तरलाने ( दलाल) स्वयंपाकाला तारले ( 3 जून,1936 ते 6 नोव्हेंबर, 2013)
16-18 तास विमान प्रवासात/ वारीत वेळ जाण्यासाठी एक उल्लेखनीय बाब अशी म्हणावी लागेल म्हणजे जागे समोरील छोट्या टिव्हीवर “एका ठिकाणी बसून सलग सिनेमे बघणे”. एरवी घरात असतांना हे शक्य होत नाही कारण काहीतरी कामे आणि एकाच ठिकाणी बसणे. त्यातलाच एक सिनेमा “तरला” हा होता. अभिनेत्री हुमा कुरेशीचा अभिनय आणि विषय माझा आवडीचा “स्वयंपाक” दुसरे अनेक पर्यायही उपलब्ध होते पण विषय आगळा वेगळा त्यामुळे बघावासा वाटला. एकुणच “तरला दलाल” ही एक व्यक्ती व तिचे संपूर्ण वलयांकीत आयुष्य बघायला मिळाले. एक चांगला चित्रपट बघण्याचे समाधानही मिळाले. काहीतरी वेगळे करायचे या ध्येयापाई सौ. तरला दलालचा “संघर्ष आणि त्याला मिळणारी पतीची साथ” असा एकूण चित्रपटाचा विषय आहे. काही प्रसंग भावनात्मकदृष्ट्या आणि मानसिकता दर्शविणारी वाटतात. त्या मुलींना “स्वयंपाक” शिकविण्याचे (फुकट) वर्ग घेतल्यामुळे गर्दी होते म्हणून वाचॅमन गेट लावून घेतो (मुली येत नाहीत). दुसरा प्रसंग पुस्तके न विकल्यामूळे रद्दीत द्यावी लागतात. हॉटेलवाले त्या रद्दीतून पुस्तके उचलून हॉटेलमध्ये तीच रेसिपी दुस-यांच्या नावाने खपविली जाते आणि तरला दलाल नेमकी तीच पाककृती खायला त्या हॉटेलमध्ये गेलेल्या असतात.
मराठीत ओगलेबाईंचे-रुचिरा, “अन्नपुर्णा” मंगला बर्वे आणि लक्ष्मीबाई धुरंधर यांचे “माझे स्वयंपाकघर” अशा पुस्तकांची चलती होती. त्यानंतर साधारण सन 1980 च्या आसपास या तरला दलाल बाईंनी “भारतीय खाद्य पदार्थावर” हिंदी आणि इंग्रजीत लिहून एक यशस्वी कारकीर्द सुरू केली होती. त्या भारतीय खाद्यावर आधारित लिखाण, वृत्तपत्रकार, लेखक आणि कूकरी शोजच्या (Tarala Dalal Show and Cook It Up With Tarla Dalal) न्यायाधीश होत्या. 15000 पेक्षा जास्त शाकाहारी पाकक्रिया लिहिणा-या कदाचीत त्या पहिल्याच गृहिणी असतील. तरला दलांलांच्या पाककृती एकूण 25 मासिकात प्रसिध्द झाल्या. त्यांनी आरोग्यदायक पाककृतीबद्दल लिहिले. शाकाहारी भारतीय पाककृती, विशेषत: गुजराती पाककृतींमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. तरला दलाल यांना विदेशी पाककृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. परदेशी भूमीतून अनेक मांसाहारी पाककृतींच्या शाकाहारी आवृत्त्या त्यांनी तयार केल्या. त्यांनी भारतातील पाककला उद्योगात क्रांती घडवून आणली आणि त्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी कुकबुक लेखिका होत्या. या कामासाठी त्यांना सन 2007 मध्ये केंद्र शासनाचा प्रतिष्ठेचा “पदमश्री” पारितोषिक मिळाले. भारतीय स्त्रीला “पाकशास्त्रात” मिळालेले ते पहिले पारितोषिक होते.
तसे बघायला गेले तर तरला दलांलांची कारकिर्द उशीरा सूरू झाली. पुर्वी अनेक स्त्रियांना नाईलाजाने का होईना परिस्थीतीवर मात करण्यासाठी अनेक वेळा पोलपाट-लाटणे हातात घ्यावे लागायचेच. तेव्हा त्याला काहीजण कमीपणा मानत असत. आता पुरुषसुद्धा या वलयांकित क्षेत्रात हळूहळू शिरायला लागले आणि यशस्वी झाले. संजीव कपुर, विष्णु मनोहर, विनीत भाटिया, विकास खन्ना.. अशी अनेक नावे घेता येतील. आता तर अनेक “कुकरीज शो “ मुद्दाम पुरुषच आखत असतात. मराठीत प्रशांत दामले, संकर्षण क-हाडे असो किंवा मधुराज शो असे अनेक आहेत. त्यात “मास्टर शेफ” “औस्ट्रेलियन शेफ” हा माझ्या मुलींचा आवडता शो होता. (अमेरिकेत गेल्यावर उपयोगी पडेल हा दुरदर्षीपणा असेल कदाचित). तरला दलाल बाईंचे यश “ मांसाहारी कृतीतुन शाकाहारी कृतीत पाककृती बदलुन त्यांची नवीन ओळख करुन खवय्यांना आकर्षीत करणे” यात आहे. ज्या आपण पंजाबी डिशेस आवडिने खातो त्याचे श्रेय त्यांनाच जाते.
मलापण लग्न होईपर्यंत पेपरमध्ये वाचुन नव्या नव्या पाककृती बनवायची खुप हौस होती. रोजचा स्वयंपाक मला बनवायला तेवढा आवडत नव्हता पण असे काही वेगळे प्रकार बनवायला मजा यायची. विशेष म्हणजे भावाने एक “कुक-बुक” भाऊबीजेला भेट म्हणून दिलेले (त्याला माहित होते वाटते पुढेमागे त्याचा उपयोग मी करेन म्हणून) अजून आहे ते माझ्या पुस्तक संग्रहात. नंतर मुली झाल्यावर मात्र ही हौस हळूहळू कमी झाली. मूलींना आवडणारे प्रकार मी बनवायचा प्रयत्न केला पण मला स्वत:ला ते आवडले नाहीत. धाकटी मुलगी काहीवेळा त्यात उत्साह दाखवीत असे, ते माझ्या पथ्यावरच पडले. त्यात आता मोगलाई, कोंटीनेंटल, इटालियन आणी चायनीजची भर पडत गेली. अमेरिकेला गेले होते तेव्हा या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. आपले भारतीयच प्रकार मला बरे वाटतात. आता तसेही तब्येतीला चालतील असेच प्रकार खावे लागतात त्यामुळे खाण्यावर आपोआप बंधन येतेच.
हल्ली सगळे इंटरनेटवर प्रात्यक्षिकासहीत ब्लॉगवर, युट्यूबवर विविध पाककृती बघायला मिळते त्यामुळे पुर्वीसारखे पाककृतीच्या पुस्तकांची मागणी कमी होत गेली. एकेकाळी मात्र या पुस्तकांचे ब-याच गृहिणींना ( विशेषत: नव्याने लग्न झालेल्या ) वरदान ठरले असेल. मुलेसुद्धा एकेकटे शिकायला बाहेर जातात तेव्हा अशा या “कुकरी शो” ची मदत घ्यावी लागतेच. मुलीसुद्धा असे शोज बघून बघून शिकतात. पुर्वी मी लग्न झाल्यावर नवीन काही बनवायचे असेल तर हमखास आईला, बहिणीला फोन करुन विचारत असे. इंस्टंट/रेडिमेड माहिती मिळायची त्यामुळे काही टिप्सपण मिळायच्या. अनुभवाचे बोल मिळायचे आणि करुन बघितल्यावर त्यांनाही समाधान मिळायचे. आता तसे काही होत नाही. कधीतरी मुली विचारतात पण त्यांना आमच्यासारखे ताण नसतो. कळले नाहीतर त्या विडीओ परत परत मागे पुढे करून मनपसंत पाककृती बनवित असतात. त्यामुळे पाककृती बिघडण्याचे प्रकार कमी होतात. खरे तर स्वयंपाक करणे पुर्वीसारखे किचकट राहिले नाही. तरीही आताच्या मुला/मुलींना स्वयंपाक बनविणे याचा कंटाळा का येतो ते कळत नाही.
स्वयंपाकघरात “राबणे” अपेक्षित नसले तरी किमान स्वयंपाक तरी प्रत्येकाला आला पाहिजे असे मला वाटते. बाहेर सगळे “ऑर्डर” दिले की घरपोच मिळते हा गैरसमज तात्पुरता ठीक आहे पण नेहमीसाठी नाही. आवड नसली तरी गरज म्हणून वरण-भात, भाजी-चपाती, खिचडी तरी किमान आली पाहिजे असे मला वाटते. तरूण तर तरुण पण आता जे सेवा-निवृत्त झालेत त्यांनीसुद्धा हे मनावर घेतले पाहिजे. एकदा कार्यालयात एकाने “मुले आई-वडिलांना कशाला बघायला पाहिजे? सगळ्या सोयी-सुविधा असताना,” म्हटल्यावर मी आश्चर्याने बघतच राहिले. घरचे खाणे आणि बाहेरचे खाणे किंवा स्वयंपाक करणारी जरी बाई लावली तरी ती आपल्या आवडीनुसारच बनवेल असे नाही ना. त्यांच्या दांड्या, पगार, येणे-जाणे हे सांभाळणे आलेच. त्यापेक्षा सगळी कामे सगळ्यांनी थोडी वाटून घेतली तरी खूप मदत होते. भाजी चिरणे, खोबरे किसून देणे, फळे कापणे, वरण-भाताचा कुकर लावणे, पीठ भिजवणे अशी अनेक कामे पुरुषसुद्धा करु शकतात.
अमेरिकेत “चपाती/भाकरी/फुलका” अर्धी-कच्ची मिळतात त्यामुळे बनवण्याचे बरेचसे कष्ट मुलांचे वाचतात पण शेवटी त्या मैद्याच्या असतात. याचाही विचार करुनच निदान सुट्टीच्या दिवशी तरी स्वयंपाक “घरी करायचा” असा अलिखीत नियम ठेवल्यास आरोग्य सुधारेल. एकूण काय आपले आरोग्य आपल्या हातात (स्वयंपाकात) असते असे मला वाटते. काही पाककृती पिढीजात शिकुन येत असतात. ब-याच वेळा लग्नाआधी आईकडुन, लग्नानंतर सासुकडुन अशा. थोडे कष्ट असतात पण फळ दिर्घोपयोगी असते. थोडक्यात तरला दलाल किंवा इतर मराठी स्त्रियांनी लावलेल्या पाककृतींचे रोपटे आज फार मोठे झाले आहे, त्यासाठी त्यांचे कायम स्मरण ठेवणे आवश्यक आहे.


Comments
Post a Comment