वसंतोत्सव
“आनंदी आनंद आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे”... हे गाणे या वसंत ऋतुची महती सांग़तो. नुकत्याच एका वसंतोत्सवास जाणे झाले. दरवर्षी गिरगांव येथील महिला मंडळात नित्यनेमाने “वसंतोत्सव” साजरा केला जातो. 100-125 वर्षांपुर्वी महिलांना एकत्र आणून या मंडळाची स्थापना अवंतिका गोखलेबाईंनी केली होती. समाजोपयोगी वस्तू बनविणे, महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि मुलांचा सर्वांगिण विकास या हेतुने एकत्र आलेल्या बायकांची आज तिसरी पिढी कार्यरत असुन तेवढीच आपल्या हेतुशी प्रामाणिक व विचारांचा वारसा पुढे नेत आहे हे बघुन खूप आनंद होतो. महिलांबाबतचे सामाजिक भान, आदर आणि दुरदृष्टी याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एक प्रकारे कै. गोखलेबाईंनीही त्या महिलांच्या जीवनात “वसंत” अप्रत्यक्षरित्या फुलवलाच होता.
मार्च-एप्रिलच्या
महिन्यात येणारा “वसंतोत्सव” मी काही वर्षापुर्वी प्रत्यक्ष बघितला होता. आज जवळपास
10-15 वर्षानी पुन्हा योग जुळून आला. रांगोळी, सरस्वतीची पूजा, गीत-गायन, हळदी-कुंकू,
सोनचाफ्याची फुले, शेवटी पन्हे आणि आंबे-डाळ याने कार्यक्रमाची सांग़ता, असा एकुण आखीव-रेखीव,
(दुपारी तीन ते पाच या वेळात) नीटनेटका कार्यक्रम असतो. सगळे काही हसत-खेळत पार पाडते
आणि एका नव्या उत्साहाने दोन्ही-तिन्ही पिढ्यांच्या बायका-मुली (अपवादात्मक) एकमेकांचा
निरोप घेतो. या आणि अशा अनेक कार्यक्रमातून एक सकारात्मक ऊर्जा नव्याने प्राप्त होत
असते कार्यक्रमास जाण्याची संधी मी सहसा सोडत नाही.
वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे.
वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी
फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून
सुरू आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण
केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली
गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी
वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करून वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत
ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या
स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा
द्योतक आहे. “वसंत” ऋतू हा एक निसर्गाचा सुंदर चमत्कार/अविष्कार म्हणावा लागेल.
नुकतेच नवीन वर्षाची (गुढी-पाडवा) सुरुवात झालेली असते. आर्थिक-वर्षाचीपण सांगता झालेली
असते आणि निसर्गाला मात्र नाविन्याची ओढ लागलेली असते. साधारणपणे मार्च-एप्रिलच्या
दरम्यान येणारा हा ऋतू म्हणुनच सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो. कोकिळेला आंब्याच्या
मोहराची साद घालीत असते. माणसाला कै-या, पन्हे, आंबे-डाळीचे वेध लागलेले असतात. नवरात्रीची
9 दिवसातली लगबग संपलेली असते मात्र मुलांना वार्षिक परिक्षेचे वेध लागलेले असतात.
त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र हा उत्सव भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारे साजरा
केला जातो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल. बंगालमध्ये यानिमित्त होळी खेळली जाते.
काही ठिकाणी गाणी, नृत्य, नाटक यांचा उत्सव साजरा केला जातो.
“जगी सर्व
सुखी असा कोण आहे, विचारी मना तुच शोधुनी पाहे “ या रामदास स्वामीच्या ऊक्तीनुसार कोणीच
सुखी नसते पण त्यातल्या त्यात आनंद शोधावा लागतो. मरगळ्लेल्या मनाला हुरुप येण्यासाठी,
थकलेल्या मनाला ऊभारी आणण्यासाठी काहीतरी निमित्त हे लागतेच. ते अशा उत्सवातून माणुस
मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येकासाठी रोजचे आयुष्य हे एक नानाविध आव्हानच
असते. त्यातुन त्याला काहितरी नवीन शोधायचे असते. कोणतातरी बदल करायला तो उत्सुक असतो,
निसर्ग-नियमच आहे हा! हा बदल नुसता बाह्य-रंगात
नसतो तर अंतरंगातही त्याला करायचा असतो. असा “वसंत” कोण, कुणाच्या रुपात आणु शकेल हे
सांगता येऊ शकत नाही.
सृजनशक्ती कोणतीही असो, मग ते एक नवीन अपत्य जन्माला घालणे, कलाविश्वातली कलाकृती
निर्माण करणे किंवा एखाद्या उद्योगपतीच्या उत्पादनाची निर्मिती असो, सारखाच आनंद निर्मात्याला
देत असते. जग्गनियंत्याला तर हे रोजचेच काम असते मग त्याचा आनंद किती महान असेल. असा
हा प्रातिनिधीक स्वरुपाचा आनंद सगळ्यांनीच अनुभवावा. प्रत्येकाची व्याख्या वेगळी असु
शकते पण हेतु एकच असावा. मग विचार कसला करताय, तुम्हीपण कोणाच्या तरी जीवनात “वसंत”
फुलवू शकाल /आणू शकाल, बघा पटतंय का!

खूपच सुंदर वर्णन केले आहे.
ReplyDeleteDhanyawad,nav lihile aste tar!
Deleteअतिशय सुरेख वर्णन केले आहे. असं वाटतं की आपण त्या क्षणाची अनुभूती घेत आहोत..
ReplyDeleteDhanyawad 🙏🏻👍 nav lihile aste tar!👏
Delete