्णय- समिर धर्माधिकारी-नेसकॅफे, जुही चावला-कुरकुरे अशा अनेक ब्रांड ॲम्बेसॅडरस आपल्याला माहित असतीलच. यांचेही काम त्यांच्या कडील उत्पादनाचा प्रचार आणि प्रसार असे असते. त्या त्या वस्तुची, सेवेची, उत्पादनाची जाहिरात, प्रसिद्धी आणि लोकांना महत्व पटवून देणे. त्या बॅंडचे “मध्यस्थ”, “प्रतिनिधी” अशा अनेक नावाने ही मंडळी आपल्या अवती भोवती वावरत असतात.
अशीच महत्वाची जबाबदारी घरातली स्त्रीयाही पार पाडीत असतेच. पै-पाहुणे, नातेवाईक, मित्र-मैत्रीणी यांचे सबंध टिकविणे हे नकळत परंपरागत कर्तव्य म्हणून बजावले जाते. त्यामागील चांगला- वाईट हेतू हाच असतो. भविष्यात या ओळखींचा कसाही उपयोग होऊ शकतो हे ती जाणून असते. हाच अनुभव आपण विविध कार्यक्रम, पर्यटनाच्यावेळी घेत असतो. परदेशात पर्यटन, उद्योग करण्यासाठी आलेले परदेशी पाहूण्यांना वेळोवेळी राज्यातील अनेक अधिकारी कार्यालयीन कामकाजाचा भाग आणि त्याहून जास्त देशातील रहिवासी स्वयंस्फुर्तीने “अतिथी देवो भव” या पारंपारिक भावनेने सहकार्य करीत असतात, यावेळी ते अप्रत्यक्षरित्या राजदूताचेच काम करीत असतात. त्यांमूळे देशाचे नाव बाहेर चांगले होते. अन्य परदेशी लोकांना भारतात येण्यासाठी प्रोत्साहीत करतात. भलेही त्यांना कोणी राजदूत म्हणून नियुक्त केलेले नसले तरी. उगीच नाही अमिताभ बच्चन म्हणतात “पधारो हमारो गुजरातमा” हे त्यांना गुजरातचे “ब्रांड ॲम्बेसॅडर” नियुक्त केल्यामूळेच. वास्तविक अमिताभ बच्चन महाराष्ट्र, गुजरात, गुजरातचे समाजोपयोगी अनेक जाहिराती करतात. “दो बुंद जिंदगीके” म्हणून पोलिओ डोसचीसुद्धा जाहीरात करतातच की! असा हा राजदुताचा महिमा किती म्हणून वर्णावा!

Comments
Post a Comment