आई कधी सुखी होते का?

              “ठाण्यात महिलेची हत्या” शरीर र्सौष्ठव “श्री” प्राप्त झालेल्या व्यायामपटूने  “घरगुती वादातून आई-वडिलांवर केलेल्या सुरी हल्ल्यात आई ठार, वडील जखमी” अशी बातमी नेमकी माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असावी आणि तेही नेमक्या मातृदिनाच्या पुर्वसंध्येला! हा कोणता योगायोग म्हणावा? माझी मैत्रिण म्हणून नाहीतर आई, बाई आणि माणूस म्हणून एवढाही (वय-66) तिला जगण्याचा अधिकार असू नये? प्रत्यक्ष मुलगाच काळ ठरावा हे कोणाला योग्य वाटेल? अनेक प्रश्न त्यानिमित्त मनात उभे राहिले.

               30 वर्षात असे कोणते बदल समाजात झाले की ज्यामुळे हल्ली अशा बातम्या वारंवार येत असतात. संस्कार, जाणीव, पैसा, नातीगोतीपेक्षा राग मोठा असतो का?  संयम राखणे एवढे कमीपणाचे का वाटते? उत्तेजित होउन तरी प्रश्न सुटतात की नवीन गहन प्रश्न  तयार होतात?  बलोपासना ही शरीर व मन कमविण्यासाठी असते की सुड घेण्यासाठी असते? शरीर कमविताना अनुचित मार्गाने (उत्तेजके/sterioids) जाऊन पुढे जाणे / स्पर्धेत जिंकण्यासाठी काहीही करणे योग्य वाटते का? क्रिडा क्षेत्रातसुध्दा अशा गोष्टी कधी कधी आढळतात त्याच्यावर काहीच नियंत्रण नसते का?

                असा एखादाच मुलगा असतो म्हणून सगळेच तसे असतात का? असे म्हणाल पण एकतरी मुलगा का निर्माण व्हावा?  आईला काय वाटेल?  हा प्रश्न जेव्हा मनात उभा राहील तेव्हा असे गुन्हे घडणारच नाहीत. बातमी वाचल्यावर माझ्या अंगावर काटा आला तर प्रत्यक्ष मुलगा अशा अवतारात बघून आई-वडिलांना काय वाटले असेल? हे करुन प्रश्न सुटला  की अजून नवीन प्रश्न तयार झालेत?  उद्या कुटुंबाला, नातेवाईकांना त्या स्वत:ला तरी तो माफ करु शकेल का? कायदा काय द्यायची ती शिक्षा देईल पण आई परत येईल का? एवढे होईपर्यंत आजुबाजुला कोणीच नव्हते, समजावुन सांगणारे पण कोणीच नव्हते का? एवढ्या टोकाचा निर्णय घेईपर्यंत कोणीच लक्ष दिले नाही का? मनात अनेक गुंते तयार होत असतात ते वेळीच सोडविले नाही तर असे काही तरी  नियंत्रणाबाहेर जाऊन विपरीत घडते हेही खरे!

               याउलट दुस-या एका जीम ट्रेनरची कथा इथे सांगाविशी वाटते. बरीच वर्षे झाली त्याला पण तोही ह्याच वयात असेल (30-32) कदाचीत. त्याचेपण लग्न उशीराच झाले होते.  मुलगी एक वर्षाची होती आणि  बायकोला कर्करोगाचे निदान झाले. त्याने तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर आम्हाला फोन केला तेव्हा आम्हालाही क्षणभर काय करावे ते कळेना. त्याही परिस्थीतीत मुलीला सांभाळून , नातेवाईकांनी, शेजा-यांनी धीर देऊन, पैसे जमा करून, मोठंमोठ्या ओळखी काढून तिचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि आज एक सुखी कुटुंब म्हणून राहात आहेत. तेव्हा त्यानेपण असाच अविचार केला असता तर!  हात-पाय गाळून बसला असता तर!

              सुख-दु:ख हे आपली ताकद वाढविण्यासाठीच असतात. त्यांना तोंड देणे महत्वाचे की त्यातून पळवाट शोधायची? असे गुन्हे घडतात तेव्हा इतरांनाही काहीतरी शिकवून जातात. हल्ली कोणी कोणाच्या भानगडीत पडत नाहीत त्यास जवळची माणसे अपवाद नाहीत  हे जरी खरे असले तरी आई-वडिल म्हणुन काही कर्तव्य पार पाडावीच लागतात. अशा वेळी जुनी वानप्रस्थाश्रम रचना योग्य वाटावी असे कधी कधी वाटते. दुस-या मुलांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून काहीजण एकत्र राहिलो तर सोपे असे वाटणे साहजीकच आहे. तेव्हा आहे ती परिस्थीती स्विकारणे याच्याशिवाय काही पर्याय असतो का? आता सगळे पर्याय उपल्ब्ध असतात फक्त योग्य वेळी त्याचा उपयोग करुन घेणे हे आपल्या हातात असते. आयुष्यभर काबाडकष्ट करून जमविलेली संपत्ती देखील मृत्यूस कारणीभूत होऊ शकते तर संपत्ती जमा करणे देखील चुकीचे आहे असे वाटते.

              समाजरचना, माध्यमे, पालकांच्या अपेक्षा याच्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते. आज आई शिकलेली, नोकरी करणारी असूनही, या काही समस्या काही प्रमाणात सुटल्या तर काही दुस-या वाढल्यात. उच्चशिक्षण, पैसा, नैतिक मुल्ये, संस्कार, भिती, संयम याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही का? वेळीच योग्य उपाय आपल्याला जमत नसेल तर समुपदेशक, डॉक्टर, नातेवाईक, पोलीस यांची मदत वेळीच घेतल्यास काही प्रमाणात असे गुन्हे कमी घडतील किंवा घडणारच नाहीत.मुलींचे वाढलेले महत्व हेही एक कारण असावे का?  सगळे आपल्याला नंतर सुचते, आधी का नाही? हा एक मोठा प्रश्न!

               आपल्या मुलाने/मुलीने प्रगती करावी, नाव कमवावे हे वाटणे साहजिकच आहे पण त्याचा अतिरेक होणे कधीही समर्थनीय नाही. विशेषत: मुले/मुली जाणती झाल्यावर तर नाहीच. आर्थिक सुबत्ता शेवटी माणसाला अधू बनवते का? सारासार बुद्धी नष्ट करते का? आईने केलेल्या कष्टाची जाणीव जर मुलांनाच नसेल तर इतर कोणाला असणार? तशी ती करुन देणे हेही तेवढेच महत्वाचे असते. अख्खी एक पिढी घडविण्याचे काम आई करीत असते. आता ती कुठेतरी कमी पडत असेल तर दुस-यांनी ती बाजू सांभाळून घेतली पाहिजे. केवळ दोष देणे एवढेच काम इमाने-इतबारे करणारेपण कमी नसतात. आपआपल्या योग्यतेने सगळ्यांना सगळेच मिळत असते. त्यात कुठे कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आई निर्माता असते. काही ना क्लुप्त्या करुन मातीतुन सुघट निर्माण करते त्यासाठी स्वत: काष्ठ बनते.मात्र नियतीच्या एका ठोक्याने कोणत्या माठाच्या कधी ठिक-या होतील सांगता येणार नाही. त्या ठिक-या  होउ न देण्याची जबाबदारी आपली आहे.

                कधी नाईलाज म्हणून काही वाईट निर्णय घेतले जात असतील पण त्याचा दोष  पुर्णपणे आईलाच देऊन आपण मात्र किती महान असे दर्शविणारेही असतात. याचा अर्थ आईने कायम डोक्यावर टांगती तलवार ठेऊनच वागायचे का? मुले कधी काय कसे वागतील याचे कायम ताण घेऊन वागायचे? लहानपणी केलेले संस्कार पुढे जाउन विसरले तर दोष कुणाचा? फाशीला नेणा-या मुलाने आईला चावले ही गोष्ट आपण लहानपणी ऐकतो आणि नंतर सोडून देतो. कुठेतरी हे शल्य आईला सुखी होण्यापासून वंचीत ठेवते असे वाटते. या सर्वाला कंटाळून आताची पिढी “आई” व्हायलाच नकार देते हे लक्षण समाज रचनेच्या दृष्टीने योग्य आहे का? आजुबाय़ूचे वातावरणही तेवढेच जबाबदार आहे असे मला वाटते.मुलांचे छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करणारी आई स्वत: कायम वंचितच असते. यानिमित्त असे मनात आले की, खरंच आई सुखी कायम  होऊ शकेल का? ही जबाबदारी तिची व इतरांचीसुद्धा आहे. तेव्हाच ख-या अर्थाने “ मातृदिन” साजरा होऊ शकेल असे वाटत नाही का?

                            MOTHERS ARE OUR FIRST TEACHERS. LESSON OR ADVICE YOUR MOM HAS GIVEN THAT HAS STAYED WITH YOU OVER THE YEARS...               CHICKEN SOUP FOR THE SOUL.






 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव