प्रेम - एक चारोळी

             फेसबुक वर नुकतीच एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. “प्रेम”  या विषयावर चारोळी लिहीणे. मला तर अशक्यच वाटले तरी 15-20 स्पर्धकांनी  भाग घेतला होता. बघून त्यांचे कौतूक आणि आश्चर्य वाटले.  अजून निकाल लागायचा आहे पण मी आधीच सगळ्यांना मनातल्या मनात सलाम करुन टाकला.  विषय तसा नाजुक, गुंतागुंतीचा, प्रगल्भ आणि विस्तृत असल्यामुळे मला तरी कठीणच वाटला. 

         “अनारकली” मधले गाणे नेहमी यासंदर्भात आठवते  “ये जिंदगी ऊसिकी है,...प्यारही में खो गया..” अप्रतिम रचना, आवाज आणि सादरीकरण. चित्रपटातून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हाच विषय नेहमी चघळला जातो. वेगवेगळ्या वाटा, अडचणी, खाचखळगे यातुन आपले प्रेमवीर जिंकून प्रेम सिद्ध करतात. कधी यशस्वी तर कधी अयशस्वी होतात. मोहब्बत, प्यार, इश्क, प्रित आणि अभिलाषा अशा अनेक अर्थानी सर्वश्रूत असलेल्या प्रेमाची व्याख्या कोणी अडीच अक्षरात करते तर कोणी चारोळीत करते. नि:स्वार्थी, मुके आणि अव्यक्त प्रेमाची अनुभूती जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण कोरडेच आहोत असे वाटते. आनंदी जगण्यासाठीचा प्रेम हा आवश्यक घटक ठरतो. 

        प्रेमामध्ये सर्व काही माफ असते, असेही काहीजणांना वाटते. तर काहीजण प्रेमासाठी जीवही द्यायला किंवा घ्यायला तयार असतात. प्रेमात भावना, काळजी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे महत्वाचा. प्रेम देणे, घेणे, स्विकारणे, पुन्हा पुन्हा करीत राहणे हा काहीजणांचा स्थायीभाव असतो. काहीजण हा हक्क समजतात तर काहीवेळा प्रेम आपोआप सहवासाने होत जाते.  नैसर्गिक किंवा सगुण साकार प्रेम व्यक्त केले जाते तर काहीवेळा अव्यक्तच राहुन जाते. ब-याच वेळा प्रेम गृहीत धरले जाते. प्रेमापोटी बिघडलेला माणूस सुधारु शकतो तर चांगला माणुस वाईट होतो. दुधारी शस्त्रासारखे हे कधीतरी आपल्यालाच मारक ठरते. 

          सौंदर्य,  बुद्धिमत्ता, धाडस, शौर्य, पैसा हे कधी कधी प्रेमाला आकर्षित करते.  दया, कर्तव्य, सहानुभुती आणि माणुसकी प्रेम करायला भाग पाडते. प्रेम लाभणे,  मिळविणे आणि टिकविणे सगळ्यात कठीण असते.  मुळात प्रेमाची जाणीवच कधी कधी होत नाही,  जेव्हा होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे प्रेम हे वेळच्यावेळी व्यक्त करणे हेही महत्वाचे आहे. माणुस जास्त प्रेमाचा भुकेला असतो, त्यासाठी कोणतेही अवाजवी धाडस करायलाही तयार असतो. अयशस्वी झाल्यास  अत्यंत निराश होतो आणि ब-याच वेळा वाईट मार्गाने जातो. प्रेमाचे दोन शब्द एखाद्याचे आयुष्य बदलून टाकते तर तेच प्रेम कर्तव्य करताना पायात बेडी बनते.  

                आपण आपल्याही नकळत एखाद्या जागेच्या, वस्तुच्या, प्राणी, पक्षी, निसर्गाच्या प्रेमात पडत असतो. मुळात जीव लावणे हे माणसालाच जमू शकते. सैनिक, डॉक्टर, समाजसेवक हे माणुसकीच्या प्रेमापोटीच सेवा देत असतात. समुपदेशक नेहमी सांगत असतात, “आधी स्वत:वर प्रेम करा” पण नेमके आपण ऊलटे वागत असतो. गायक गळ्यावर, वादक वाद्यावर, कवी लिहिण्यावर, साहित्यिक साहित्यावर, सैनिक देशावर प्रेम करीत असतो.  आपले मात्र स्वत:पेक्षा  दुस-यांवर जास्त प्रेम असते. अपेक्षाभंग झाला की मात्र आपण निराश होतो.             देवावर प्रेम करणारे भक्त म्हणवले जातात. भक्ती, वात्सल्य, जिव्हाळा, मैत्री अशा अनेक स्वरुपात आपण प्रेमाचा अनुभव घेत असतो. अशा या प्रेमाची आवश्यकता जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला असते. सगळ्यांना मिळतेच असे नाही, मिळाली तरी त्याची जाणीव असतेच असे नाही. काहीजण मात्र आयुष्यभर प्रतिक्षाच करतात. साने गुरुजी म्हणतात “जगाला प्रेम अर्पावे.” प्रेम दिल्याने प्रेम वाढत जाते, फिरुन आपल्याकडेच पुन्हा येते. सहानुभूतीने जगल्यास सगळे काही प्रेमस्वरुप वाटते. “जो आवडे सर्वांना, तो आवडे देवाला” असेही काहीवेळा घडते. 

              चारोळी म्हणता म्हणता निबंध लिहून झाला कि हो! असे हे प्रेम,  “बेगडी न ठरता, डोळस असावे, योग्य तेव्हा मार्गदर्शक, अडथळा न होता दिशादर्शक ठरावे,” हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव