शिव भक्ती आणि शिवशक्ती
कारुण्यसिंधू भव दु:खहारी
तुजविण शंभू मज कोण तारी...
शिवरात्री आणि शिवजयंती लागोपाठ येऊन गेली. बहुधा आधी शिवजयंती आणि मग शिवरात्री असे ब-याचवेळा होते. यावेळी नेमके उलटे झाले, यानिमित्त दोघांची थोडी तुलना करणे काहीसे सोपे झाले. खरे तर तुलना होणे कठीण आहे पण एक छोटासा प्रयत्न! शिवाचे अस्तित्व जीवाशी निगडीत असतेच. जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवा-शिवाची गाठ घालण्यातच आपले आयुष्य संपून जाते.
हिंदु-धर्म तत्वानुसार ब्रम्हा, विष्णु आणि महेश या त्रिमुर्तीद्वारेच सृष्टीचे व्यवहार चालत असतात. शिवशंकर हे आमचे ग्रामदेवत “शिवनाथच्या” संबधित त्यामुळे विशेष प्रेम म्हणा किंवा लोभ/भक्ती असावी. म्हटले तर शिवसांब भोळा, म्हटले तर शिघ्रकोपी आणि भक्तावर विशेष प्रेम. उदार मनाने वर देणारा (मागचा पुढचा विचार न करता), प्रसंगी मुलालाही क्षमा न करता डोके उडविणारा, प्रिय पत्नीसाठी वाटेल ते करणारा, कटूंबवत्सल असा देव पण मुर्ती स्वरुपात न राहता लिंगरुपी वास्तव्य, कायम हिमालयात वास्तव्य, जगाच्या कल्याणार्थ विश-प्राषन करुन निळेशार अंग, जटाधारी, वेराग्य जोपासणारा, गंगेला माथ्यावर धारण करणारा चंद्रकोर असणारा असा हा शिवशंकर.
शिव आणि वैष्णव हा भेद पाळणारे नरहरी सोनारापासून आपण ऐकत आलो. अनेक वृत-वैकल्ये, सोळा सोमवार, श्रावण सोमवार, शिवामुठ, शिवलीलामृत अशा अनेक मार्गाने शिवभक्ती केली जाते. मृत्यंजय मंत्र आणि “ओम नम: शिवाय” या पंचाक्षरी मंत्राचा जगाला देणगी देवून प्रत्येक शास्त्रात, योग-साधनेत, अध्यात्म्यात अनन्य साधारण महत्व जाणविणारा हा योगी भक्तीमार्गावर वाट दाखविणारा आदर्श होय.
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत,
नितीवंत तो जाणता राजा म्हणा किंवा श्रीमान योगी !!
असा हा श्री शिवशंकराचा दुसरा अवतार म्हणजे महान राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज होय. त्रिपुंड मस्तकावर, करारी मुद्रा, गणरुपी मावळे, स्वराज्य कंकण हाती बांधलेला, रयतेची काळजी घेणारा, मोठ्या संख्येने असलेल्या अनेक पटीने चारी बाजूने असलेल्या शत्रूला सळो की पळो करणारा, जातीभेद, उच्च-निच्च भेदभाव न करता सगळ्यांना सांभाळून घेणारा, अवघ्या 12 व्या वर्षी रोहिडेश्वरी “स्वराज्य स्थापने” ची प्रतिज्ञा करणारा, महापराक्रमी राजा 400 वर्षापूर्वी होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करून गेला.
इतिहास घडवून स्वत: एक उत्तम प्रशासक, जगाला अभ्यास करायला, युद्धशास्त्र, नीतीशास्त्र, मातृभक्त, पित्याला शत्रुच्या तावडीतून सोडवून आणणारा, माता-भगिनिंचे चारित्र्य जपणारा, “हर हर महादेव” या एका आरोळीने देशभक्ती जागविणारा, गनिमी कावा जाणून घेऊन मोठ्या संख्येत असलेल्या शत्रूला नामोहरम करणारा असा एकमेवा द्वितीय राजा पुन्हा होणे नाही. आरमार, अभेद्द्य किल्ले बांधणे, शत्रूला घरात येऊ न देणे, यासाठी अनेक निष्ठावंत माणसे तयार करणे, स्वराज्याची स्थापना करणे, पराजयाचे रुपांतर जयात करणे, यासाठी अक्खी हयात खर्ची घालणारा प्रत्यक्षात असलेला अखील भारताचे एकमेव दैवत असा आदर्श सगळ्या जगासमोर आहे.
आज हीच शिवभक्ती शिवशक्ती, काहीशी कमी पडते असे वाटतेय. एकमेकांवरचा विश्वास, संघटन आणि नेत्रृत्वाचा अभाव अशी अनेक कारणे सांगता येतील. आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरसुद्धा आपण स्वराज्य आणू शकलो नाही याची खंत कुठेतरी वाटतेय. छत्रपती महाराज शिवाजींच्या नावावर सत्ता कमविणे, लोकांना भुलविणे, लिखाणातले दोष, बोलण्यातील दोष काढ़ून समाजमन पेटवणे आणि महाराजांचा आदर्श मात्र कोणताच न पाळणारे असे हे आजचे लोकशाहीचे पाइक (राजांची अष्टप्रधान योजना ) यशस्वीपणे राबवू शकतात? आजची परिस्थीती बघुन छत्रपतींना काय वाटेल? याचातरी कोणी विचार करतो का? हा प्रश्न मनाला कायम सतावीत असतो. यासाठी आजही तेवढीच शिवभक्ती आणि शिवशक्तीची गरज आहे असे वाटते. अनेक समस्या यातुन सुटतील असा मला विश्वास आहे.
अशा या अखंड हिंदुस्तानाचे “आराध्य देवते“ व स्फुर्त्तीस्थान (एक हिमालयातला तर दुसरा जमिनीवरचा ) श्रीमंत योगी महाराजांना/देवाला त्रिवार मानाचा मुजरा आणि जय शंभो महादेव !!

Kharach, Shivrai He Kharach ShivShambhunche Avatar Hote! Jai Bhavani, Jai Shivaji! Har Har Mahadev!
ReplyDeleteDhanyawad Ayush!
Delete