वेळेची चोरी (Time Theft)
“प्रत्यक्ष” वृत्तपत्रामधील एक बातमी लक्षवेधी होती. “करोनाकाळात कार्यालयीन वेळेची चोरी केल्याबद्दल एका महिलेविरुद्ध दंडात्मक कार्यवाही” अर्थात परदेशातील बातमी होती. संगणकीय नोंदीनुसार आणि कामाच्या निपटा-यावरुन सदर महिलेला दोषी ठरविण्यात आले होते. घरुन काम करीत असताना “वेळेची चोरी” (वैयक्तिक/घरगुती काम करण्यासाठी वापरल्यामुळे) / वेळेचा अपव्यय या सदरात “गुन्हा घडला” असा निष्कर्ष काढण्यात आला. भारतात हा नियम लावल्यास किती सापडतील याची गणना न केलेलीच बरी! काही दिवसांनी हे आपल्याकडेही होईल, तेव्हा वेळीच सावध झालेले बरे! काहीजण काम टाळण्यासाठी वेळ घालवीत असतात मग ते काम दुस-याला मिळाल्यावर वाईट वाटते म्हणूनच वेळेची गरज ओळखणे महत्वाचे! वेळेवर उपचार घेणे / सल्ला घेणे हेही आवश्यकच असते. वेळ पाळणे, वेळेवर खाणे-पिणे, झोपणे आणि माघार घेणे हे गुण काळाच्या पुढे जाण्यास उपयोगी ठरतात.
यातील गंभीर भाग सोडला तरी आपण महिला अशी
“वेळ चोरण्यात” माहीर असतात. वेळेचे सुव्यवस्थापन करण्यासाठी हे गरजेचेच असते (चांगल्या
अर्थाने) त्याशिवाय का ती अष्टभूजा/ “superwoman” होऊ शकेल? स्वयंपाक करता करता एकाच वेळी अनेक गोष्टींची पुर्तता
ती करीत असते. वास्तविक वेळेची मर्यादा (24 तास) सगळ्यांनाच सारखी असते अगदी पुरुषांनासुद्धा पण ते तेवढे गंभीरपणे
घेत नाहीत. ICWA शिकत असताना आमचे सर नेहमी
म्हणायचे “अभ्यासाला वेळ मिळत नाही” हे कारण असूच शकत नाही. “वेळेची चोरी करा” हा शब्द
तेव्हा पहिल्यांदा मला कळला होता. इतर कामातून
“वेळ” काढून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. दुर्देवाने आम्ही ऐकले नाही आणि देश एका
ICWAला मुकला. पंतप्रधानापासून साध्या कर्मचा-यालासुद्धा तेवढेच कामाचे तास मिळतात,
त्याच तासांचे “चीज करणे” हे आपल्या हातात असते. आळस आणि निष्क्रियता
हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत त्यांच्यावर मात
करणे हे कठीण असते.
आताची
पिढी कधी खूप घाई करते तर कधी काय घाई आहे “चील”कर म्हणून शांत राहते. भरपुर वेळ आहे
म्हणुन काहीजण शांत राहतात तर काहीजण “वाघ” मागे लागला आहे असे वाटून कायम घाईतच असतात.
खरे तर “वेळेवर” संपुर्ण हक्क आपलाच असतो पण तो आपण तो गमवितो आणि नशीबाला दोष देत
बसतो. कर्तबगार माणसे मात्र वेळेची गरज ओळखून पावले उचलतात आणि यशस्वी होतात. “वेळेवर”
मदत करणे हेही एक सत्कार्य असते हे समजून आवश्यक असेल तेव्हा मदत नक्कीच केली पाहिजे.
स्वत:साठी “वेळ” काढणे हेही तेवढेच महत्वाचे.
ब-याच वेळा होते काय की, आपण दुस-यांसाठी “वेळ” काढतो पण स्वत:साठी अजिबात वेळ नसतो
विशेषत: स्त्रियाना.“वावास चुकला तो गावाक चुकला” अशी एक कोकणी म्हण आहे त्याचाही अर्थ
(वेळेवर योग्य निर्णय घेणे) हाच आहे.
आई नेहमी म्हणायची वेळ काय उन्हात उभे राहूनसुद्धा
“घालविता” येतो (काहीही काम न करता) पण मनुष्य जन्म ( 84 लक्ष योनी फिरुन ) एवढा मिळालाय
तर त्याचे सार्थक व्हावयास हवेना. ती सतत काम करत असायची, कधीच विश्रांती घ्यायची नाही
अगदी प्रवासातसुद्धा तिचे काहीना काही काम चालू असायचे. किडा-मुंगीसारखे आयुष्य जगायचे
की काहीतरी भव्य-दिव्य करुन दाखवायचे हे कर्मस्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे त्याचा
उपयोग व्हावयास हवा. भलेही अपयशी होऊ पण प्रयत्न तर करावयास हवा. मिळालेल्या 24 तासाचे
25-30 तास कसे होतील, याची दुरदृष्टी वाढवावयास हवी जेणेकरुन वेळेचा सदुपयोग होऊन स्वत:ला
व इतरांनाही आदर्श निर्माण व्हावयास हवा. विशेषत: म्हातारपणात मला “कोणी विचारत नाही”
हे सगळ्यांचे दु:ख असते, तेही या वेळेच्या सदुपयोगातुन दुर होऊ शकते.
चला तर मग, नवीन वर्षात आपण हाच संकल्प करुया
कि, “मी जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करेन/ वेळ सत्कारणी लावेन! ”
!! गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा
!!

Comments
Post a Comment