अमेरिकेन वारी भाग-4
छोट्या लेकीचा निरोप घेऊन नॉर्थ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सकाळी 7.00 चे विमान होते 9.00 वाजता युरोप,नेवार्क विमानतळावर पोहोचलो. मुलींनी 6 दिवसाची “Classic East Coast Tour from New York with Ariport Transfer, Boston Drop off”ची सहल आयोजित केलेली होती. यात “New York”, Washington DC, Philadelphia, Niagara Falls, Manhatten city, Corning (Corning Museum of Glass), Harshey Chocolate World), Boston (Harvard University) चा समावेश होता. विमानतळावरून TOUR OPEPRATOR ची गाडी न्यायला येणार होती पण उशीरा येऊन 12.00 वाजता होटेलला पोहोचलो. न्युयॉर्कमध्ये सहप्रवासी वेळेत न आल्यामुळे त्या दिवशी आरामच केला. तसेही आम्हाला खूप फिरणे झाल्यामुळे आराम आवश्यकच होता. हॉटेलमधील रुममध्ये मॅगी आणि नंतर खिचडी तयार करुन खाल्ली. हो, सांगायचे राहिले, मला बाहेरचे खाणे जास्त चालत नसल्यामुळे मुलीने मुद्दाम राईस कुकर सोबत दिलेला होता त्याचा वापर नंतर बर्फाचे तुकडे वितळण्यासाठी चहा, कॉफी आणि पिण्याचे पाणी भरुन घेण्यासाठी झाला, किती दुरदृष्टी बघा. संध्याकाळी टूर ओपरेटोरच्या फोनवरुन दुस-या दिवशीचे शेड्युल सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी “New York City” मध्ये “Big Apple, New York मार्केट्ची (जुनी व नवीन ) इमारत बाहेरून बघितली, त्यातील “Charging Bull” च्या पुतळ्यासोबत फोटो काढले . “Trinity Church”, “Federal Reserve Bank of New York” चे बाहेरून दर्शन घेतले. त्यानंतर प्रसिध्द “Statue of Liberty” बोटीतून सफर केली. एका मोठ्या आणि वेगवान बोटीतून समुद्रात काही अंतरावर एका बेटावर उभारलेल्या जगप्रसिध्द “Statue of Libery” चे दर्शन घेतले. वल्ड ट्रेड सेंटरची इमारत तर कमालच म्हणावी लागेल. तेथील लिफ्टने काही सेंकदात टॉपवर पोहचलो. अख्ख्या न्युयोर्कचा एरिअल व्ह्यू सुंदर दिसतो आणि त्या इमारतीची बांधणी अत्यंत देखणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ अवर्णनियच होता. खाली विस्तृत समूद्र, उत्तूंग उंच इमारती सोबत त्याचा व्हिडीओ आहे. वास्तविक एके काळी या इमारतींवर दहशतवादी हल्ला होऊन दोन इमारती जमीनदोस्त झालेल्या होत्या हे सांगूनही खरे वाटणार नाही. इथे थोडी माणसे दिसत होती ते बघून बरे वाटले कारण अमेरिकेत (इतरत्र रस्त्यावर) माणूस औषधालाही मिळणार नाही. यानंतर जगप्रसिध्द “Time Square”ला पोहोचलो. तिथे मुंबईमधील काळा घोड्याची आठवण झाली. खरे तर न्युयॉर्क बघणेच एक आल्हाददायक अनुभव होता आणि संपुर्ण न्युयॉर्क एका दिवसात बघणे शक्यच नाही. नुसती झलक पाहून रात्रीचे 9 वाजले, जेवण घेऊन नंतर हॉटेलात जाऊन झोपलो.
दुस-या दिवशी सकाळी “High line Park”(Central Park) नावाचा सुंदर बगीचा पाहिला. सदर बगीचा बघण्यासाठी सायकल रिक्शाची (electric cum manual) सोय होती. चालत बघणे शक्यच झाले नसते. येथे प्रसिध्द हॉलीवूड चित्रपटाचे चित्रण केले जाते. रस्त्याने जाताना “Chelsea Market” पाहिले. नंतर न्युयॉर्कचे सुप्रसिद्ध EMPIRE STATE BLDG बघितली. यात ब-याच जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत. AIR-SPACE MUSEUM बघणे खरेच उल्लेखनीय म्हणावे लागेल. इथे सर्व प्रकारच्या बोटिंची संपुर्ण कलाकृती दिसते. त्याची विस्तृत माहिती,वैशिष्ट्य अधोरेखीत केलेले असते. पाणबुडिचे वेगळे संग्रहालय आहे पण वेळेअभावी बघायला मिळाले नाही. अमेरिकन वृत्तिचे याबाबत कौतुक करावेसे वाटते. कल्पकता, संग्रह आणि इतिहास, जुन्या गोष्टी सांभाळणे, दुस-यांना दाखविणे आणि उत्सुकता निर्माण करणे हे यामुळेच शक्य होते. बाकी भटकंती चालूच होती, मधून मधून जेवण, खरेदी, खाणे-पिणेही चालू असायचे.
तिस-या दिवशी “Independence Hall” आणि “Liberty Bell” बाहेरुन पाहिली. “Washington DC-Capital-Depth Tour” टुरला सुरुवात झाली. यु.एस.कोंग्रेस (अमेरिकन संसद), सुप्रीम कोर्ट, लायब्ररी आणि व्हाटई हाऊस असा भरगच्च कार्यक्रम होता. अमेरिकन संसद काय चीज आहे ते प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणार नाही. लोकशाहीचे मंदिर, त्याचा आदर आणि स्वातंत्र्याचे महत्व एका लघुपटाद्वारे अधोरेखित करण्यांत आले होते. येथे पुर्वीच्या सर्व अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचे पुतळे (आखिव-रेखीव) आणि त्यांची माहिती देण्यात गाईडसुद्धा उत्सुक असतात. विशेष म्हणजे ही सर्व माहिती तो दरवेळी सांगतो न कंटाळता! तेथील सुरक्षाही खूप कडक असते. अब्राहम लिंकनचे स्मारक बघतांनाच पाऊसाने हजेरी लावली त्यामुळे जास्त काळ थांबू नाही शकलो. प्रवासात दुहेरी इंद्रधनुष्य बघणे हा एक अवर्णनीय आनंद होता.
चौथ्या दिवशी “हर्षे” चॉकलेटची फॅक्टरी बघण्याचा अनुभव तर मस्तच होता. चॉकलेट बनवण्याच्या विविध प्रक्रिया बघताना मजा आली. ब्रोकलीन ब्रिजवरुन मॅन्हटन शहराचा पॅनोरेमिक व्हु बघितला. एका दुमजली ओपन बसमधून त्यांच्या गाईडच्या माध्यमातून Philadelphia मधील “Ancient Capital Ruins tour”ची मजा अवर्णनीय होती. मनोहारी दर्शन कसे असते ते कळले. Manhattan Half Day टुरसुद्धा झाली. “Watkins Glen” हा सुंदर गुंफेतील धबधबा जवळुन पाहिला. 3 तासाच्या प्रवासानंतर नायगरा नदीच्या बाजूने लांब एका ठिकाणी उंच वाफेचे ढग दिसायला लागले आणि आम्हाला नायगरा धबधब्याचे प्रथम दर्शन झाले. संध्याकाळचा व सकाळचा नायगरा धबधबा वेगळा वाटतो. थोडा पाऊस होता त्यामुळे आधी जेवण घेऊन पुन्हा रात्री 10.00 वाजता फटाके आणि विद्युत रोषणाईमुळे अतिशय विलोभनीय दिस्णा-या नायगरा धबधब्याचे दर्शन झाले.
पाचव्या दिवशी नायगरा नदीवरील धबधबा हा 5 ठिकाणी वरुन कोसळतो त्यातील एक किनारा कॅनडात आहे. समोर कॅनडा आणि त्यातील उत्तूंग इमारती दिसत होत्या. हा नायगरा बघणे (अमेझिंग) एक रोमांचकारी अनुभव असेच म्हणावे लागेल. यात नायगरा धबधब्याच्या पाण्याचे “Whirl Pool”(भोवरा), नायगरा धबधब्याचे विविध टोकांकडून दर्शन आणि Maid of Mist बोटीने दर्शन होते. नायग-याचे सकाळी बोटीतुन अनोखा अनुभव घेतला. दोन बाजुंनी धबधबा आणि मध्ये आमची बोट-एकदमच चिंब भिजवणारा अनुभव होता. दुपारी जेऊन आम्ही बोस्टनच्या 7 तासाच्या प्रवासाला निघालो आणि रात्री बोस्टनला मुक्काम केला.
सहाव्या
दिवशी, सकाळी बोस्टन मधील विश्वविख्यात होर्वर्ड विद्धयापिठाचा अभ्यास दौरा आयोजित
करण्यांत आला होता. अमेरिकन क्रांतीवीरांचे पुतळ्यांची सुद्धा धावती भेट झाली. बोस्टनचे
दर्शन बसमधून केले व नंतर समुद्रातुन बोटीने आजुबाजुचा परिसर आणि सोबत काही बेटांचे
दर्शन घडविले. समुद्र सफारी करताना बोटीच्या काही अंतरावरून विमान उतरण्यासाठी जात
होते. एकूणच बोस्टन शहर मुंबईसारखेच वाटले मात्र एका बाजुला बैठी टुमदार घरे तर दुस-या
बाजुला मोठमोठ्या इमारती आणि विद्यापीठांचा परिसर खुप छान आणि निसर्गरम्य आहे. इथेच
पुढच्या महिन्यात माझी धाकटी मुलगी इंटर्नशिपसाठी बोस्टनमध्ये 6 महिने राहणार आहे,
तिच्या आधीच आम्हाला शहर बघून बरे वाटले. मांसाहारी खाणा-यांची इथे मजा आहे. आजुबाजुचे
शोपिंग सेंटर्स आणि खाऊ गल्ली बघायला छान वाटली. दुपारी जेऊन आम्हाला टुर ओपरेटर/गाईडने
बोस्टन विमानतळावर 2.00 वाजता सोडले. अशा त-हेने
आमची 6 दिवसाची सहल/यात्रा संपली. आमचे विमान सॅन्फ्रासिस्कोसचे संध्याकाळी 6.00 वाजताचे
होते. प्रवासातील टाईम चेंजमूळे सॅन्फासिस्कोसमध्ये पोहचण्यासाठी रात्री 10.00 वाजले.
गाडी घेऊन मोठी मुलगी विमानतळावर उभी होती.
इथे मुद्दाम नमुद करावेसे वाटते की, अशा
प्रकारच्या यात्रेत स्थळ दर्शन कार्यक्रम, जेवण-खाणे हे ठराविक वेळेत आटपून घ्यावयाचे
असतात. काही ठिकाणे पहाण्यासाठी अधिक वेळ पाहिजे असतो पण त्यांच्या वेळपत्रकात नसतात.
यात्रा कंपनी त्यांच्या सोईनुसार निवासी हॉटेल आणि खाणे-पिण्याची व्यवस्था पहात असतात.
आमच्या निरीक्षणानुसार प्रत्येक मोठ्या शहरात अमेरिका शासनाने शहरात स्थानिक दर्शन
ट्युरिष्ट बस आयोजित केलेल्या असतात त्यात गाईड असतो. त्याची सुविधा घेणे अधिक योग्य ठरेल. तदनंतर दुसया
दिवशी स्थानिक बसेसचा वापर करून तेथे जाऊन व्यवस्थित यात्रा दर्शन करू शकाल. उदा. हॉटेल
जर नायगरा फॉल्सच्या जवळ असेल तर आपण अधिक योग्य प्रमाणे स्थळ दर्शन घेऊ शकतो. ह्या
टुरमध्ये बहुतेक भारतीयच जास्त असतात आणि टुर आखणारे मात्र चायनीज असतात. हे चायनीज
केवळ आपल्या भाईबंधातील निवासी आणि खाण्यापिण्याचे हॉटेल बुक करतात. आमचा गाईड व्यवस्थित
स्थळ दर्शन माहितीसह करीत होता. हिंदी-चिनी भाई भाई दुसरे काय! ( प्रत्यक्ष नसले तरी).
एकुंण 5 दिवसांची टुर प्रवासाचा प्रगल्भ अनुभव देऊन गेली. वडील नेहमी म्हणायचे “फिरल्याने
माणुस समृद्ध होतो”याचा प्रत्यय नुकताच घेतला. टुर ओपेरटरसुद्धा छान विस्तृत माहिती
आणि कुठे काय व त्याचे महत्व विशद करित होता. वेगवेगळे स्थापत्य,रचना, निसर्ग जपणे,
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अमेरिकन संस्कृती, त्यांची झोकुन देण्याची वृती, कल्पकता,
स्वातंत्र्य जपणे सगळेच महत्वाचे वाटले. आता घराची आठवण तीव्रतेने येत होती. त्यानंतर
8 दिवस मोठ्या मुलीकडे राहुन पुन्हा काही स्थानिक स्थळे पाहून तिच्या प्रेमाने आणि
स्नेहाने भरुन पाऊन भारतात स्वगृही परतलो.
अमेरीकेतील स्थळांबद्दल जसे की अनेक देवांचे देऊळे, समूद्र किनारे, उंच पर्वतराजी वरील बर्फातील सफर, जंगल, डोंगरद-या, बर्फाने आच्छादित भाग, फुलांचे गार्डन्स, अनेक म्युझीयम्सस, ऊंच इमारती, समुद्रातील सफर, प्रसिध्द पुतळे आणि स्टेच्यू ऑफ लिबर्टी, उच्च दर्जाचे कॉलेजस, अनेक सुपर मार्केटस आणि हॉटेल्स हे पाहिले. टुरबद्दल सगळेच लिहिणे शक्य नव्हते, जेवढे आठवणीत होते, महत्वाचे वाटले आणि ओझरती ओळख करुन देणे एवढेच योजले होते. प्रवास वर्णन लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय तो तुम्ही गोड मानून घेतलाय हेही छान वाटतेय. एवढी छान अमेरिका वारी घडविल्याबद्दल लेकींचे आभार. तुम्ही वाचकांनीही भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आणि वारी यशस्वी झालयाबद्दल परमेश्वराचेही आभार. हा लेख भारतातूनच लिहित आहे, बराच काळ लेखन थांबले होते म्हणून काही उशीर झाला. अशा रीतीने अमेरिका वारी 4 टप्प्यांमध्ये सुफळ संपुर्णम!

.jpeg)
.jpeg)
So nicely written. Geetatai
ReplyDeleteDhanyawad & suswagatham Geetatai 🙏
Delete👌👍सुंदर प्रवास वर्णन cm
ReplyDeleteDhanyawad & suswagatham!🙏
Delete