वाळवी- मनाची की निसर्गाची?
निसर्गातील प्रत्येक घटक,छोटा-मोठा असू दे तो कसा निसर्ग-साखळीत आवश्यक असतो हे आपण लहानपणी ‘गांडुळ-हा शेतक-याचा मित्र” शिकतच मोठे झालो असु. उंदीर, खेकडा आणि गोमसुद्धा (काटेरी/घोणस) इतरांना मदतच करीत असते आणि निसर्गातील एका साखळीचा एक भाग असते. वाळवीही त्यातलीच एक, लाकूड पोखरणारी (विशेषत: लाकडी कपाटे,दारे किंवा फर्निचर ) म्हणून बदनाम असणारी, यात कसले कौतुक? असे तुम्ही म्हणाल! घरातील फर्निचर, लाकडी सामान याकडे झालेले थोडेसे दुर्लक्ष किती नुकसान करु शकते याचे उदाहरण म्हणजे वाळवी होय. म्हणजेच कायम स्वच्छ, तेल-पाणी आणि डागडूजी केल्याशिवाय लाकडी सामान काय किंवा कोणतीही वस्तू टिकत नाही. मध्यंतरी अमेरिकेत अक्खा बेड “खराब” (वाळवीने पोखरुन) झाला म्हणून फेकून दिलेला ऐकला होता. हे सगळे आठवण्याचे कारण नुकताच बघण्यांत आलेला मराठी चित्रपट “ वाळवी.”
चित्तथरारक, उत्कंठावर्धक, मध्येच
विनोदी अंगाने नेणारा आणि नात्यांमध्ये लागलेल्या वाळवीबाबतचे भाष्य करणारा चित्रपट
म्हणून नक्कीच उल्लेखनीय आहे. त्यामध्ये एक वाक्य आहे, “अजून वाळवीने प्लॅस्टिक
खाल्लेले नाही, भविष्यात नक्कीच खाईल.” जगण्यासाठी कोणीही, काहीही
करू शकतो अगदी माणूससुद्धा. तसेही गायी, म्हशी, बकरीसुद्धा हल्ली प्लॅस्टिक खाऊन स्वत:चे
व माणसांचे आयुष्य धोक्यात आणत आहेतच. भविष्यात प्लॅस्टिकचा भस्मासूर काय काय करावे
लागेल हे कोणीही सांगू शकणार नाही. प्लास्टीक चे विघटन कसे करावे. प्लास्टीकच्या वापराचे
दिर्घकालीन वापराचे दुष्पपरिणाम पहाता प्लास्टीकचे विविध उपयोग ही प्रगती म्हणायची
कि अधोगती? एकीकडे आपण विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय
मात्र वैयक्तिक आयुष्यात खरेच सम्रुद्ध झालोत का? उच्चशिक्षणामुळे समस्या कमी झाल्या
की वाढल्या? लहानपणी “पुढे पाठ, मागे सपाट” असे म्हणून कधी
कधी चिडविले जायचे, त्याचे प्रत्यंतर आता आपण कधी कधी अनुभवतो. सिनेमा म्हणून ठिक आहे
पण प्रत्यक्ष जीवनातही असे घडले तर! किंवा घडू नये म्हणून आपण प्रयत्न करतो का? धकाधकीच्या
जीवनात एकमेकांसाठी वेळ दिला जातो का? नाते टिकावे म्हणून आपण खरेच प्रयत्न करतो की,
तसेच सोडून देतो? असे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच
जाणार आहेत.
समस्या उद्भवल्यावर बघू असे काहीजण म्हणतील.
त्यासाठी आतापासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. आता दोघेच असतात, दोघेही
आपाआपल्या करिअर, पैसा आणि धावपळ यातच मग्न असतात. त्यात त्यांना मुलांचाही अडसर हल्ली
वाटायला लागतो. ठराविक काळ गेल्यावर मात्र नात्यात कंटाळा येण्याची शक्यता नाकारता
येत नाही. विशेषत: बायकांना मुल नसले की, वेळ कुठे आणि कसा घालवायचा याचा प्रश्न पडू
शकतो. आयुष्यात ते एवढे पुढे आलेले असतात की, माघारपण घेता येत नाही, तेव्हा पुढे काय?
हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो. यासाठीच पुर्वी योग्यवेळी योग्य व्हावे याबाबत पालक आगृही
असत. आता शिकुन होईपर्यंतच त्यांचे वय पुढे निघून गेलेले असते. त्यानंतर नोकरी, व्यवसाय,
स्थिरस्थावर होईपर्यंत वयाची 30-35 शी उलटते. मते ठाम बनत जातात, कोणतीही तडजोड करायला
दोघेही तयार नसतात. त्यामुळे एक प्रकारचे समांतर आयुष्य आपापले जगत असतात. त्यात अशी
काही प्रलोभने दिसणे अगदीच अशक्य नसते. अशा वेळी आपापले संस्कार आणि नीतीनियमांना बांधील
असणे आणि ते दोघांनीही पाळणे गरजेचे ठरते. नाते जोडण्यापेक्षा ते टिकविणे जास्त कठिण
असते. अन्यथा वाळवी लागायला वेळ लागणार नाही हेच नेमके चित्रपटात दाखविण्यांत आलेले
आहे. चित्रपटात नियती सर्व हिशेब करते असे दाखविले आहे. समस्येवर नेमका ऊपाय मात्र
सांगण्यात आलेला नाही तो आपणच शोधायचे असतात. नात्यांना वेळ देऊन ती आपणच मुद्दाम जोपासावी
लागतात. संयमाने हाताळावी लागतात. कोणताही दुरावा, मतभेद हे तात्पुरते समजुन त्याला
अतिमहत्व देण्याचे टाळावे. कोणी दुसरा हस्तक्षेप करित असेल तर वेळीच त्याला आळा घालणे
आवश्यक असते. अर्थात हे दोन्ही बाजुने होणे आवश्यक आहे. एवढे करुनही जर जबरदस्तीने
टिकणे किंवा टिकविणे वाटत असल्यास वेळीच लांब जाणे सगळ्यांच्याच हिताचे असते / असावे.
आमच्या पिढीला हया समस्या उद्भवल्याच नाहीत किंवा कमी उद्भवल्या असतील कारण कौटुंबिक स्थैर्य, नीती-अनितीची चाड, स्पर्धेचा अभाव आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनांमूळे काही प्रमाणात संयम राखला जात असे. अशावेळी माझ्या टॅक्सीवाल्याचे उदगार विचार करायला लावतात. “फुटपाथवरुन चालायची सवय आपणच मोडलीय म्हणुन ती अनधिकृतपणे बळकावली जातात. “तुम्ही चालणे सुरु करा, बघा आपोआप फुटपाथ मोकळे होतील”. नात्यांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल का ? तुम्हाला काय वाटते?

बरोबर आहे पण सुरवातच होत नाही त्याचे काय?
ReplyDeleteDhanyawad 🙏
Delete