संत-महिमा वर्णावा किती?

 

                           !! सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा,

                            उपेक्षू नको गुणवंता, अनंता, रघुनायका मागणे हेची आता !!

                                                 !! जय जय रघुवीर समर्था!! 

              या निरुपणाशिवाय (बहुधा आरती झाल्यावर) कोणतीही प्रार्थना पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. त्याचे रचियता कोण हेही आपल्याला काही वेळा माहित नसते तरी आपण हे परंपरागत म्हणत असतो. लहानपणी आई देवळात किर्तन, प्रवचनाला  घेऊन जायची तेव्हा  त्यातून वेगवेगळ्या संतांचा महिमाचा परिचय व्हायचा. त्याचा परिणाम स्वभाव व वर्तणूकीवर होत असे.  नंतर विविध वाचनातून संताची बरीचशी ओळख होत गेली आणि संतांचा महिमा थोडाफार लक्षात येऊ लागला. भारताला “संतभुमी” म्हणुनच ओळखले जाते. महाराष्ट्र तर “संतांचे माहेर” म्हणावे लागेल. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, जनाबाई, सखूबाई, कलावतीआई, राघवेंद्रस्वामी (कर्नाटक), कबिरदास (उत्तर प्रदेश) असे अनेक संत आपल्याला लाभलेत. 

        “संत” ही उपाधी नंतर लागते, त्याआधी त्यांनी केलेली नि:स्वार्थी, अगणित सेवा आणि समाजोद्धार लक्षात घेऊन दिली जाते. हिंदू, जैन, शिख, बौद्ध तसेच इतर अनेक धर्मातसुद्धा संत वेळोवेळी जन्म घेत असतात. परदेशातसुद्धा वेगवेगळे संत असतातच. श्रीभगवदगीतेत म्हटल्याप्रमाणे “यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवती... ” जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा अशा सत्पुरुषांचा जन्म होईल आणि समाजाची उन्नती होईल. यानुसार देवाचे प्रतिनिधीत्व, तत्वज्ञान आणि अध्यात्म याची गोडी लागावी यासाठी संतांचा जन्म होतो. शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, संत तुकडोजी महाराज, गजानन महाराज संत गाडगे महाराज आणि साईबाबा अशा लोकांनी या भुमीला पावन केले.   

        स्वच्छता, मानसिक वा शारीरिक आरोग्य, बलोपासना, बालोपासना आणि भक्ती वाढीस लागणे मग ती देवावर, धर्मावर किंवा देशावर असू दे पण असावी अध्यात्मिक प्रगती आणि सामाजिक उन्नतीसाठी जे जे लागणार आहे त्याचे ज्ञान आणि विज्ञान अप्रत्यक्षरित्या सोप्या भाषेत, कृतीने आणि उक्तीने समजावून तसे मार्गदर्शन करणे. अज्ञान, गरिबी आणि रोगराई दूर करणे त्यासाठी भजन, किर्तन, ओव्या रचणे, गाथा लिहिणे, आरत्या, श्लोक, वचने, अभंग, भारुड लिहिणे अशा अनेक उपाय योजून समाज साक्षर करणे. प्रसंगी कठोर वागणूक, चमत्कार दर्शविणे, अशा अनेक समाज सुधारणा करणे हे एकमेव ध्येय बाळगणारे, संत हे प्रसंगी समाज रोषही ओढवून घेतात पण आपले ध्येय गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. 

            कधी कधी प्रश्न पडतो, मागील दोन दशकात असे संत का दिसत नाहीत? किंवा जे म्हणवून (स्वयघोषित) घेतात ते नंतर ढोंगी निघतात.  कदाचित त्यासाठी लागणारी जमिन कसदार नसावी. आणि भक्तांनी केलेल्या अतिप्रेमाने या तथाकथित संताची बुध्दी चळून स्वता:ला स्वार्थ आणि व्यवहार पहातात. तरुणाईने बोकाळलेली पिढी भलेही मंदिरापुढे रांगा लावत असेल परंतु त्यातही मनापासूनची भक्ती किती असेल ते त्यांना स्वत:लाही कळत नसेल. कोणतेही पिक येण्यासाठी अनुकुल वातावरण आणि सुपिक जमिनीची आवश्यकता असते ती कदाचीत नसावी. नि:स्वार्थ हा दुर्मिळ गुणसुद्धा साशंकतेने पाहणारी पिढी कसा एखाद्यावर विश्वास ठेवणार? त्यासाठी लागणारी तळमळ, समाजाचे ऋण आणि नि:स्वार्थ भक्ती हे गुण जोपासावे लागतात, वृद्धिंगत करावे लागतात. हल्ली बालक, पालक आणि शिक्षक यांना या गोष्टींसाठी वेळ कुठे आहे?  

            अध्यात्म, तत्त्वज्ञान स्विकारुन आणि ते अंमलात आणणारा असा एकमेव आपला देश असून सगळ्या जगाच्या नजरा आपल्यावर असतात. (चांगल्या वा वाईट हेतूने) अनेक कारणे, समस्या, जाती, प्रजाती असूनही काही मुद्द्यांवर मात्र एकात्मता साधणारे आधुनिक “भारतीय” अनेकांसाठी आदर्श आहेत. संकटातुनही सहीसलामत बाहेर पडणारे, नकळत संतपरंपरा (स्वत:च्याही) नकळत जोपासत असतात हे आपण बघत असतो, म्हणूनच कदाचीत वेगळ्या संतांना निर्माण होण्याची गरज उरत नसावी, हेही नसे थोडके! तुम्हाला काय वाटते?


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव