एक होती आजी

            नुकतीच श्री ना. ना पेंडसे यांचे “एक होती आजी” ही कादंबरी वाचनात आली.  19 व्या शतकातील टिपीकल  आजीचे यात रेखाटन करण्यात आलेले आहे. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ( गरिबीमुळे) विधुर असलेल्या 35 वर्षे इसमाशी लग्न करून आलेली आजी सगळया घराला म्हणजे घरातील सर्वांना आपलेसे करुन घेते.  मोठी मंडळी, लहान मुले, दीर, जावा यांच्याशी सलोख्याचे संबंध तर जोडतेच शिवाय वेळप्रसंगी त्यांच्या पाठिशी उभी राहते.  त्यांच्या आयुष्यातील कितीतरी बिकट प्रसंगात तिचा करारीपणा, धाडसीपणा आणि काळाच्या पुढे बघण्याची वृत्ती दिसून येते. एकूणच पुस्तक वाचनीय आहे शिवाय त्या काळातल्या प्रसंगानुरुप स्त्रीशक्तीचे दर्शन घडते. आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध वाचकाने घ्यावा. त्या आजीचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. हळुहळू आजीची भुमिका कमी होत जाणा-या आताच्या काळात म्हणूनच अनुकरणीय ठरते.

              माझी आजी (आईची आई) कशी होती याबाबत मी एका माझ्या लेखात पुर्वी उल्लेख केलेला आहे. तीसुद्धा अशीच आम्हा सर्वांसाठी आदर्श होती. पुष्कळदा आपण आपल्या पुर्वजांना कालौघात  त्याचे हळुहळू विस्मरण होत जाते. खरं तर तिथूनच आपली सुरुवात झालेली असते. कमी-अधिक प्रमाणात त्यांचे गुण-अवगुण आपल्यात (अप्रत्यक्षरित्या) उतरलेले असतात. याबाबतीत मात्र आपण अनभिज्ञ असतो. शाळेत आम्हाला “दुधावरची साय” हा धडा होता. त्यातली आजी नातीला कशी जपते याचे सुरेख वर्णन होते. असेही प्रत्येक तिसरी पिढीचे आणि पहिल्या पिढीत बरेच साम्य आढळते. तसेच या दोन्ही पिढींचे आपापसातही छान जमते. सध्या ही नाती दुरावत चाललेली आहेत पण खरी गरज आताच्या नातवंडानाच आहे असे मला वाटते.

         हल्लीच्या आजी तर सुशिक्षीत आणि नोकरदार असतात. त्यामुळे त्यांनाही मुलांच्या भाव-विश्वाचे ज्ञान असते. प्रसंगी त्या परिस्थीतीचे गांभिर्य समजून घेत योग्य निर्णय घेऊन आपल्या सुनेच्या/ मुलीच्या पाठीशी उभे राहू शकतात. त्यांचा अनुभव, बुध्दीचा आणि वयाचा योग्य फायदा घेतल्यास दोन पिढीचे अंतर कमी होण्यास मदत होईल. आधुनिक शैलीचे अनेक फायदे तसेच तोटे (दिर्घकालिन) असतात. अशावेळी जुने म्हणून टाकाऊ न समजता त्याचा योग्य तो फायदा करुन घेणे हे शहाणपणाच दर्शवितो.

            "म्हणजे काय ग आजी?"  असे नुकतेच अनुजा बर्वे लिखित “आजीचे नातवाबरोबरचे” संभाषणयुक्त पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यातही या दोघांचे संबंध कसे वाढीस लागलेत याचे यथार्थ वर्णन करण्यांत आलेले आहे. यावरुन असे दिसून येते की, साधी मराठी शिकवण्यापासून कसे वागावे, जगावे आणि भोवतालच्या जगाची ओळख करुन देण्यांत आजी-आजोबांचा किती मोठा वाटा असतो. बरीच उदाहरणे अशी दिसून येतात की, आजी-आजोबा हे नातवंडांचे जीव की प्राण असतात. अगदी परिस्थीती नसली तरी जीवावर उदार होउन नातवंडांना सांभाळणारे आजी-आजोबा असतात. आपल्या मुलांचे भवितव्य एकवेळ आपण घडवू शकलो नाही, निदान तो वेळ आपण आपल्या तिस-या पिढीला तरी देऊया असाही विचार काही आजी-आजोबा करतात.  आमच्याकडे यांच्या वडीलांनी त्यांच्या 2 नातवंडाना म्हणजे माझ्या मुलींना अत्यंत प्रेमाने सांभाळले. त्यांचे मोणे ऋण आमच्यावर आहेत.

           वृद्धाश्रम अथवा एकेकटे राहणे हे जरी शिष्टसंमत असले तरी निदान मुले लहान असेपर्यंत आजी-आजोबा घरात एकत्र असावेत असे माझे प्रामाणिक मत आहे. मी स्वत: हा अनुभव माझ्या मुलींना घेऊ दिलेला आहे, आणि त्याचे परिणामही आता दिसून येतात. दोघे (आई-बाबा) जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेत असतात तेव्हा या तिस-या पिढीचे संगोपन हा एक मोठा गहन प्रश्न असतो.  त्यासाठी दोन्ही पिढीने थोडे थोडे संयम, तडजोड आणि सहानुभूतीपुर्वक विचार करणे गरजेचे आहे. मग करणार ना प्रयत्न? नाहीतर काही वर्षानी पाळणाघरे आणि वृद्धाश्रम यांची संख्या वाढत जाईल, जी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिने अहितकारक ठरु शकेल.सोबतचे चित्र चंपकमधील आहे जे खूप काही सांगून जाते.


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव